बिहारमध्ये रणनीतींचा खेळ...

19 Sep 2025 12:00:59

बिहार विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे वातावरण तापले असून, सर्वच पक्ष यंदा संपूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी यांच्या व्होटर अधिकार यात्रेनंतर राजदचे तेजस्वी यादव यांनी बिहार पिंजायला सुरुवात केली, तर दुसरीकडे प्रशांत किशोर यांनीही तळागाळातील सभांवर भर दिलेला दिसतो. भाजपतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बिहार दौराही नुकताच संपन्न झाला. त्यानिमित्ताने बिहारमधील रणनीतींच्या खेळाचा मांडलेला हा राजकीय सारीपाट...

बिहारची विधानसभा निवडणूक जवळ येत असताना प्रत्येक पक्षाने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केलेली दिसते. अशा पार्श्वभूमीवर भाजपचे ‘चाणक्य’ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बिहार दौऱ्यावर पोहोचले. बुधवारी उशिरा पटना येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांशी एकामागून एक चर्चा केली. गुरुवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी भेट घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला आणि निवडणुकीची रणनीती यावर सविस्तर चर्चा केल्यानंतर ते डेहरीकडे रवाना झाले. एनडीएची तुलनेने कमकुवत कडी मानल्या जाणाऱ्या या भागातील जागांचे गणित आणि स्थानिक समीकरण तपासल्यानंतर शाह थेट भूमिहार मतदारांचा प्रभाव असलेल्या बेगूसरायला पोहोचले. सासारामवरून थेट बेगूसराय गाठणे हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा होता. यावरून भाजप आपले मजबूत किल्ले भेदले जाणार नाहीत, याबाबत किती सजग आहे, हे स्पष्ट झाले. कारण, बेगूसराय व परिसरावर प्रशांत किशोर यांची जन सुराज पाट आणि तेजस्वी यादव यांची नजर आहे. अलीकडेच प्रशांत किशोर आणि तेजस्वी यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमा झाला होता. त्यास प्रत्युत्तर प्रभाव कमी करण्यासाठी शाह बेगूसरायमध्ये खास रणनीती आखत असल्याचे स्पष्ट दिसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शाह मैदानात उतरले आहेत. शाह नेमके बेगूसरायमध्ये का आले, याबाबत विविध तर्क लढविले जात आहेत. असे म्हटले जात आहे की, बेगूसरायच्या सात विधानसभा जागांवर तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पाटने विद्यमान खासदार-आमदारांविरोधातील नाराजीचा मोठ्या प्रमाणात फायदा उठवला आहे. भाजपच्या परंपरागत भूमिहार व ब्राह्मण मतदारांतही स्थानिक प्रतिनिधींबद्दल रोष निर्माण झाल्याची चर्चा होती. तेजस्वी यादव यांनी मटिहानी, तेघडा, साहेबपूर कमाल, बखरी आणि चेरियाबरियारपूर या जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भाजपला आपला पारंपरिक मतदारवर्ग एकत्र ठेवण्यासाठी बेगूसरायला विशेष महत्त्व द्यावे लागत आहे.

यावेळी महागठबंधनही निवडणुकीच्या मैदानात पूर्ण जोर लावत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींपासून राजदचे नेता तेजस्वी यादवांपर्यंत सर्वजण सतत जमिनीवर उतरून सत्ताविरोधी लाट निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपनेही आपली रणनीती ठरवून त्यावर काम सुरू केले आहे. राज्याला पाच विभागांत विभागण्यात आले असून शाह दोन विभागांच्या बैठकींना उपस्थित राहिले. डेहरी येथील बैठकीत रोहतास, कैमूर, आरा, बक्सर, पूव व पश्चिमी गया, नवादा, जहानाबाद, अरवल आणि औरंगाबाद या भागांतील खासदार, आमदार, विधान परिषदेचे सदस्य आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले. या बैठकीत शाहंनी खास करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दि. १८ ते दि. २५ सप्टेंबरदरम्यान चालणाऱ्या भाजपच्या ‘घर-घर संपर्क अभियान’ला गती देण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. पाटणा येथे सुमारे आठ ते दहा हजार हिंदू साधू-संतांसोबत होणाऱ्या बैठकीलाही त्यांनी विशेष महत्त्व दिले. बेगूसरायच्या बैठकीत पाटणा ग्रामीण, पाटणा महानगर, बाढ, नालंदा, शेरपुरा, मुंगेर, जमुई, लखीसराय, खगडिया व बेगूसराय या जिल्ह्यांतील खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य व पदाधिकारी सहभागी झाले. येथे निवडणुकीची तयारी व संभाव्य उमेदवारांबाबत सविस्तर चर्चा झाली.

