कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा रोजगारावर होणारा परिणाम, याबाबत दोन भिन्न मतप्रवाह असले, तरी या तंत्रज्ञानाकडे कदापि दुर्लक्ष करुन चालणार नाही, याची अनुभूती सर्वच क्षेत्रांत हळूहळू का होईना निर्माण झालेली दिसते. या नव्या व्यावसायिक बदलांच्या पार्वभूमीवर, आपल्या व्यवसाय-व्यवस्थापन पद्धती आणि प्रक्रियांचा अभ्यासपूर्ण फेरविचार करणे, कंपन्या आणि कर्मचारी या उभयतांसाठी आवश्यक ठरणार आहे. कारण, यावरच नजीकच्या भविष्यातील प्रश्न आणि त्यांची सोडवणूक अवलंबून असेल.त्रिम बुद्धिमत्ता, त्याचे स्वरूप, उपयोग व त्यानिमित्ताने पुढे आलेली आव्हाने हे मुद्दे सध्या सर्वदूर चर्चेचे झाले आहेत. असे होण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा संवादापासून उद्योग-व्यवसाय, संदर्भ पडताळणी, भाषिक रचना इ. विविध संदर्भात होणारे व होऊ घातलेले उपयोग व त्याचे विविधांगी स्वरूपात होणारे वा होऊ शकणारे परिणाम व फायदे. हे दोन्ही मुद्दे आपापल्या परीने महत्त्वाचे आहेत व होऊ शकतात, याचे प्रत्यंतरसुद्धा येऊ लागले आहे.
सुकृतदर्शनी असे दिसून येते की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर उद्योग-व्यवसाय क्षेत्रात केल्यास त्याचा थेट व मोठा परिणाम मुख्यतः कार्यालयीन कामकाजाशी संबंधित वा आधारित रोजगारांवर होऊ शकेल. याची चुणूक आता संबंधितांना लागली असून विशेषतः कर्मचारी स्तरावर काम करणाऱ्या पांढरपेशा वर्गातून यासंदर्भात काळजीचा स्वर उमटू लागला आहे. त्यातही संगणक क्षेत्र व प्रक्रियेवर आधारित रोजगार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे प्रामुख्याने प्रभावित होणार, अशी साधारण भीती आताच व्यक्त करण्यात येत आहे.
असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, संगणक सेवा-प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’सारख्या कंपनीने एकाच फटक्यात केलेली 12 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा. अशी स्थिती या क्षेत्रात मोठ्या घडामोडी वा उलथापालथीचा टप्पा ठरलेल्या ‘वायटू-के’पासून नजीकच्या ‘कोरोना’ काळातपण आली नव्हती. यादरम्यान देशांतर्गत संगणक सेवा उद्योगांमध्ये विविध कारणांनी चढ-उतार होतच राहिले. मात्र, ‘टीसीएस’सारख्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरी-संख्येच्या संदर्भातील धोरणाचे मात्र व्यापक स्वरूपात पडसाद उमटले आहेत.
