पुणे : (Major General VV Bhide) १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात (बांगलादेश मुक्ती संग्राम) महत्त्वाची भूमिका बजावणारे मेजर जनरल व्ही. व्ही. भिडे यांचे १०२ व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी पुण्यातील बावधन येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यासंदर्भात द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
बांगलादेश युद्धाच्या काळात तत्कालीन ब्रिगेडियर भिडे यांची ईस्टर्न कमांडचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पूर्व पाकिस्तानमधील कठीण भौगोलिक परिस्थितीत, विशेषतः अनेक नद्या, दलदली आणि खराब रस्ते यामुळे सैन्याची हालचाल अडचणीत येत होती. अशा वेळी भिडे यांनी तात्काळ पूल, रस्ते आणि लॉजिस्टिक सुविधा उभारण्याचे काम हाती घेतले. त्यांनी डझनभर पूल वेळेत बांधून भारतीय सैन्याला जलद हालचाली शक्य करून दिल्या. या कामगिरीमुळे भारताला युद्धात निर्णायक विजय मिळवता आला. त्यांच्या या अतुलनीय सेवेसाठी १९७२ साली त्यांना ‘विशिष्ट सेवा पदक (AVSM)’ प्रदान करण्यात आले.
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मेजर जनरल भिडे हे एक प्रतिष्ठित कुटुंबातून आले होते. त्यांचे वडील भारतीय नागरी सेवेत अधिकारी होते, तर आजोबा नामवंत वकील होते. नागपूरमध्ये जन्मलेले भिडे, वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर अमरावती येथे आजोबांकडे वाढले. ते १९३५ साली डून स्कूलच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. १९४२ मध्ये रॉयल बॉम्बे सॅपर्समध्ये त्यांची निवड झाली होती. बॉम्बे सॅपर्समधील सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून ते ओळखले जात होते.