बिनडोक

20 Sep 2025 11:49:32

पन्नाशीत प्रवेश करणाऱ्या आणि देशाचा तरुण नेता म्हणून मिरविणाऱ्या एका नेत्याने देशातील तरुणाईला साद घालत, देशातील त्यांच्या आकलनानुसार सुरू असलेल्या काही चुकीच्या गोष्टींना जनतेसमोर आणण्यासाठीचा खटाटोप चालविला आहे. या देशात जे काही सुरू आहे, ते अतिशय गंभीर आणि अत्यंत वाईट सुरू असल्याचा साक्षात्कार झालेल्या या नेत्याने, लोकशाही प्रक्रियेतील निवडणूक यंत्रणेकडे बोट दाखवून याची सुरुवात केली. मात्र, त्यांच्या या आवाहनाला त्यांची बहीण आणि त्यांचे चेलेचपाटे असलेले लोक सोडले, तर कोणीही भीक घालीत नाही, हेदेखील त्यांनी केलेल्या आरोपानंतर अवघ्या तासाभरात सिद्ध झाले आहे. उलट ज्या तरुणाईला देशात अराजकता घडविण्यासाठी ते साद घालत आहेत, ती तरुणाई त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही हे भारतात लॉन्च झालेल्या नव्या आयफोन शोरूम समोरील गर्दीने, दिल्ली विद्यापीठातील त्यांना मिळालेल्या पराभवाने स्पष्ट झाले आहे.

देशातील तरुणांची डोकी विकृतीकडे नेण्याचा नक्षली चेहरा घेऊन मिरविणारा हा नेता, देशात काहीही आलबेल नसल्याचे धादांत खोट बोलून, दिशाभूल करीत सुटला आहे. यामुळे त्याला त्याच्या या बिनडोक वागण्याचे, तरुणाईने अवघ्या काही तासांत दिलेले उत्तरदेखील अतिशय महत्त्वाचे आहे. उलट या देशातील तरुणाई आता ज्या गतीने तंत्रज्ञानाचा उपयोग करीत देशहितासाठी सुसाट कार्य करीत आहे, ती अतिशय जमेची बाजू आहे. आपल्या देश जागतिक स्तरावरील अव्वलतेकडे जात असल्याचे हे एक ,आश्वस्त करणारे सकारात्मक उदाहरण ठरावे. त्यामुळे हा नेता असो की, या देशाविरोधात बोलणारे काही नतद्रष्ट नेते ज्यांना कुविचारांचा विकार झालेला आहे, यांना देशाची प्रगती बघवत नाही हेदेखील सिद्ध होत असल्याचे म्हणायला वाव आहे. या देशातील तरुणाईची डोकी भडकविण्याचा उद्योग कदाचित ही पिढी सहन करणार नाही. वारंवार जर हे लोक असेच बोलत सुटले, तर याच लोकांच्या विरोधात तरुणाईला आक्रमक व्हायलाही वेळ लागणार नाही, हे सत्य देखील नाकारून चालणार नाही. मात्र, हे लोक ज्या पद्धतीने देशात काहीही आलबेल नाही असे भासविण्याचा आणि विनाकारण लोकांची दिशाभूल करण्याचा उठसूठ प्रयत्न करीत आहेत, तो अत्यंत दुर्दैवी असाच.

खोटारडे

जीएसटीचे दर कमी केल्यामुळे, आपसूकच आता देशात २२ तारखेनंतर अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे ‘महंगाई डायन’ म्हणणार्यांची बोलतच बंद होणार आहे. स्वस्ताई कधी आलीच नाही, असे अर्थशास्त्राचे सिद्धांत सांगून पटवून देणार्यांना, येणार्या काळात स्वस्ताईचे चांगले परिणाम दिसतील. तेव्हा या विरोधकांचे यावरील तर्क म्हणजे, आणखी एक मनोरंजन असेल असे मानायला हरकत नाही. आजच गाडी निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी जुन्या आणि नव्या कारदेखील लाखो रुपयांनी स्वस्त होणार असल्याचे संकेत देऊन, दसरा-दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. आजची पिढी ही अत्याधुनिक काळात बदलत्या काळानुसार जीवनशैली जगणारी आहे. तसेही आता प्रत्येक वस्तू ही जीवनाचा अविभाज्य भाग बनत असल्याने, त्याचे महत्त्व अधोरेखित होत असते. त्यामुळे सामान्य माणसाच्या घरासमोर चारचाकी असणे म्हणजे, तो श्रीमंताच्या यादीत येऊन बसतो. ज्याच्या घरी चारचाकी नाही तो मात्र गरीब समजाला जातो.

काँग्रेस शासनाच्या काळात ‘गरिबी हटाव’चे नारे प्रत्येक निवडणुकीवेळी देऊन आम्ही तुम्हाला गरीबच ठेवले, हे काँग्रेसला अप्रत्यक्षपणे सांगावे लागत होते. मात्र, जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न केला की काय होते, याचे परिणाम आता हा पक्ष भोगत आहे. स्वातंत्र्य मिळवूनदेखील संधी असताना या देशाला ‘सुजलाम् सुफलाम्’ बनविण्याचे सोडून, काँग्रेस पक्षातील लोकांनी केवळ स्वतःच्या झोळ्या भरणे आणि देशात भ्रष्टाचाराची परंपरा रूजविणे, याशिवाय काहीही केले नाही. आताच्या तरुणाईला तर याची अत्यंत चीड आहे, त्यामुळे आगामी काळातील स्वस्ताई ही सर्वांनाच सुखद धक्का देणारी असेल यात संदेह नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनीच याची घोषणा करून संकेत दिले होते, आता त्याच्या अंमलबजावणीला सुरुवातदेखील झाली आहे. काँग्रेसने ‘गरिबी हटाव’ची घोषणा करून, कधीही त्याची अंमलबजावणी केल्याचे कोणीही मान्य करणार नाही. त्यामुळे सरकारविरोधात खोट्या वल्गना करण्याचे प्रकार या लोकांनी सुरू केले आहेत, त्याला जनता तर किंमत देतच नाही. मात्र, ज्या तरुणाईवर या देशाचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहे, ती तरुणाईदेखील भीक घालत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

अतुल तांदळीकर


Powered By Sangraha 9.0