भारतीय ग्रामीण भागातील संस्कृतीचा बाज लक्षात घेऊन, काही वर्षांपूर्वी युट्यूबने ग्रामीण भागातील आशयनिर्मितीकारांना प्रोत्साहन दिले. परिणामी, गावाखेड्यांतील सृजनशीलतेला वाव मिळाला आणि युट्यूब गावाखेड्यातील प्रत्येकाच्या मोबाईल स्क्रीनपर्यंत पोहोचले. आता वेळ जाहिरात क्षेत्रातील बदलाची आली आहे, त्याचे हे आकलन.
एकूण २.५ अब्ज सबस्क्रायबर्स, ११.५ कोटी युट्यूब चॅनेल्स इतका मोठा व्याप असलेल्या युट्यूबने, जाहिरात क्षेत्रात नवा पायंडा पाडण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी आणि ग्रामीण भागांच्या जाहिरातींसाठी, वेगळ्या प्रकारचे फिचर्स आणण्यात येणार आहेत. त्यामुळे युट्यूबच्या जाहिरातदारांना ढोबळमानाने वर्गवारी करता येणार आहे. अनेक बड्या कंपन्या शहरी आणि ग्रामीण भागांतील विपणन पद्धत, भाषा, जाहिरात स्वतंत्र पद्धतीने करतात. डिजिटल माध्यमांमध्ये हे वर्गीकरण करताना ‘डेमोग्राफीक’ (वर्गवारी) हा पर्याय उपलब्ध होता पण, त्यालाही मर्यादा आहेतच. त्यावर मात करण्यासाठी हा पर्याय देण्यात आला आहे. विशेष म्हणजे,असा पर्याय अद्याप ओटीटी किंवा टीव्ही चॅनेल्सनेही उपलब्ध केलेला नाही. भारताची भौगोलिक रचना पाहून हे फिचर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
ज्यावेळी युट्यूबने ग्रामीण भागातील आशयाला प्रोत्साहन दिले होते, तेव्हापासूनच या नव्या फिचर्सच्या आखणीची सुरुवात झाली. ब्रॅण्ड्स या फिचरद्वारे पुढील रणनीती आखू शकतात. यामध्ये स्थानिक संस्कृती, बोलीभाषा, खानपान आदी गोष्टींचाही सुक्ष्म विचार होऊ शकतो. सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या फिचर्सचे रूप लवकरच भारतीयांना पाहायला मिळेल पण, यानिमित्ताने भारतीय संस्कृती आणि मातीशी जुळवून घेण्यासाठी ब्रॅण्ड्स पुढे सरसावल्याचे उदाहरण आहे. ज्यांना व्यवसाय कळतो, त्यांनी या गोष्टी समजून घेणे गरजेचेच आहे. या वर्गवारीमुळे जाहिरात कंपन्यांना कुठल्या ग्राहकांना काय विकायचे, याचा स्पष्ट अंदाज बांधता येणार आहे.
युट्यूब हे निमित्तमात्र; पण भारतातील ग्रामीण भागातील ग्राहकवर्गही महत्त्वाचा राहिला आहे. याचे उदाहरणच द्यायचे झाले, तर मोटार कंपन्यांचे देता येईल. यामध्ये शहरी भागांपेक्षा निमशहरी भागातील बाजारपेठांकडे जास्त लक्ष दिले जाते कारण, तिथे उत्पादनाची खरेदी गरज म्हणून केली जाते. जाहिरातींची रचनाही त्यादृष्टीनेच केली जाते. ग्राहकांशी संवाद साधण्याची पद्धत ही वेगळी असू शकते. याचे पुढचे पाऊल म्हणजे, सोशल मीडिया कंपन्यांनी भारताचा शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भाग असा केलेला विचार.
