
मुंबई: सिनेविश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध निर्माते रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचं नुकतंच निधन झालं आहे. रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचे ३१ ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निधन झाले आहे. प्रेम सागर हे पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या १९६८ च्या बॅचचे विद्यार्थी होते. ते उत्तम दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर होते.
‘इंडिया फोरम’च्या वृत्तानुसार, दि.३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचे निधन झाले आहे. प्रेम सागर यांनी आपल्या वडिलांनी, प्रख्यात दिग्दर्शक रामानंद सागर यांनी स्थापन केलेल्या सागर आर्ट्स या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत जवळून काम केले. रामानंद सागर यांची ऐतिहासिक रामायण ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. प्रेम सागर यांना FTII मधील शिक्षणाने करिअरला नवी दिशा दिली. त्यांना फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीचे चांगले तांत्रिक ज्ञान मिळाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. वडिलांप्रमाणेच प्रेम यांनीही सिनेसृष्टीसाठी मोठं योगदान दिलं आहे.
प्रेम सागर यांनी अनेक मालिका तसेच चित्रपटांसाठी वेगवेगळ्या पातळीवर काम केले. पडद्यासमोर न येता पडद्यामागे त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी दूरदर्शनवरील अलिफ लैला ही मालिका दिग्दर्शित केली होती. याशिवाय त्यांनी काकभुशुंडी रामायण (२०२४) आणि कामधेनु गौमाता (२०२५) यांसारख्या धार्मिक मालिकांचे कार्यक्रम केले. निर्माते म्हणून त्यांनी हम तेरे आशिक हैं (१९७९), बसेरा (२००९) आणि जय जय शिव शंकर (२०१०) असे चित्रपट केले होते. चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपली तांत्रिक ओळख निर्माण केली. १९६८ च्या आंखें आणि १९७२ च्या ललकार या चित्रपटांत त्यांनी कॅमेरा आणि इलेक्ट्रिकल विभागात काम केले, तर १९७६ च्या चरस या चित्रपटात ते सिनेमॅटोग्राफर होते. त्यामुळे दिग्दर्शक ते निर्माते अशी त्यांची मोठी ओळख होती.
प्रेम सागर यांनी त्यांचे वडील दिवंगत रामानंद सागर यांच्या जीवनावर आधारीत एक पुस्तकही लिहिले होते. ‘अँन एपिक लाइफ ऑफ रामानंद सागर : फ्रॉम बरसात टू रामायण’ असं या पुस्ताचं नाव होतं. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात त्यांनी या पुस्तकाचे अनावरण केले होते. यावेळी त्यांनी सांगितले होते की १९४९ मध्ये रामानंद सागर यांचा पहिला चित्रपट बरसात होता. फार कमी लोकांना माहीत आहे की रामानंद सागर यांनी एकेकाळी शिपाई म्हणून काम केले होते, रस्त्यावर साबण विकला होता, पत्रकार आणि मुनीम अशी जबाबदारीही पार पाडली होती. मात्र, आपल्या कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी असा टप्पा गाठला की रामायणसारखी ऐतिहासिक मालिका निर्माण करून भारतीय दूरदर्शनचे स्वरूपच बदलून टाकले.