मुंबई : (Mumbai High Court On Maratha Protest) मराठा आरक्षण आंदोलनाविरोधातील जनहित याचिकेवर आज (मंगळवार, दि. २ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने आंदोलकांना मुंबई रिकामी करण्याचे आदेश दिले होते. तसेच आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही तत्काळ आझाद मैदान सोडण्याचे निर्देश दिले होते. यावर जरांगेंच्या वतीने त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी उद्यापर्यंतची वेळ मागितली आहे. यावर न्यायालयाने उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.
यावेळी न्यायालयाने मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार दोघांनाही खडे बोल सुनावले. केवळ २४ तास आझाद मैदानात उपोषणाला बसण्याची परवानगी दिलेली असतानाही तुम्ही कोणत्या अधिकाराने मागील चार दिवसांपासून तिथे बसला आहात? असा प्रश्न उच्च न्यायालयाने जरांगेंच्या वकिलांसमोर उपस्थित केला.
यावर जरांगेंच्या वकीलांनी "सुनावणी उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत पुढे ढकलून आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही माइक व लाउडस्पीकरद्वारे आंदोलकांपर्यंत संदेश पोहोचवू आताही ते आदेशाचे पालन करत असून बहुसंख्य आंदोलकांनी मुंबई सोडली आहे", असे न्यायालयाला सांगितले. तसेच "आम्ही जरांगे पाटलांशी चर्चा करू आणि याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे वकिलांनी सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणी उद्या दुपारी १ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.