वॉशिंग्टन : (Balochistan Liberation Army) गेल्या महिन्यातच अमेरिकेने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि तिची सशस्त्र शाखा असलेल्या 'माजीद ब्रिगेड'चा समावेश दहशतवादी संघटनांच्या यादीत केला होता. अमेरिकेचा हा निर्णय पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरु शकतो, अशी चर्चा सुरू होती. अशातच आता यासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तान आणि चीनने एकत्र येऊन बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि 'माजीद ब्रिगेड'वर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु, या प्रस्तावाला अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि फ्रान्सने विरोध केला आणि तो प्रस्ताव फेटाळला. या निर्णयामुळे चीन आणि पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्सने युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेमध्ये १२६७ व्यवस्थेअंतर्गत काही नियमांचा संदर्भ देत हे म्हटले की, 'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी' किंवा 'माजीद ब्रिगेड'ला अल-कायदा किंवा आयएसआयएल (ISIL) सारख्या दहशतवादी संघटनांशी जोडण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. त्यांनी १९९९ च्या १२६७ ठरावाचा आधार घेत या प्रस्तावाला विरोध केला.