
अमेरिकेने जी कृती केली आहे, त्याचा भारताने अधिकृतपणे निषेध केला आहे. ट्रम्प यांनी ज्या अन्य देशांवर कर लादला आहे, त्या देशांमध्येही अमेरिकी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्वदेशी उत्पादने खरेदी करून भारतीय जनता अमेरिकेस सडेतोड उत्तर दिल्यावाचून राहणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जबरदस्त कर लादण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकी प्रशासनाविरुद्ध भारतीय जनतेमध्ये संतापाची लाट उसळली. ट्रम्प यांनी असे जबरदस्त कर लादून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यात ट्रम्प यांना यश मिळण्याची मुळीच चिन्हे नाहीत. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्यात यावा, यादृष्टीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाऊ लागली आहे. ‘पेप्सी’, ‘कोका-कोला’, ‘केएफसी’, ‘मॅकडोनाल्ड’, ‘सब वे’ या अमेरिकी कंपन्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम तीव्र होऊ लागली आहे. स्वदेशीचा अवलंब करून भारतास ‘आत्मनिर्भर’ करण्यात यावे, असा जोरदार प्रचार केला जाऊ लागला आहे. अमेरिकी कंपन्यांविरुद्ध जनमत जागृत करण्यामध्ये ‘स्वदेशी जागरण मंच’ या संघटनेने पुढाकार घेतला आहे. या संघटनेच्यावतीने देशात विविध ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली आणि करण्यात येत आहेत. ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर ५० टक्के कर लादण्याचा निर्णय घेऊन तो कृतीमध्ये आणला. भारत रशियाकडून तेल खरेदी करीत असल्याबद्दल जो २५ टक्के अतिरिक्त कर भारतावर लादला, त्याचाही या ५० टक्के करात समावेश आहे. रशियाकडून तेल खरेदी करून भारत एकप्रकारे युक्रेन-रशिया युद्धात रशियाला मदत करीत असल्याचा ट्रम्प यांचा आरोप आहे. पण, ट्रम्प यांनी असे कर लादताना भेदभाव केला आहे. ट्रम्प यांनी भारतास लक्ष्य करून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी कशी होईल, असा प्रयत्न यानिमित्ताने केला. भारत जगातील तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पण, ट्रम्प यांना भारताची ही घोडदौड दिसत नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख त्यानी ‘मृत अर्थव्यस्था’ असा अलीकडेच केला होता. राहुल गांधी यांच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी ट्रम्प यांची री ओढावी याला काय म्हणायचे. पण, ट्रम्प आणि राहुल गांधी यांचे कोण तितके मनावर घेतेय. ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्याचा निर्णय दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी घेतला. त्यानंतर उभय देशांमध्ये राजनैतिक तणाव तर वाढलाच; पण त्याचबरोबर भारतात अमेरिकेविरुद्ध संतापाची लाट उसळली. अमेरिकी उत्पादने खरेदी करू नका, अशी मोहीम उघडण्यात आली. अमेरिकी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम भारतभर सुरू झाली. १९०५ साली विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन हाती घेण्यात आले होते. त्याच धर्तीवर भारतीयांनी अमेरिकी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले जात आहे.
अमेरिकेने जी कृती केली आहे, त्याचा भारताने अधिकृतपणे निषेध केला आहे. ट्रम्प यांनी ज्या अन्य देशांवर कर लादला आहे, त्या देशांमध्येही अमेरिकी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्वदेशी उत्पादने खरेदी करून भारतीय जनता अमेरिकेस सडेतोड उत्तर दिल्यावाचून राहणार नाही. भारतीय अर्थव्यवस्था ‘मृत’ नसून ती अमेरिकेपेक्षा बलाढ्य आहे, हे एक न एक दिवस अमेरिकेच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
घुसखोरांसाठी मुक्ताफळे!आसाममध्ये जे बांगलादेशी घुसखोर शिरले आहेत, त्यांची हकालपट्टी करण्याची चर्चा एकीकडे सुरू असताना आपल्याच देशातील काही डाव्या विचारांच्या नेत्यांना या बांगलादेशी घुसखोरांचा पुळका आला. गुवाहाटी येथे डाव्या विचारांच्या डॉ. हिरेन गोहैन, राज्यसभा खासदार अजित भूयान यांनी योजलेल्या आणि काँग्रेस, जमियत आणि अन्य विरोधी पक्षांनी समर्थन दिलेल्या एक दिवसीय ‘आसाम नागरिक संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. राज्यात असलेल्या बांगलादेशी मुस्लिमांचा पाठिंबा मिळविण्याचा या आयोजनामागील हेतू होता. या संमेलनात डाव्या विचाराच्या कार्यकर्त्या सैयदा हमीद यांनी, बांगलादेशी घुसखोरांना भारतात राहण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. हमीद यांच्या या वक्तव्याचे केवळ आसाममध्येच नाही, तर देशभर पडसाद उमटले. ज्या संघटनेने सदर संमेलन आयोजित केले होते, ती डाव्या विचारांची संघटना आहे. राज्यात जे मूळ बांगलादेशी मुस्लीम आहेत, त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या एक दिवसाच्या संमेलनात प्रशांत भूषण, सैयदा हमीद यांच्यासह अनेक डाव्या विचारांच्या नेत्यांनी, बांगलादेशमधून बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या घुसखोरांना उघडपणे आपला पाठिंबा दिला. सैयदा हमीद या तर नियोजन मंडळाच्या माजी सदस्य. यांनी तर बांगलादेशी मुस्लिमांची बाजू घेऊन मुक्ताफळे उधळली! "बांगलादेशी मुस्लिमांना भारतात आणि आसाममध्ये राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. आमचे मन आसाममधील मुस्लिमांशी जोडले गेले आहे. बांगलादेशी असणे हा काही गुन्हा नाही. हा देश एवढा मोठा आहे की, येथे बांगलादेशी कोठेहे राहू शकतात. ते कोणाचाही अधिकार हिरावून घेत नाहीत. ते मानव आहेत आणि अल्लाने हे सर्व जग मानवांसाठी निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांना येथे राहण्याचा अधिकार आहे. त्यांना तुम्ही इतया अमानुषपणे घालवू शकत नाही. गोलपाडा येथे जे घडत आहे, तेच दिल्लीमधील जामिया मिलियामध्ये घडत आहे. मुस्लिमांची हकालपट्टी म्हणजे त्यांच्यावर राक्षसी घाला आहे. हा सर्व प्रकार मुस्लिमांचा नरसंहार करण्यासारखा आहे,” असे सैयदा हमीद यांनी म्हटले आहे.