या संदर्भ आणि पार्वभूमीचा व्यावहारिक व व्यवसायिक दृष्टिकोनातून पडताळा घेणे या टप्प्यावर महत्त्वाचे ठरते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून होणारे मोठे व महत्त्वाचे बदल म्हणजे, त्यामुळे मूळतः विविध व महत्त्वाचे कामकाज व त्याचे स्वरूप याची फेररचना होत आहे अथवा होऊ घातली आहे. यातून व्यक्तिगत स्तरावरील कामकाजात अधिक स्तब्धता व नेमकेपणा येऊ शकते. या नव्या क्रियापद्धतीला अद्ययावत तंत्रज्ञानाची मोठी साथ लाभल्याने परंपरागत कामकाज पद्धतीऐवजी अद्ययावततेवर आधारित अशा वेगवान व आर्थिकदृष्ट्या अधिक परिणामकारक व लाभदायी कामकाज प्रक्रियेवर यापुढे व्यवस्थापनांचा स्वाभाविक भर राहणार आहे. याचाच एक अपरिहार्य परिणाम कर्मचारी आणि त्यांच्या संख्येवर दुहेरी स्वरूपात होऊ शकतो. एक म्हणजे, वर नमूद केल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचे कामकाज व ते करण्याच्या पद्धतीचा मुळातून व तपशीलवार असा आढावा घेतल्याने व्यवसाय-व्यवस्थापनाची नवी मांडणी व त्या प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाच्या प्रगत वापरामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येची फेररचना अपरिहार्य असण्याने होणारी कर्मचारी कपात. याचाच दुसरा पैलू म्हणजे, नजीकच्या काळात व्यवसाय प्रक्रिया स्वरूपात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या कंपन्या मुळातच आपल्या व्यवसायिक गरजा व प्राधान्यांनुसार कर्मचाऱ्यांची निवड-नेमणूक करणार असल्याने नव्या उमेदवारांच्या निवडीवर स्वाभाविकपणे मर्यादा येतील.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यावसायिक, वापराच्या संदर्भात जागतिक संदर्भात पण वेगळी स्थिती नाही. ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’च्या 2025 साठीच्या संदर्भात नुकत्याच प्रकाशित अहवालामध्ये सद्यस्थितीतील रोजगार स्थिती यासंदर्भात विशेष तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. या अभ्यासपूर्ण अहवालानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेसह विकसित तंत्रज्ञानामुळे जागतिक स्तरावरील उपलब्ध वा होऊ घातलेल्या रोजगारसंधीं मध्ये सुमारे २५ टक्क्यांची घट अपेक्षित राहील. मात्र, याच अहवालातील एक महत्त्वाची व आशादायी बाब म्हणजे, एकूण उद्योग-व्यवसायवाढीमुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगारसंधींमुळे रोजगारकपातीची प्रत्यक्ष टक्केवारी सुमारे आठ टक्के असेल. ही अपेक्षित टक्केवारी आजच्या संदर्भात निश्चितच आशादायी ठरते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब आणि वापरामुळे ठराविक पद्धतीच्या कामकाज आणि नोकरी-रोजगारांमुळे आव्हानात्मक स्थिती निर्माण होऊ शकते, हे आता स्पष्ट झाले आहे. या नव्या व्यावसायिक बदलांच्या पार्वभूमीवर, आपल्या व्यवसाय-व्यवस्थापन पद्धती आणि प्रक्रियांचा अभ्यासपूर्ण फेरविचार करणे, कंपन्या आणि कर्मचारी या उभयतांसाठी आवश्यक ठरते. यावरच नजीकच्या भविष्यातील प्रश्न आणि त्यांची सोडवणूक अवलंबून असेल.
कर्मचारी निवडीसंदर्भात विविध स्तरांवर काम करणाऱ्या ‘एलएलबी सर्व्हिसेस’ या कंपनीचे मुख्याधिकारी सचिन अलग यांच्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांच्यांकडे येणाऱ्या कर्मचारी-अधिकारी पदांसाठीच्या संदर्भात विशेष बदल दिसून येतात. त्यांच्यानुसार सद्यस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराच्या पहिल्याच टप्प्यात ग्राहक संपर्क-सेवा, संवाद पद्धती, माहिती संकलन व संग्रह, सुलभ संदर्भ, बिलांची आकारणी, नित्याचा पत्रव्यवहार व पाठपुरावा व नेहमीच्या कामकाजी मुद्द्यांचे स्मरण इ. क्षेत्रांतील रोजगारांमध्ये लक्षणीय स्वरूपाची घट दिसून आली. यासंदर्भातील भारतीय व्यवस्थापन रचना व पद्धतीचे परंपरागत वैशिष्ट्य म्हणजे, आपल्याकडे नित्याचे व एकसारखे वा समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. या स्थिती-परिस्थितीचा फारसा गांभीर्याने विचार कधी झालाच नाही. मात्र, आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापराच्या कारणाने विविध उद्योग-व्यवसाय क्षेत्रात त्यावर गांभीर्याने विचार करणे अपरिहार्य ठरते.
