
विद्यार्थ्यांना संगीतासोबत बासरीवादनाचे प्रशिक्षण देणाऱ्या दीपक भानुसे यांनी तयार केलेली ‘मृदीप वेणू’ म्हणजे मातीची बासरी हा संगीतक्षेत्रातील एक आविष्कारच! त्यांच्याविषयी..पुण्यातील बहुतांश पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्रवेश केला की, बासरीची एक मधुर धून कानांवर पडते. बरेचदा स्वागतकक्षाच्याच शेजारी एक तरुण बासरी वाजवत बसलेला असतो. एकाग्र चित्ताने त्याची बासरीची धून ऐकली की मनही कुठच्या कुठे हरवून जाते. पुण्यात येणाऱ्या परदेशी नागरिकांना तर बासरीच्या या धूनची अगदी भुरळ पडलेली. बासरी वाजवताना संपूर्ण शरीर एकाग्र करून प्रत्येक श्वासावर नियंत्रण ठेवावं लागतं. यासाठी सराव अत्यंत महत्त्वाचा. त्यात पुण्यात बासरीवादनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे तर मोजकेच. त्यांपैकी एक म्हणजे दीपक भानुसे.
दीपक इयत्ता आठवीमध्ये असतानाच संगीत शिक्षण घेऊन करिअर करण्याचे ठरले आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. जालना जिल्ह्यातील तीर्थपुरीजवळील मुरमा नावाचे एक छोटेसे गाव. तिथूनच दीपकचा संगीतप्रवास सुरू झाला. शाळेतील संगीतस्पर्धा, नृत्य आणि रंगमंचाच्या उपक्रमांत सक्रिय राहण्याचा त्यांना फायदा झाला. स्वतः संगीतबद्ध केलेल्या चाली, रचलेल्या कविता यांचे रंगमंचावर सादरीकरण दीपकच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. त्यातून त्याला संगीताची आवड निर्माण झाली. दहावीनंतर छत्रपती संभाजीनगर येथे आल्यावर देवगिरी कॉलेजमध्ये संगीताचा रीतसर अभ्यास सुरू झाला. ‘गायन’ विषयात त्यांनी ‘बी.ए.’ पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर पदवी घेतली. संगीतात, विशेषतः बासरीत एम.ए. केले आणि संस्कृतमध्ये ‘मास्टर्स’पदवीदेखील घेतली. पंडित केशव गिंडे यांच्याकडून २० वर्षांपासून ते बासरीचे शिक्षण घेत आहेत. एवढेच नाही तर त्यांनी बासरीवादनात अनेक बदलदेखील केले. दीपक यांना शास्त्रीय संगीतात रमायला अधिक आवडते, म्हणूनच मग ते बासरीवादनदेखील ते शास्त्रोक्त आधारावर करतात. मालिका आणि लघुपटांसाठीदेखील ते संगीत देतात. त्यांनी भारताच्या अनेक राज्यांत बासरीवादनाचे कार्यक्रम केले आहेत. तसेच परदेशातही सादरीकरण केले. विशेष म्हणजे, अमेरिकेतील १४ राज्यांमध्ये देखील त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. आता महिनाभरासाठी ते युरोप दौऱ्यावर रवाना होणार आहेत.
शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी दीपक यांनी ‘केशव वेणू फाऊंडेशन’ची स्थापना केली. पंडित केशव गिंडे यांनी डिझाईन केलेली ‘केशव वेणू’ बासरी, ज्यात ४२ इंच लांब आणि १२ छिद्रे असलेली बासरी आहे आणि ‘लिम्का’ आणि ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये या बासरीची नोंददेखील आहे. रंगमंचावर दीपक या बासरीच्या धूनमधून त्यांच्या श्रोत्यांशी संवाद साधत असतात. अशा या बासरीवादनात प्रावीण्य संपादित केलेल्या दीपक यांना ‘अमूल्य ज्योती संस्था, पुणे’ यांच्यातर्फे पंडित पन्नालाल घोष पुरस्काराने सन्मानितदेखील करण्यात आले आहे. तसेच ‘वेणुविद्या’ शिष्यवृत्तीदेखील त्यांना मिळाली.
खरे तर संगीत वाद्यांमध्ये सर्वच प्रकारची वाद्यं रसिकांना भुरळ घालीत असतात. मात्र, बासरीची बातच काही और! अगदी पुरातन काळापासून प्रचलित असलेल्या या वाद्याचा इतिहासदेखील रंजक आहे आणि म्हणूनच बासरीची भुरळ वाजवणाऱ्याला जितकी पडली, तेवढी ऐकणाऱ्यालादेखील पडल्याशिवाय राहत नाही. आजदेखील कोणताही कार्यक्रम असो, बासरीची धून आपले वेगळेपण सिद्ध करते. दीपकसारखे तरुण आजच्या तंत्रज्ञानाच्या काळातदेखील याकडे आकृष्ट होतात, यातच या वाद्याची महती लक्षात यावी. दीपक यांनी यासाठी अतिशय निष्ठेने अभ्यास करीत आपल्या वादनाने रसिकांना निखळ आनंद दिला. कालानुरूप त्यात ते बदल करीत जुन्या रसिकवर्गासह नव्यांनादेखील मोहित करण्यात यशस्वी होतात, यात त्यांच्या यशाचे गमक दडलेले आहे. बासरीवादनासोबतच बासरीनिर्मितीतील वैविध्य हेदेखील एक त्यांचे या क्षेत्रातील वैशिष्ट्य. वाद्यनिर्मिती क्षेत्रात आज क्रांती झाली आहे. पण, तरीही या आधुनिक काळात वाद्यांनी एक मोठा रसिकवर्ग अजूनही बांधून ठेवला आहे. मात्र, आपल्या परंपरागत वाद्यांची ओळख अबाधिक राहावी, म्हणून दीपक यांची चाललेली एकूणच धडपड अतिशय स्तुत्य आणि स्पृहणीय अशीच.
बासरीनिर्मितीतदेखील त्यांनी आविष्कार घडविला. याच वष दीपकने मातीची बासरी (मृदीप वेणू) बनवली, जे वाद्यनिर्मिती क्षेत्रातील एक आश्वासक यश म्हणावे लागेल. त्यांनी निर्मित केलेली ही मातीची बासरी ३० इंच लांब आहे. त्या बासरीकडे बघून तज्ज्ञ संगीतकार म्हणाले की, या बासरीत केलेले बदल इतके वेगळे आहेत की, ते भरतनाट्यशास्त्रात वर्णन केलेल्या मातीच्या बासरीची आठवण करून देतात. दीपक या मातीच्या बासरीवर संपूर्ण शास्त्रीय संगीत मैफील आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ही आपल्या देशाच्या मातीपासून बनलेली बासरी आहे . जगाला या बासरीचा मधुर स्वर ऐकवायचा आहे, अशी त्यांची भावना. अतिशय मोठे आणि सुरेल स्वप्न उराशी बाळगून असलेल्या दीपक यांची ही महत्त्वाकांक्षा नक्कीच पूर्ण होईल, याबद्दल संदेह बाळगण्याचे कारण नाही. कारण, हा देश कौशल्य विकसित करणाऱ्या तरुणांचा देश म्हणून आता उदयास येत आहे. आत्मनिर्भरतेचे पंख त्याला लाभले आहेत. दीपक यांच्यासारखी ही उदयोन्मुख पिढी यासाठी परिश्रम घेत आहे. त्यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अनेकानेक शुभेच्छा!
शशांक तांबे
(अधिक माहितीसाठी संपर्क : ७२७६७८२९७८)