कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली - मंत्री मंगलप्रभात लोढा

19 Sep 2025 17:03:08

मुंबई :
कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली असून कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी केले.

केंद्रीय कौशल्य विकास विभाग व राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे 'क्षमता वृद्धी व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कौशल्य विकास विभागाच्या सचिव देबश्री मुखर्जी, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) च्या कार्यकारी सदस्य डॉ. विनीता अग्रवाल, संचालक गुंजन चौधरी, महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "कौशल्य विकासमध्ये केवळ योजनांची आखणी नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराज्य कौशल्य विकासातील यशोगाथा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुसंवाद, समन्वय आणि एकात्मता असणे ही काळाची गरज आहे. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये राज्यांनी आपापसात अधिक सुसंवाद ठेवून ‘टीम इंडिया’ म्हणून कार्य करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ च्या स्वप्नाला साकार करूया. समन्वय ही क्षमता बांधणी इतकीच महत्त्वाची बाब आहे. केवळ क्षमता वाढवून चालणार नाही, तर ती कुठे वापरायची यासाठी योग्य समन्वय आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक तीन महिन्यांत राज्यस्तरीय, आणि दरवर्षी एकदा राष्ट्रीय पातळीवर सर्व कौशल्य विकास विभागाची बैठक अनिवार्य आहे," असे ते म्हणाले.

'जॉब मॅचिंग ब्युरो’ सुरू करणे गरजेचे


"कष्टकऱ्यांना सन्मान मिळणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीतील कौशल्य असणे ही चांगली गोष्ट असून कौशल्य प्राप्त माणूस कोणते काम करतो यापेक्षा त्याच्याकडे कोणते कौशल्य आहे, हे बघून त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. महाराष्ट्रात उच्चशिक्षित युवकांची मोठी संख्या आहे आणि एकाच वेळी अनेक कंपन्यांकडे हजारो जागा रिक्त आहेत. पण दोघांना जुळवून देणारी यंत्रणा कमी आहे. यासाठी ‘जॉब मॅचिंग ब्युरो’ सुरू करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सर्वप्रथम कौशल्य विकास मंत्रालय स्थापन करून या क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. ही एकदिवसीय कार्यशाळा न राहता, देशभरातल्या स्किलिंग लीडर्सचे नेटवर्क तयार होण्याचे माध्यम व्हावे," असेही मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.
Powered By Sangraha 9.0