'गणेशोत्सव सर्वधर्म समावेशक...' इंशाल्ल्हा कादंबरीकार, अभिनेते अभिराम भडकमकर म्हणाले...
02-Sep-2025
Total Views |
मुंबई : सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना सोशल मीडियाचं वातावरण वेगळ्याच मुद्द्याने तापलेलं पाहायला मिळत आहे. अर्थातच त्याला पार्श्वभूमी गणेशोत्सावाचीच आहे. रीलस्टार अथर्व सुदामेच्या हिदूं-मुस्लीम ऐक्यवादी रीलमुळे एकच संताप पाहायला मिळाला. आणि काही वेळातच त्याने आपल्या खात्यावरुन तो व्हिडीओ हटवला. पण त्यामुळे हिंदू सणांमध्ये मुस्लीम असणं आणि ते किती समावेशक आहेत या मुद्द्यांवर चर्चा होऊ लागली. सोशल मीडिया कन्टेट क्रियेटर्सवर आक्षेप घेणं खरंच चूक आहे का... याविषयी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते अभिराम भडकमकर यांनी परखड मत मांडलं आहे. मुंबई तरुण भारतशी बोलताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले. इंशाल्ल्हा ही त्यांची कांदबरी प्रकाशित झाली त्यावेळी देखील त्यांना अशाच गोष्टींचा सामना करावा लागला होता.
याविषयी बोलताना भडकमकर म्हणाले, “मुळातच गणेशोत्सव असा सण आहे जो सर्वांना सामावून घेतो. कुठल्याही हिंदू सणामध्ये असा विचार केला जात नाही की, या सणातून कोणाला आर्थिक उत्पन्न मिळत असेल तर आपण थांबवलं पाहिजे. कारण मला असं वाटतं की या देशातला हिंदू हा सर्वसमावेशक आहे. त्याच्या मनात आपला-परका अशी भावना नाही. गरज ही माझी कांदबरीसुद्धा याविषयी बोलते. मुस्लिमांनी हिंदू सणांमध्ये सहभागी होणं हे स्वागताहार्यच आहे. पण ही जी सर्वसमावेशकता आहे ती मुस्लीम धर्मामध्ये कशी निर्माण होईन यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी मुस्लीम युक्तीवादी, मुस्लीम शिकलेली मंडळी यांनी मुस्लीम धर्मामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जो हमीद दलवाईंनी केला होता. जो आता थोडा क्षीण झाल्यासारखं वाटत आहे.”
“ज्यावेळी आपल्या देशामध्ये हिंदूंमध्ये होते तसेच मुस्लीम धर्माची चिकित्सा सुरु होईन. मुस्लीम धर्म चिकित्सा आणि धर्म सुधारणा याची परंपरा अगदी सकसपणे जेव्हा सुरु होईन तेव्हाच मला वाटतं की हे वातावरण हे अत्यंत संवादाचं होईल आणि याची खूप आवश्यकता आहे.”
तर पुढे ते म्हणतात, “मला वाटतं कुठल्याही कलाकृतीचं उत्तर हे कलाकृतीतूनच दिलं पाहिजे. कलाकृतीवर आक्षेप घेता कामा नये. किंवा कलाकृती थांबवणं हे काही योग्य नाही. नाट्यक्षेत्रात आम्ही असं बघतोय की, सेलेक्टीव्ह पद्धतीने विचार मांडले जातात. आता संन्यस्त खड्ग नाटकावर बंदी घालण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे कुठल्याच कलाकृतीवर बंदी घालू नये. दुर्दैवाने लोक इथेही आपले झेंडे आणइ अजेंडे घेऊन येतात. विरोध जो आहे तो आविष्कार स्वातंत्र्याला नाही तर या मागे असणाऱ्या सिलेक्टिव्हीटीला आहे.”
‘इंशाल्ल्हा’च्या वेळी तुम्हाला असे अनुभव आले होते का?
या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, “इंशाल्ल्हा कांदबरीचं अभिवाचन पुण्यात तरुण भारत तर्फे ठेवण्यात आलं होतं त्यावेळी ते होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. परंतु तरुण भारत या मुद्द्यावर ठाम राहिलं. संपादक किरण शेलारही ठाम राहिले. आणि आम्ही कलावंतही ठाम राहिलो. थोड्याशा पोलीस संरक्षणामध्ये का होईन पण प्रयोग झाला. आणि अत्यंत यशस्वी झाला.”