भीषण पावसात आणि ढगफुटीत संघ–सेवा भारतीचे कार्यकर्ते मदतीसाठी तत्पर

02 Sep 2025 15:31:35

मुंबई (प्रतिनिधी) : हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने व ढगफुटीच्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेकडो लोकांचा बळी गेला असून असंख्य कुटुंबे बेघर झाली आहेत. अनेकांनी शेतजमिनी आणि आयुष्यभराची कमाई गमावली आहे. या संकटाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवा भारतीचे स्वयंसेवक निःस्वार्थ भावनेने मदत व सेवा कार्यात गुंतलेले आहेत.

मिळालेल्या माहीतीनुसार, या भागात मदत सामग्री पोहोचवणे, अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी नेणे, आपत्तीग्रस्तांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था करणे अशा सर्व पातळ्यांवर स्वयंसेवक कार्य करत आहेत. अनेक भागांत आपत्कालीन भोजन केंद्रे आणि आरोग्यसेवा सुरू करण्यात आली आहे.

४७५ स्वयंसेवकांचा सहभाग
आपत्तीग्रस्त भागात सुमारे ४७५ कार्यकर्ते दररोज सक्रियपणे सेवा देत आहेत. चंबा, नूरपूर, जोगिंद्रनगर, बिलासपूर, हमीरपूर, ऊना, मंडी, सुंदरनगर, कुल्लू, शिमला, सोलन अशा ठिकाणांसह ६८ स्थायी सेवा केंद्रे कार्यरत आहेत. याशिवाय २३ नगरांमध्येही सेवा उपक्रम सुरू आहेत.

पावसामुळे मणिमहेश यात्रेचे अनेक मार्ग बंद झाले आहेत. तरीही स्वयंसेवकांनी भरमौरमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना स्वतःच्या वाहनांतून सुरक्षित स्थळी पोहोचवले. आतापर्यंत सुमारे 500 यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सेवा प्रमुख महेंद्रजी यांनी सांगितले की, बिकट परिस्थितीमध्ये संघ व सेवा भारतीचे कार्यकर्ते फक्त मदत करत नाहीत, तर पीडितांच्या वेदना जाणून त्यांच्यात आशेची ज्योत पेटवित आहेत.



Powered By Sangraha 9.0