दरम्यान सुमारे ३० वर्षांपूव उद्योग-व्यवसायातील विविध कंपन्यांच्या समान स्वरूपाच्या वा सामाजिक कामे करणाऱ्या सेवा आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्र व एकीकृत सेवा पुरविण्याच्या व्यापक उद्देशाने ’BPO' म्हणजेच ’Business Process Outsourcing' आणि ’KPO' - 'Knowledge Process Outsourcing' या नव्या व्यवस्थापन पद्धतींचा विकास आणि यशस्वी अवलंब करण्यात आला.
मात्र, आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयामुळे त्यावेळच्या यशस्वी पद्धतीपुढे अस्तित्वाचे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कंपनी असो वा बीपीओ व केपीओ, ज्या रोजगारांवर सध्या संकटसदृश वा आव्हानपर स्थिती निर्माण झाली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने पुढील कामकाजी क्षेत्रांचा समावेश करता येईल-
वित्त आणि लेखा : विक्री-वसुलीशी संबंधित व्यवहार आणि हिशोब, आर्थिक व्यवहारांचे संकलन, वार्षिक अर्थसंकल्पाची मांडणी व पडताळणी.
आर्थिक व विमा क्षेत्र : विम्याशी संबंधित विषय आणि दाव्यांचा पडताळा घेणे, विमाविषयक पाठपुरावा आणि शंकानिरसन, संबंधितांशी मार्गदर्शनपर संवाद, नूतनीकरण व मार्गदर्शन इ.
मार्केटिंग व्यवहार : व्यवसायिक संवाद व पाठपुरावा, शंकानिरसन, जाहिरातीचा मजकूर, संभाषण-सादरीकरण इ.
कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन : कायदेविषयक तरतुदी व त्यांची अंमलबजावणी, वेळेत नुतनीकरण, उद्योग-व्यवसायाशी निगडित करव्यवहार व तत्सम पद्धती, कायदेविषयक कागदपत्रांची मांडणी इ.
बीपीओ/केपीओ - ग्राहक सेवा क्षेत्र : आवाजावर आधारित ध्वनिमुद्रित व्यवसायिक प्रतिसाद, ग्राहकांचे शंकानिरसन, नित्याच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन, प्रतिसाद प्राप्त करणे, महत्त्वाचे व्यावसायिक संदेशवहन इ.
यावरून एक बाब स्पष्ट होते की, सध्या आणि यानंतर उद्योग-व्यवसाय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत्या प्रमाणावर व लवकरच अपरिहार्य ठरणार आहे. या मोठ्या व्यावसायिक बदलाचा परिणाम उद्योगांतर्गत रोजगार आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येवर निश्चितपणे होणार आहे.
यावर उपाययोजना कंपनी-कर्मचारी या उद्योगातील महत्त्वपूर्ण घटकांच्या सहभागातूनच शक्य होणार आहे. त्यादृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बदललेल्या अथवा बदलणाऱ्या व्यावसायिक परिस्थितीवर मात करण्यासाठी बदलत्या व्यावसायिक गरजांनुरूप कर्मचाऱ्यांचे फेर-प्रशिक्षण, प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण-प्रशिक्षण व त्यांचा वापर, कर्मचाऱ्यांचा अनुभव व प्रशिक्षणावर आधारित व्यावसायिक गरजांनुरूप फेररचना व नेमणूक करणे, व्यावसायिक प्रक्रियेतील व्यवहारांचे प्रमाण कमी होईल, याची तयारी करणे व मुख्य म्हणजे, वाढत्या व मोठ्या बदलांच्या अंमलबजावणीसाठी बदलांच्या धोरणात्मक अंमलबजावणीला कंपनी-कर्मचारी या उभयतांनी सामोरे जाणे, यावरच व्यावसायिक यशाची निश्चिती ठरणार आहे.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
9822847886