आयएमएच्या राज्यस्तरीय 'बंद'ला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

18 Sep 2025 14:56:37

कल्याण : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) सीसीएमपी अभ्यासक्रमधारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने राज्यभर पुकारलेल्या बंदला कल्याणमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कल्याणमधील शंभरहून अधिक रुग्णालयांनी २४ तास आपल्या उपचार सेवा बंद ठेवल्या असून ५०० पेक्षा जास्त डॉक्टरांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला. या एक दिवसीय लाक्षणिक संपामुळे कल्याण डोंबिवलीतील रुग्णालयांतील दैनंदिन वैद्यकीय सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून आले.

आयएमएच्या कल्याण शाखेच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी सांगितले की, “या आंदोलनाचा भाग म्हणून आपत्कालीन सेवा देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. एमएमसी नोंदणीला आमचा ठाम विरोध आहे. आणि हा लढा आम्ही यापुढे असाच चालू ठेवणार असल्याची माहिती कल्याण आय एम ए अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली. तसेच राज्य शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापुढे बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या काही दिवसांत आयएमएचे राज्यभरातील डॉक्टर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान कल्याणातील आयएमएच्या डॉक्टरांनी मुरबाड रोड येथील आयएमए हॉल ते कल्याण तहसील कार्यालय आणि तिथून केडीएमसी मुख्यालय असा पायी लाँग मार्च काढला. डॉक्टरांच्या या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार आणि केडीएमसी आयुक्त यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

यावेळी आयएमए कल्याण अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, डॉ.शुभांगी चिटणीस, खजिनदार डॉ. तन्वी शहा, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. राजेंद्र लावणकर, डॉ. संजय गोडबोले, डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. प्रदीप कुमार सांगळे, डॉ. विवेक भोसले, डॉ.विद्या ठाकुर, डॉ. राहुल तिवारी, डॉ. स्नेहलता कुरिस,डॉ.प्रशांत खताळे, डॉ. विकास सुरंजे, डॉ. दीप्ती दिक्षीत यांच्यासह अनेक डॉक्टर सहभागी झाले होते.


Powered By Sangraha 9.0