"आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नाही, दुपारी ३ पर्यंत आझाद मैदान रिकामे करा, अन्यथा..."; जरांगेंना उच्च न्यायालयाकडून निर्वाणीचा इशारा

02 Sep 2025 15:03:31

Maratha protest

मुंबई : (Bombay HC's ultimatum to Manoj Jarange over Maratha protest) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत आमरण उपोषण चालू आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी पुन्हा सुनावणी झाली. यादरम्यान बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या जरांगे यांनी दुपारी ३ पर्यंत आपल्या समर्थकांसह आंदोलनस्थळ रिकामे करावे आणि मुंबई देखील सोडावी. अन्यथा आम्ही कारवाईचे आदेश देऊ, असा इशारा न्यायालयाने जरांगे यांना दिला. आम्हाला संपूर्ण मुंबई पूर्वपदावर आलेली हवी आहे, असेही न्यायालयाने इशारा देताना स्पष्ट केले.
 
मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. परिणामी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांना पुढील दोन तासांमध्ये आझाद मैदान खाली करावे लागण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, जरांगे यांनी केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांना उपोषण, आंदोलन करण्याची परवानगी नाकारली गेली आहे. त्यामुळे त्यांनी आझाद मैदान मोकळे करावे, आम्ही आंदोलन आयोजकांना दुपारी ३ पर्यंतची वेळ देतो. आझाद मैदान मोकळे करा, अन्यथा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल आणि भलामोठा दंडही आकारला जाईल, असेही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने जरांगे आणि आंदलनाच्या आयोजकांना बजावले.



Powered By Sangraha 9.0