राहुल गांधींची भाषा अर्बन माओवाद्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; आ. गोपीचंद पडळकर यांना दिली समज

19 Sep 2025 17:11:12

मुंबई : राहुल गांधी यांनी भाषा अर्बन माओवाद्यांची असून त्यांना सल्ला देणारे सगळे लोक अर्बन माओवादी विचारधारा ठेवणारे आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी केली.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राहुल गांधी यांचा मेंदू चोरीला गेला आहे, हे मी आधीच सांगितले आहे. त्यामुळेच ते असे बोलतात. त्यांना देशाच्या संविधानाविषयी कुठलीही आस्था नाही. तसेच संविधानाने तयार केलेल्या संस्था त्यांना नको आहेत. आता तर त्यांनी ते अर्बन माओवादी असल्याचा पुरावाच दिला आहे. अर्बन माओवाद्यांची भाषा ते करत आहेत. जेन झी ने येऊन संविधानिक सरकारला उलटवून लावावे असे ते सांगतात. अर्बन माओवादीसुद्धा यापेक्षा वेगळी भाषा बोलत नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांना सल्ला देणारे सगळे लोक अर्बन माओवादी विचारधारा ठेवणारे आहेत. परंतू, भारताची जेन झी ही संविधानावर विश्वास ठेवते. स्टार्ट अप इकोसिस्टिम चालवणारी आणि परिवर्तन करणारी जेन झी आहे. त्यांना तंत्रज्ञान माहिती आहे. राहुल गांधींना जेन झी माहिती नाही, ते देशातील युवा वर्गाला आणि वृद्धांनाही ओळखत नाहीत. त्यांना काहीही माहिती नाही."

कुणाच्याही परिवाराबद्दल बोलणे योग्य नाही

आ. गोपीचंद पडळकर यांनी आ. जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे असे माझे मत नाही. कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल वक्तव्य करणे योग्य नाही. यासंदर्भात मी त्यांच्याशी बोललो आहे. मला शरद पवारांचा फोन आला होता. तेसुद्धा यासंदर्भात माझ्याशी बोलले आहेत. आम्ही अशा विधानांचे कधीच समर्थन करणार नाही, असे मी त्यांना सांगितले आहे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पडळकर तरुण आणि आक्रमक नेते

"गोपीचंद पडळकर हे तरूण आणि अतिशय आक्रमक नेते आहेत. अनेकवेळा आक्रमकता दाखवताना आपल्या बोलण्याचा काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. त्यामुळे हे लक्षात घेऊनच आपण आक्रमकता ठेवली पाहिजे असे त्यांना मी सांगितले. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील याचा विचार करावा, असा सल्ला मी त्यांना दिला," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

स्टील महाकुंभाबात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज स्टील महाकुंभ संपन्न झाला असून देशभरातील स्टील सेक्टरमधील लोक एकत्रित आले आहेत. ग्रीन स्टील अशी या स्टील महाकुंभाची थीम आहे. स्टील निर्माणामध्ये अपारंपारिक उर्जास्त्रोत वापरून ग्रीन स्टील कसे तयार करता येईल, अशी ही थीम आहे. केंद्रीय मंत्र्यांनी याठिकाणी चांगली योजना मांडली. ग्रीन स्टील उत्पादनासाठी केंद्र सरकारने ५ हजार कोटी रुपयांचा निधी ठेवलेला आहे. याचा जास्तीत जास्त उपयोग करणे हा आमचा प्रयत्न असेल. स्टील तयार करण्यात महाराष्ट्र हा देशात चौथ्या क्रमांकावर असून पुढच्या आठ वर्षात तो देशात पहिल्या क्रमांकावर येईल. तसेच ग्रीन स्टील निर्यातीतसुद्धा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे. त्यादृष्टीने उद्योजक आणि केंद्र सरकारची मदत आम्ही घेणार आहोत. आजही स्टीलच्या क्षेत्रात आम्ही ८० हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. ७ वेगवेळ्या कंपन्यांसोबत विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या तीन भागांमध्ये हे करार झाले आहेत. आज आणलेल्या गुंतवणूकीमुळे १ लाख रोजगार तयार होणार आहे. यामुळे महाराष्ट्रात स्टील सेक्टरला नवी उभारी येईल. गडचिरोली हे नवीन स्टील हब म्हणून विकसित होत आहे. यासोबतच चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा अशा लगतच्या भागातही हे उद्योग येत आहेत."

"२००५ पासून २०२५ पर्यंत औद्योगिक विजेचे दर हे सरासरी ९ टक्क्यांनी वाढले आहेत. पण आता २०२५ ते २०३० मध्ये महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मंजूर केल्यानुसार यामध्ये वाढ होणार नसून दरवर्षी २ ते ३ टक्क्यांनी हे दर कमी होणार आहेत. २०३० साली जवळपास १० टक्क्यांनी हे दर कमी असतील. त्यामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळतो आहे," असेही त्यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0