देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

19 Sep 2025 18:10:39

मुंबई, "देशातील प्रत्येकजण अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या समाजासाठी आणि विकासप्रक्रियेकरीता आपला वाटा उचलत आहे. हेच आपल्या देशात घडलेले सर्वात मोठे परिवर्तन आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. शुक्रवार,दि.१९ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ऑर्गनाईसद्वारे आयोजित आणि एनएसईच्या सहकार्याने 'अर्थायम- धार्मिक मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या 'एकात्म मानव दर्शन'च्या ६० व्या वर्षाचे स्मरण करत विचारप्रवर्तक चर्चा झाली.

यादरम्यान व्यासपीठावर एनएसइचे सीईओ आशिष चौहान आणि ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर उपस्थित होते. सदर परिसंवादात्मक कार्यक्रम एकूण सहा सत्रात विभागण्यात आला होता. या सहा सत्रात विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी ऑर्गनायझर प्रकाशित '१०० इयर्स ऑफ आरएसएस' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

उपस्थितांना संबोधत सुनील आंबेकर पुढे म्हणाले, "आज आपल्या राष्ट्राचे वर्णन केले तर महत्वाकांक्षी असलेला देश म्हणू शकतो. याचा अर्थ असा नाही की, फक्त काही लोकांच्या आकांक्षा आहेत. कोणीही शहरात राहतो किंवा खेड्यात, कोणत्याही जातीचा किंवा समुदायाचा असो, आता प्रत्येकाला वाटते की त्यांनी पुढे जावे आणि ते पुढे जाऊ शकतात. मला वाटते की, हे भारतात घडलेले एक अतिशय सकारात्मक परिवर्तन आहे".

ते पुढे म्हणाले, "माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांनी ‘स्कूल चलें हम’ ही योजना सुरू केली. त्यामागचा विचार असा होता की अनेक लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नव्हते, कारण त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजलेले नव्हते. म्हणूनच मिड-डे मील योजना सुरू करण्यात आली. आता, २०-२५ वर्षांनंतर, परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज आपल्या प्राथमिक शाळांमधील नावनोंदणी ९९–१०० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. अगदी दूरवरच्या खेड्यांमध्ये राहणाऱ्या अतिगरीब कुटुंबांनाही आता आपल्या मुला-मुलींना सर्वोत्तम शाळेत पाठवण्याची आकांक्षा आहे. त्यांचा विश्वास आहे की शिक्षणामुळे त्यांच्या मुलांचे जीवन बदलू शकते, त्यांच्या कुटुंबाची स्थिती सुधारू शकते आणि देशालाही पुढे नेऊ शकते. म्हणून, आता प्रत्येकजण आपल्या अर्थव्यवस्थेत, आपल्या समाजात आणि आपल्या विकास प्रक्रियेत योगदान देत आहे. आपल्या देशात झालेले हे सर्वात मोठे परिवर्तन आहे.”

धर्माचा खरा अर्थ म्हणजे न्याय

धर्माचा खरा अर्थ म्हणजे न्याय. आपण जर धर्माला अर्थ या परिमाणातून समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू हा आहे 'न्याय'. प्रत्येकाला आपल्या मार्गाने पुढे जाण्याची समान संधी मिळायला हवी. काहींच्या कृतींमुळे इतरांचा मार्ग बंद होता कामा नये. त्या अडथळ्यांना दूर करून सर्वांसाठी मार्ग मोकळा करणे हे अर्थाच्या संदर्भात धर्माचे सर्वात मोठे परिमाण आहे, असेही सुनील आंबेकर म्हणाले.

सामाजिक भांडवल म्हणजे विश्वास

"सामाजिक भांडवल म्हणजे विश्वास. लोकांचा कुठल्यातरी गोष्टीवर असलेला विश्वास – अर्थातच, स्वतःवरचा विश्वास, निसर्गावरचा विश्वास, समाजावरचा विश्वास आणि इतर माणसांवरचा विश्वास. शेअरबाजार कसा चालतो हे बघायला गेले तर ते खूप सोपं वाटतं, पण काही बाबतीत ते तितकंसं सरळ नसतं. आपण जेव्हा कुठल्याही व्यापारी कामात गुंततो, तेव्हा नैसर्गिक प्रक्रिया अशी असते की आपण कारागीर होतो – आपण काहीतरी निर्माण करायला सुरुवात करतो. आणि मग तो उत्पादित माल कुणाला तरी लागतो. यालाच आपण 'प्रोप्रायटरशिप' किंवा 'एकमालकी हक्क' म्हणतो – म्हणजे आपण स्वतःच्या बळावर काम करतो; आपणच त्या व्यवसायाचे मालक असतो."

- आशिष चौहान, सीईओ, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज

धर्म आणि संस्कार नसणारी व्यक्ती कोणाच्याही कामाची नाही

"जर कोणी २५ वर्षांपूर्वी धर्माधिष्ठित विकासावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता, तर तथाकथित अर्बन नक्षल त्वरित उभे राहिले असते आणि हे कम्युनिझम पसरवण्याचं काम आहे असं म्हटलं असतं. भारतामध्ये गेली ५० वर्षे हिंदूंबद्दल बोलणे किंवा धर्माबद्दल बोलणे म्हणजे जणू काही अपराध केला आहे, अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण केली गेली. हे वातावरण तब्बल ७० वर्षे टिकून राहिले. पण प्रत्येक अंधारानंतर सूर्य उगवतोच. आज आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात प्रवेश करत असताना इथे बसून धर्माधिष्ठित विकासाच्या मॉडेलवर चर्चा करू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये धर्म आणि संस्कार नसतील, तर ती व्यक्ती ना इतरांच्या, ना स्वतःच्या कुणाच्याही उपयोगाची नसते. जे राष्ट्र आपल्या मूलभूत धर्मतत्त्वाला ओळखत नाही, ते राष्ट्र देखील कुणाच्याही उपयोगाचे नसते."

- मंगल प्रभात लोढा - मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवनिर्मिती

Powered By Sangraha 9.0