महाराष्ट्रातील ४४ राजकीय पक्षांसह देशातील ४७४ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची सर्वात मोठी कारवाई!

19 Sep 2025 19:44:20

नवी दिल्ली : (Election Commission of India) केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी गेल्या सहा वर्षांत कोणतीही निवडणूक न लढवलेल्या देशातील एकूण ४७४ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकले आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश आहे. त्याचबरोबर आणखी ३५९ पक्षांना यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई निवडणूक प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या धोरणाचा भाग असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने या कारवाईबद्दल सांगितले की, सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत भाग न घेतलेल्या पक्षांना यादीतून काढून टाकण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम २९ अ अंतर्गत घालून दिलेल्या अटींनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश आहे. मात्र या पक्षांची यादी अद्याप समोर आलेली नाही.

निवडणूक आयोगाने गेल्या दोन महिन्यात ८०८ पक्षांना या यादीतून वगळले आहे. पहिल्या टप्प्यात ९ ऑगस्ट रोजी ३३४ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्षांना यादीतून काढून हटवण्यात आले होते, त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात १८ सप्टेंबर रोजी आणि ४७४ पक्षांना यादीतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता या पक्षांना निवडणूक लढवताना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पक्षांना यादीतून वगळण्याच्या तिसऱ्या टप्प्यात आयोगाने ३५९ पक्षांची यादी तयार केली आहे. ज्यांनी गेल्या तीन आर्थिक वर्षांचे वार्षिक लेखा आणि निवडणूक खर्चाचे अहवाल वेळेवर सादर केलेले नाहीत. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या पक्षांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.

उत्तर प्रदेशातील सर्वात जास्त पक्षांचा समावेश

निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात यादीतून वगळलेल्या ४७४ पक्षांपैकी, उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १२१ पक्षांचा समावेश आहे. तसेच या यादीत दिल्लीतील ४०, महाराष्ट्रातील ४४, तामिळनाडूतील ४२, बिहारमधील १५, मध्य प्रदेशातील २३, पंजाबमधील २१, राजस्थानमधील १७ आणि हरियाणातील १७ पक्षांचा समावेश आहे.




Powered By Sangraha 9.0