
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राजकारण करण्याची उद्धव ठाकरे यांची जुनीच सवय! त्यात आता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील मीनाताई ठाकरे अर्थात माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकून एका इसमाने पुतळ्याची विटंबना केली. ही माहिती कळताच उद्धव ठाकरेंसह त्यांचे अनेक नेते तिथे दाखल झाले. वास्तविक मीनाताई ठाकरे यांना मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आदराचे स्थान. त्यामुळे घडलेली घटना ही १०० टक्के निषेधार्हच असून हे कृत्य करणाऱ्याला कठोर शासन व्हायलाच हवे. परंतु, या घटनेतही मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यांपुढे ठेवणार नाहीत, ते ठाकरे कसले? अनिल देसाई यांनी तर या घटनेचे खापर थेट सरकारवरच फोडले!
चौकशीअंती मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकून विटंबना करणारा हा इसम दुसरा तिसरा कुणी नसून उबाठा गटाच्याच एका कार्यकर्त्याचा नातेवाईक असल्याचे समजते. उपेंद्र पावसकर असे त्याचे नाव. पावसकर कुटुंबात सुरू असलेल्या संपतीच्या वादात ठाकरे पिता-पुत्र हस्तक्षेप करत होते आणि याच रागातून त्याने हे कृत्य केल्याचे सूत्रांचे म्हणणे. हे सगळे कळल्यानंतर ठाकरे गटात मात्र स्मशानशांतता पसरलेली दिसते.
दुसरीकडे उपेंद्र पावसकरांवरील कथित अन्यायामुळे शिवसेना-भाजप युतीच्या सत्ताकाळातील रमेश किणी प्रकरणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दि. २३ जुलै १९९६ रोजी पोलिसांना पुण्यातील ‘अलका टॉकीज’मध्ये माटुंग्याचे रहिवासी असलेल्या रमेश किणी यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणात किणी यांच्या पत्नीने थेट राज ठाकरेंवर आरोप केले होते. रमेश किणी यांचे कुटुंब राहात असलेले भाड्याचे घर खाली करण्यासाठी राज यांच्यामार्फत त्यांचे घरमालक मानसिक छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता पावसकर यांनीही उद्धव आणि आदित्य या ठाकरे पिता-पुत्राकडे संशयाची सुई वळवल्याचे दिसते. मुळात कोणत्याही घटनेची शहानिशा होण्यापूवच स्वतःच्या सोयीने मनाला येईल तसा कांगावाखोरीत उद्धव ठाकरे पहिल्या फळीतले खेळाडू. आपल्या आईवडिलांनी केलेल्या सत्कर्माचा आधार घेऊन भावनिक कार्ड खेळण्यात ते तरबेज आहेत. मात्र, आता माँसाहेबांच्या पुतळ्यावरून भावनिक राजकारण करू पाहणाऱ्या उद्धव ठाकरेंचीच नाचक्की झाल्याने, बोलण्यासारखे त्यांच्याकडे काहीही नाही.
राहुलमार्गावरील रोहित...
विधानसभा निवडणुकीतील अपयश अजूनही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना पचवता आलेले नाहीच. निवडणुकीत आपली दाणादाण उडाली आणि आपण विरोधी बाकावर बसलो, यावर अजूनही त्यांचा विश्वासच बसत नसावा. त्यामुळेच पराभव झाकण्यासाठी सकाळ-संध्याकाळ मतदारयादी आणि ‘ईव्हीएम’मधील घोळाचा कंठशोष सुरू असतो. मात्र, खोटे कितीही रेटून सांगितले, तरी ते सत्य होत नाही! महायुती सरकारची मुंबईतील विकासकामे आणि एकूणच मुंबईचा केलेला कायपालट, या जोरावर अलीकडेच मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार, हा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे मविआतील नेत्यांना तो खुपला. रोहित पवारांनाही मिरची लागली आणि त्यांनी पुन्हा मतदारयादी आणि ‘ईव्हीएम’चा ढोशा सुरु केला. मुख्यमंत्री देवाभाऊंनी पालिका निवडणुकीतील विजयाचा दाखवलेला पराकोटीचा आत्मविश्वास, मतदारयादी, ‘ईव्हीएम’ मशीन आणि निवडणूक यंत्रणा हाताशी असल्याशिवाय येणार नाही, असे त्यांचे म्हणणे. मुळात, घराणेशाहीतून मिळालेली आमदारकी आणि त्यातून महाविकास आघाडीत राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणे हे त्यांचे आद्यकर्तव्य. मग राहुलबाबांची मतचोरी आणि ‘ईव्हीएम’ची री पुढे ओढण्यात रोहित पवार तरी कसे मागे राहतील म्हणा? पण, हीच री ओढता ओढता रोहित पवारांचा अभ्यास कमी पडत असावा.
वास्तविक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महापालिका जिंकण्याचा हा आत्मविश्वास त्यांनी केलेली कामे आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आहे. रोहित पवारांचे आजोबा चारवेळा मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, बुलेट ट्रेन, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग ही आणि यासारखे कितीतरी प्रकल्प पूर्ण करण्याचे स्वप्नही पाहिले नसावे. याउलट, मुख्यमंत्री फडणवीसांनी हेच प्रकल्प पूर्ण करून दाखवले. जनता डोळे उघडे ठेवून हे सगळे बघत आहे. त्यामुळे विकास निवडायचा की घराणेशाही, हे ठरवण्यासाठी जनता सुज्ञ आहे. विरोधकांनी मात्र, पराभवाचे आत्मपरीक्षण केले नाही, तर ‘ईव्हीएम’ आणि ’मतचोरी’ या शब्दांचा वीट येऊन जनता पुन्हा एकदा मविआला त्यांची जागा दाखवून देईल, हे निश्चित!