भारतातील दुर्गम भागातही आता, दळणवळणाची साधने पोहोचू लागली आहेत. त्यामुळे इंटरनेटची कवाडेही खुली झाली. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला. तिथेही जीवनमान आहे, त्यामुळे क्रयशक्तीचा विचारही आलाच. तिथेही वास्तव्य करणार्या ग्राहकांच्या गरजा आहेतच. मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती अशा युझर्स किंवा प्रेक्षकांच्या माथी हाणून जमणार नाहीत, इतका विचार आता गुगलसारखे मोठे ब्रॅण्ड्स करू लागले आहेत. शॉटर्स किंवा रिल्स हा प्रकार ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांत तितकाच लोकप्रिय झाला आहे. ३० सेकंदात आशयनिर्मिती पाहण्याचा प्रेक्षकांचा बदलता दृष्टिकोन याला कारणीभूत आहे. भारतात एकूण ६५ कोटी लोकांपर्यंत युट्यूब शॉटर्स पोहोचले असल्याचा दुवा कंपनीने हेरला होता. तोच महत्त्वाचा ठरला. असे असले, तरीही २१ मिनिटांपेक्षा जास्त कालावधी असलेले व्हिडिओ पाहणार्यांची संख्या, युट्यूब कनेट टिव्हीवर पाहणार्यांच्या संख्येपेक्षा ५० टक्क्यांहून अधिक आहे. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, युट्यूब ही एकमेव सोशल मीडिया वेबसाईट कनेटेड टिव्हीसोबतच मोबाईलवरही शॉटर्स व्हिडिओ पाहण्याचा पर्याय देते. त्यामुळे हा ब्रॅण्ड जास्तीत जास्त पर्यायांवर उपलब्ध होऊ शकल्याने, अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे पर्याय वाढले आहेत. अर्थात जितकी जास्त माध्यमे, तितया जास्त ग्राहकांशी संपर्क आणि जाहिरातींसाठी संधी उपलब्ध होतात. युट्यूबवरच्या जाहिराती परिणामकारक ठरत असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे नवनव्या अभियानांद्वारे कंपनी भविष्यातही ग्रामीण बाजारपेठांमध्ये विस्तार करताना दिसणार आहे. ग्रामीण भागातील आशयनिर्मितीकारांसाठी ही मोठीच संधी मानली जात आहे. ज्याअर्थी कंपनीने भारतातील ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित केले आहे, त्याअर्थी भविष्यात ग्रामीण भागातील आशयनिर्मितीला अधिक प्रोत्साहन देऊन त्यांना ‘मॉनिटायझेशन’द्वारे उत्पन्न मिळवण्याचीही संधी उपलब्ध असेल.
जाहिरातींच्या माध्यमांद्वारे एक नवी भागीदारी प्रक्रिया असलेली, व्यवस्थाही उभी राहू शकते. ज्यात क्रीएटर्सना त्यांच्या हक्काच्या व्यासपीठावरच ‘ब्रॅण्ड कनेट’सारखे पर्याय उपलब्ध होऊ शकतील. युट्यूब भारताकडे ‘क्रीएटर नेशन’ म्हणून पाहत आहे. जगभरातील महत्त्वाच्या घटना युट्यूबवर आम्ही पाहू शकतो, असे ८७ टक्के लोकांचे मत आहे. टिव्हीपेक्षा युट्यूबवरच्या जाहिरातींचा परिणाम, हा १३९ टक्के अधिक आहे. एका इन्शुरन्स कंपनीच्या मते, युट्यूबवर जाहिराती केल्यानंतर त्यांच्या एकूण पॉलिसींच्या विक्रीत १८ टक्क्यांनी भर पडली. एका बड्या ब्रॅण्डने युट्यूब क्रीएटर्ससोबत केलेल्या ‘पार्टनरशीप कन्टेंट’मुळे, जास्त परिणाम दिसला. युट्यूबद्वारे आता पीक पॉईंट्स हे फिचर्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यात ‘गुगल जेमिनाय’च्या साहाय्याने, व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आदर्श वेळही कळणार आहे.
युट्यूब सीटीव्हीद्वारे जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर, यूआर कोडद्वारे उत्पादन विकत घेण्याचा पर्यायही खुला आहे. यामुळे उत्पादन ग्राहकांच्या लक्षात राहील का? याची चिंता करत राहावे लागणार नाही. मोबाईलमध्येही जाहिरातीसोबतच उत्पादन खरेदीचा पर्यायही लगेच उपलब्ध असतो. एकूणच पाहता भारतात १८ वर्षांवरील व्यक्ती, सरासरी दिवसभर ७२ मिनिटांहून अधिक काळ युट्यूब पाहतो. सीटीव्हीमुळे हे प्रमाण वाढले आहे. युट्यूब कनेटेड टीव्हीद्वारे पाहणार्यांची एकूण संख्या ७.५ कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र युट्यूबसारख्या सोशल मीडिया कंपनीने अंगीकारल्याचे हे उदाहरण ठरले आहे. भविष्यात इतर कंपन्यांनीही आपला मोर्चा खेड्याकडे वळवला, तर आश्चर्य वाटायला नको. ग्रामीण भागात परिस्थिती आता लक्षणीय बदलत आहे. स्थानिक रोजगार, नव्या गुंतवणूक आणि दळणवळणाच्या सोयींमुळे क्रयशक्तीची वाढ बलाढ्य कंपन्यांच्या लक्षात आल्याने, जगभरातील पहिलाच आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत कंपनी असल्याचे दिसून येते. याचा थेट लाभ ‘एफएमसीजी’ या क्षेत्राला होणार आहे. येत्या दिवाळीत येऊ घातलेल्या ‘जीएसटी’ बदलांच्या दृष्टिकोनातून कंपन्यांसाठी हा दुग्धशर्करा योग असणार आहे. भारताने अमेरिकन आयातशुल्काविरोधात उघडलेल्या ‘जीएसटी’ दरकपातीच्या मोहिमेला, चालना देणारा हा निर्णय ठरण्याची शयता आहे.