ग्रीन स्टील क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; आयफा २०२५ स्टील महाकुंभचे मुंबईत उद्घाटन संपन्न

19 Sep 2025 18:43:56

मुंबई : ग्रीन स्टील उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम राज्य बनवायचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी केले.

गोरेगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेल्या एआयआयएफए (आयफा) स्टीलेक्स २०२५ या स्टील महाकुंभच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बळगन, यू.एन.डी.पी. इंडिया प्रमुख डॉ. अँजेला लुसी, आयफाचे अध्यक्ष योगेश मंधाणी, आयफाचे मानद सरचिटणीस कमल अग्रवाल, यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली तेव्हा अनेकांना हे अशक्य ध्येय आहे असे वाटले. पण भारताने वेळेआधी ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कपात आणि ऊर्जा निर्मिती व्यवस्थेत बदल करून दाखवले. आता भारत पर्यावरणीय शाश्वततेचे उदाहरण ठरत आहे. सन २०३० पर्यंत महाराष्ट्राच्या ऊर्जा मिश्रणात ५८ टक्के वीज ही अक्षय ऊर्जेतून येणार आहे. २०२६ पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणारी १६ हजार मेगावॅट वीज पूर्णपणे सौरऊर्जेतून दिली जाणार आहे. त्यामुळे वीजदरांवरील अनुदान कमी होणार असून उद्योगांसाठी वीजदर पुढील पाच वर्षे दरवर्षी कमी होणार आहे."

गडचिरोली होणार नवीन स्टील सिटी


"गडचिरोली हा नक्षलवादासाठी ओळखले जाणारा भाग आता देशाची नवी स्टील सिटी होणार आहे. गेल्या दहा वर्षांत तेथील माओवाद संपुष्टात आणण्यात आला असून स्थानिक समुदाय स्टील उद्योगाला पाठिंबा देत आहेत. राज्यात आतापर्यंत स्टील उद्योग क्षेत्रात ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून पुढील काळात महाराष्ट्र देशात स्टील उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"गडचिरोलीत ५ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यापैकी ४० लाख झाडे लावण्यात आली आहेत. गडचिरोलीत जल, जमीन, जंगल यांचे जतन आणि संवर्धन करत स्टील उद्योगासाठी नवी इकोसिस्टम उभारणार आहोत. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया, गॅस व्हॅल्यू चेन आणि बॅटरी स्टोरेज यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. पंप स्टोरेज प्रकल्पांसाठी महाराष्ट्राने आतापर्यंत ७५ हजार मेगावॅटचे सामंजस्य करार केले आहे, दोन वर्षांत ७ हजार मेगावॅट वीज उत्पादन सुरू होईल. यामुळे ग्रीन पॉवर २४/७ उपलब्ध करून देता येईल आणि या माध्यमातून देशाच्या ग्रीडचे स्थिरीकरण करण्याचे मोठे काम महाराष्ट्र करणार आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

देशाने ऊर्जा क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडवले - केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी


"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे पीएम-कुसुम योजनेंतर्गत राज्याला ३ हजार ५०० कोटींचे अनुदान वाटप करण्यात आले असून २०३० पर्यंत ५ लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजन उत्पादन क्षमतेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पुणे हायड्रोजन व्हॅली इनोव्हेशन क्लस्टरला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली असून सर्व परवानग्या राज्य शासनाने तत्परतेने दिल्या आहेत. हे केवळ आर्थिक परिवर्तन नसून पुढच्या पिढ्यांसाठी पृथ्वी सुरक्षित ठेवण्याचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने ऊर्जा क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत. २०१४ मध्ये नूतनीकरणक्षम ऊर्जा उत्पादन केवळ २.४४ गीगावॅट इतके होते, तर आज ते जवळपास ३० गीगावॅटपर्यंत पोहोचले आहे. आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा नॉन-फॉसिल ऊर्जा उत्पादक देश आहे," असे केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.


८० हजार ९६२ कोटींचे सामंजस्य करार

या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागांमध्ये महाराष्ट्र शासन आणि स्टील आणि सहाय्यक उद्योगासंबंधित कंपन्यांसमवेत ९ सामंजस्य करार करण्यात आले. या करारांद्वारे एकूण ८० हजार ९६२ कोटींची गुंतवणूक होणार असून ९० हजार ३०० रोजगार संधी निर्माण होणार आहेत. तसेच यावेळी उद्योजक कंपन्यांना ग्रीन स्टील प्रमाणपत्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.


कंपन्या, गुंतवणूक आणि रोजगार

१) सुमेध टूल्स प्रा. लि. (गडचिरोली) - गुंतवणूक २ हजार कोटी आणि १५०० रोजगार संधी

२) हरिओम पाईप्स (गडचिरोली) - गुंतवणूक ३ हजार १३५ कोटी आणि २५०० रोजगार संधी

३) आयकॉन स्टील इंडिया प्रा. लि. (चंद्रपूर) - गुंतवणूक ८५० कोटी आणि १५०० रोजगार संधी

४) रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा.लि. (गडचिरोली) - गुंतवणूक २५ हजार कोटी आणि २० हजार रोजगार संधी

५) जयदीप स्टील वर्क्स इंडिया प्रायव्हेट लि. (नागपूर) - गुंतवणूक १ हजार ३७५ कोटी आणि ६०० रोजगार संधी

६) जी. आर. कृष्णा फेरो अलॉयज प्रा. लि. (चंद्रपूर) - गुंतवणूक १ हजार ४८२ कोटी आणि ५०० रोजगार संधी

७) एनपीएसपीएल अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल(अथा ग्रुप) (छत्रपती संभाजीनगर) - गुंतवणूक ५ हजार ४४० कोटी आणि २५०० रोजगार संधी

८) फिल्ट्रम ऑटोकॉम्प प्रा. लि. (सातारा) - गुंतवणूक १०० कोटी आणि १२०० रोजगार संधी

९) जिंदाल स्टेनलेस (रायगड) - गुंतवणूक ४१ हजार ५८० कोटी आणि ६० हजार रोजगार संधी


Powered By Sangraha 9.0