आदिवासी भाषांच्या भाषांतरासाठी एआय आधारित ‘आदी वाणी’ची बीटा आवृत्ती लाँच!

02 Sep 2025 14:03:54

नवी दिल्ली : (Ministry of Tribal Affairs launches Beta Version of Adi Vaani) विविध जाती-जमातींचे सशक्तीकरण आणि भाषीय संरक्षणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत आता आदिवासी मंत्रालयाने सोमवारी दि. १ सप्टेंबरला ‘आदि वाणी’ च्या बीटा आवृत्तीचा शुभारंभ केला आहे. ‘आदि वाणी’ हे भारतातील पहिल्या आदिवासी भाषांसाठीचे एक एआय-आधारित भाषांतराचे माध्यम आहे. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या समरसता हॉलमध्ये आदिवासी गौरव वर्षे (JJGV)अंतर्गत आयोजित केला होता.

याप्रसंगी आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उइके, आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे सचिव विभू नायर, आयआयटी दिल्लीचे संचालक रंगन बॅनर्जी, संयुक्त सचिव अनंत प्रकाश पांडे, मंत्रालयाच्या संचालक दीपाली मासिरकर, बीबीएमसी सेल- आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर विवेक कुमार, तसेच आयआयटी दिल्लीचे एसोसिएट प्रोफेसर संदीप कुमार आदी उपस्थित होते. तसेच सर्व राज्यातील जमाती संशोधन संस्था (TRIs) आणि जमाती भाषांचे तज्ज्ञांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

"भाषा ही संस्कृतीच्या ओळखीचा पाया आहे आणि समुदायांना जोडण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावते", असे यावेळी आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उइके यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की "‘आदि वाणी’मुळे दुर्गम भागात राहणाऱ्या समुदायांना संवादाची सुविधा मिळेल, तसेच विविध जाती- जमातीच्या युवकांना डिजिटल रुपाने सशक्त केले जाऊ शकणार आहे. तसेच आदी कर्मयोगी ढाच्याने अंतर्गत सेवांमुळे अंतिम स्तरापर्यंत पोहचता येणार आहे."

‘आदि वाणी’ म्हणजे काय?

'आदि वाणी' हे एक एआय-आधारित भाषांतरणाचे माध्यम आहे. आदिवाणीचे उद्दिष्ट प्रगत एआय तंत्रज्ञान वापरून आदिवासी भाषा आणि संस्कृतींचे जतन करणे, तिला प्रोत्साहन देणे आणि तिचे पुनरुज्जीवन करणे हे आहे. २०११च्या जनगणनेनुसार भारतात ४६१ आदिवासी भाषा बोलल्या जातात, ज्यामध्ये ७१ विशिष्ट आदिवासी मातृभाषा आहेत. यातील ८१ भाषा असुरक्षित आहेत, तर ४२ भाषा धोक्यात आहेत.

आता आदिवाणी एआय वापरून आदिवासी भाषांचे पद्धतशीरपणे डिजिटायझेशन, जतन आणि पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे व्यासपीठ विकसित करण्यासाठी झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मेघालय येथील आदिवासी संशोधन संस्था (TRIs) तसेच आयआयटी दिल्ली, बिट्स पिलानी, आयआयटी हैदराबाद आणि आयआयटी नवा रायपूर या संस्थांनी योगदान दिलेले आहे.

येथे उपलब्ध असणार

‘आदि वाणी’ चे बीटा संस्करण https://adivaani.tribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आणि या अॅपचे बीटा संस्करण लवकरच प्ले स्टोर आणि iOS वर देखील उपलब्ध होणार आहे. सध्या संथाली (ओडिशा), भीली (मध्य प्रदेश), मुंडारी (झारखंड) आणि गोंडी (छत्तीसगड ) या भाषांचे भाषांतर करते. त्यानंतर लवकरच कुई आणि गारो भाषांची भाषांतराची सेवा उपलब्ध होणार आहे.

आदिवाणीची प्रमुख वैशिष्ट्ये: 

हिंदी, इंग्रजी आणि आदिवासी भाषा दरम्यान रीअल-टाईम टेक्स्ट आणि स्पीच भाषांतर करणे शक्य

विद्यार्थी आणि प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांसाठी इंटरअॅक्टीव भाषा शिक्षण मॉड्यूल

लोककथा, मौखिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे डिजिटलीकरण

आरोग्य सल्ला आणि पंतप्रधानांची भाषणे यांसारख्या सरकारी संदेशाचे सबटायटल्स आदिवासी भाषेत दिसणार




Powered By Sangraha 9.0