आता थांबा जरांगेजी, आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा; केशव उपाध्ये यांचे आवाहन

02 Sep 2025 15:38:59

मुंबई : बस... आता थांबा जरांगेजी, आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, असे आवाहन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवार, २ सप्टेंबर रोजी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना केले. गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मुंबईत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

यावर बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, "ज्या समाजाने लाखोंचे यशस्वी मूक मोर्चे शांततेत काढले, तो हाच का मराठा समाज, अशी शंका यावी असे चित्र गेले ४-५ दिवस मुंबईत सुरू आहे. छत्रपतींचा मावळा ही आपली ओळख पण आंदोलनातील हौशे गवश्यांनी जे केले ते प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ‘ते आमचे नव्हेत’ असे म्हणून जबाबदारी झटकता येईल पण वस्तुस्थिती बदलणार नाही. प्रत्येक आंदोलन यशस्वी होण्यासाठी थोडे मागेपुढे करावे लागते. काही वेळा थांबावे लागते. महात्मा गांधीनीसुध्दा काही वेळा आंदोलन स्थगित केले. मराठा समाजाच्या वेदना आपण सगळ्यासमोर आणल्यावर मराठा समाजाला आता १० टक्के आरक्षण सध्या लागू झाले आहे."

मविआतील मंडळी केवळ गोल गोल करत आहेत

"आता वेळ आहे थांबण्याची. आपल्या बहुतांशी मागण्या महायुती सरकारने पूर्ण केल्या आहेत. राहिला प्रश्न, ओबीसी कोट्यातून आरक्षण घेण्याचा, तर भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण यावर आपल्यासोबत असण्याचा दावा करणारे मविआतील घटक पक्ष, शरद पवार, आणि काँग्रेसची काय भूमिका आहे ते स्पष्ट विचारा. उद्धव ठाकरेंना या प्रश्नातले फारसे ज्ञान नसल्याने ते मूग गिळून बसतील, पण मविआतील ही मंडळी केवळ गोल गोल करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा दोन समाज समूहांना झुंजत ठेवून मविआतील तीन पक्षांना राजकारण करायचे आहे, हे लक्षात घ्या. आंदोलनात आपल्या खांद्यावरून कुणी मतांची बेजमी करण्याच स्वप्न पाहतोय. ही नामुष्की टाळण्यासाठी आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा," असे आवाहन केशव उपाध्ये यांनी मनोज जरांगे यांना केले आहे.


Powered By Sangraha 9.0