शाह म्हणाले की, आजची बैठक केवळ नेत्यांची नाही, तर कार्यकर्त्यांची आहे. कारण, निवडणूक जिंकवून देणारी खरी ताकद ही कार्यकर्त्यांचीच असते. त्यांनी एक प्रसंग सांगितला की, सकाळी एका पत्रकाराने विचारले, “चुनावी मौसमात सभा घेण्याऐवजी कार्यकर्त्यांची बैठक का?” त्यावर शाह म्हणाले की, “इतर पक्षांत निवडणूक नेते जिंकवतात, पण भाजपमध्ये माझा कार्यकर्ता जिंकवतो. प्रत्येक राष्ट्रीय नेत्याने बूथ कार्यकर्त्यापासून आपली सुरुवात केली आहे, हीच पक्षाची खरी ताकद आहे.” रोहतास, बक्सर, भोजपूर, कैमूर, गया, नवादा, अरवल, जहानाबाद आणि औरंगाबाद येथील कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले होते.

यावेळी शाहंनी आपल्या नेहमीच्या शैलीत लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधींवर हल्ला चढवला. नितीशकुमार सरकारने बिहारसाठी केलेले काम घराघरांत पोहोचवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधींवर टीका करताना त्यांनी उपस्थितांना विचारले की, “घुसखोरांना मताधिकार असावा का, त्यांना रेशन-आयुष्मान कार्ड मिळावे का?” त्यांनी लालूंवर निशाणा साधत म्हटले की, “एनडीए सरकारने जे काम केले, ते लालूंनी आयुष्यभरातही करू शकले नाहीत. उलट त्यांनी चारा घोटाळा, ‘लॅण्ड फॉर जॉब स्कॅम’ यांसारखे घोटाळेच केले. इतक्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ग्रस्त असलेले युपीए बिहारचे भले करू शकते का?” एका बाजूला भ्रष्टाचाराने वेढलेली सरकारे आणि दुसऱ्या बाजूला मोदींचे एकही डाग नसलेले सरकार, असे चित्र शाहंनी उभे केले.

दरम्यान, प्रशांत किशोर यांचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. पी. के. यांनी प्रत्येक पक्ष आणि नेत्याविरुद्ध ‘किल्ला उखाड’ मोहीम छेडली आहे. त्यांचा नवा दावा असा आहे की, बिहारच्या राजकारणावर केवळ १ हजार, २०० कुटुंबांचे वर्चस्व आहे. याच कुटुंबांचे सदस्य निवडणुकीत उतरतात आणि जिंकतात. त्यामुळे त्यांनी आता या कुटुंबांचा प्रभाव संपवण्यासाठी रणनीती आखल्याचे जाहीर केले आहे. २०२५ च्या निवडणुकीत ही रणनीती किती प्रभावी ठरेल, हा मोठा प्रश्न आहे.

पीकेंची ही मोहीम एनडीए आणि महागठबंधन या दोन्हींसाठी मोठे आव्हान ठरू शकते, असा बिहारच्या राजकारणाचे जाणकार असलेल्यांचा अंदाज आहे. त्यांचा घराणेशाहीवरील हल्ला थेट राजदवर आहे, ज्यामुळे त्यांचा पारंपरिक आधारवर्ग हलू शकतो. त्याचवेळी एनडीएविरुद्ध नाराजी असलेले, पण आरजेडीला मत न देणारे मतदारही जन सुराजकडे वळू शकतात. त्यामुळे दोन्ही आघाड्यांच्या मतबँकेत तडे जाऊ शकतात. अशा परिस्थितीत २०२५ची निवडणूक केवळ दोन आघाड्यांतील सरळ लढतीची राहणार नसून, प्रशांत किशोर या तिसऱ्या पर्यायामुळे ती अधिक गुंतागुंतीची होणार आहे.


Powered By Sangraha 9.0