डाव्या विचारांच्या या नेत्यांनी जे वक्तव्य केले, त्याचा आसाममधील विविध संघटनांनी निषेध केला आहे. ‘अखिल आसाम विद्यार्थी संघटने’चे अध्यक्ष उत्पल शर्मा यांनी, असे वक्तव्य करून सैयदा हमीद यांनी आपल्या आसामविरोधी आणि भारतविरोधी बुद्धीचे प्रदर्शन केले आहे. आसाम आंदोलनामध्ये ज्या ८५५ जणांनी हौतात्म्य पत्करले त्यांचा हमीद यांनी अपमान केला आहे. आसामी जनतेने जो त्याग आणि बलिदान केले आहे, त्याचा असा अपमान डाव्या नेत्यांनी करू नये, असा इशाराही उत्पल शर्मा यांनी दिला आहे. "आसाम आंदोलनाच्या दरम्यान ज्या ५८ आसामी महिलांवर बलात्कार झाला त्यांचाही अपमान हमीद यांनी केला आहे,” असे शर्मा यांनी म्हटले आहे. भाजपचे आमदार दिप्लूरंजन शर्मा म्हणाले की, "हमीद यांना सर्व जग एक आहे असे वाटत असेल, तर त्यांनी आणि या संमेलनाच्या आयोजकांनी बांगलादेशात जाऊन राहावे. ही सर्व वक्तव्ये पाहता, हा आसाम आणि भारताविरुद्धचा आंतरराष्ट्रीय कट आहे,” असा आरोप आमदार शर्मा यांनी केला.
मोहम्मद अली जिना यांनी या कारस्थानाची सुरुवात केली आणि सईदा हमीद यांच्यासारखे लोक ते कारस्थान पुढे नेत आहेत. आसाममधील लोकसंख्येचे प्रमाण बदलण्याचा आणि बृहद बांगलादेशमध्ये आसामचा अंतर्भाव करण्याच्या कटाचा हा भाग आहे, असा आरोप त्यांनी केला. मदानी, सैयदा हमीद, प्रशांत भूषण, तसेच काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, गौरव गोगोई आणि त्या संमेलनाचे आयोजक हे आसामचे शत्रू असल्याची टीका आमदार शर्मा यांनी केली. भाजप आमदार चक्र गोगोई यांनीही हमीद यांच्यावर टीका केली. जातीय संग्रामी सेनेचे नेते सितू बरुआ यांनी, मदानी, हमीद यांच्यासारख्या नेत्यांना भारत हे इस्लामी राष्ट्र बनवायचे आहे, असा आरोप केला. "आसाममध्ये कोणी राहायचे याचा निर्णय आसामी जनता घेईल. कोणाही पाकिस्तानी हस्तकाला त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही,” असेही ते म्हणाले. आसामविरुद्धच्या कटात सहभागी असलेल्या या नेत्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आसाममध्ये जे संमेलन झाले, त्यातील नेत्यांनी जी भाषणे केली ती पाहता, या डाव्या नेत्यांची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत त्याची कल्पना यावी! जगात अनेक मुस्लीम देश आहेत त्या देशांमध्ये बांगलादेशी मुस्लिमांनी जाऊन राहावे, असा सल्ला देताना हे डावे नेते दिसत नाहीत! भारतामध्ये फुटीर शक्ती कशा वाढतील, एवढ्याच एकमात्र हेतूने या डाव्या विचारांच्या नेत्यांकडून असे उद्योग केले जात आहेत असे म्हणता येईल.
अमेरिकेत पहिले मा मरियम्मन मंदिर!अमेरिकेतील ‘टेसास’मध्ये त्या देशातील पहिले मा मरियम्मन मंदिर उभारले जात आहे. या मंदिराच्या निर्मितीमुळे अमेरिकन भूमीवर शेकडो वर्षांची दाक्षिणात्य परंपरा रुजणार आहे. तामिळनाडूमधील मा मरियम्मन मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये तिरुचिरापल्ली येथे असलेल्या प्रसिद्ध समयापुरम मरियम्मन मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारले जात आहे. मूळचे चेन्नई येथील आणि सध्या ‘टेसास’मध्ये राहत असलेले थारागरम बाश्यम आणि त्यांची पत्नी सरस्वती यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. दहा एकर परिसरात या मंदिराची उभारणी केली जात आहे. या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार्या मूर्ती सध्या चेन्नई लगत असलेल्या ममलापुरम येथे घडविल्या जात आहेत. मा मरियम्मन ही देवता आदी पराशक्तीचे रूप असल्याचे मानले जात आहे.