"मी पाकिस्तानला गेलो होतो, तेव्हा मला घरी असल्यासारखंच वाटलं"; काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांच्याकडून पाकप्रेमाची कबुली!

19 Sep 2025 14:57:50

नवी दिल्ली : (Sam Pitroda) इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा हे अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, आता सॅम पित्रोदा यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. "मी पाकिस्तानला गेलो होतो, तेव्हा मला घरीच असल्यासारखं वाटलं", असं विधान सॅम पित्रोदा यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

सॅम पित्रोदा यांनी काय म्हटलं?

"माझं मत असं आहे की, आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणांमध्ये सर्वात प्रथम आपल्या शेजारच्या देशांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण आपल्या शेजारच्या देशांशी संबंध खरोखरच सुधारू शकतो का? मी देखील पाकिस्तानला गेलो होतो, मी तुम्हाला सांगतो की, मला घरी असल्यासारखंच वाटलं. मी बांगलादेशला गेलो, मी नेपाळला गेलो तेथेही मला मला घरी असल्यासारखं वाटलं. मला परदेशात असल्यासारखं वाटलं नाही', असं सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे.

भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी काय म्हणाले?

सॅम पित्रोदा यांच्या या विधानाचा व्हिडीओ भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एक्सवर शेअर करत जोरदार टीका केली आहे प्रदीप भंडारी यांनी म्हटलं की, "राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि काँग्रेस ओव्हरसीज प्रमुख सॅम पित्रोदा म्हणतात की, त्यांना पाकिस्तानमध्ये 'घरच्यासारखं वाटलं'. २६/११ नंतरही यूपीए सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली नाही, यात आश्चर्याची बाब नाही", असं प्रदीप भंडारी यांनी म्हटलं आहे.




Powered By Sangraha 9.0