राहुल गांधी यांचे आरोप नेहमीप्रमाणेच निराधार : केंद्रीय निवडणूक आयोग

18 Sep 2025 18:41:58

नवी दिल्ली : देशातील घटनात्मक संस्थांवर हल्ले करून काँग्रेस नेते राहुल गांधी भारतात बांगलादेश आणि नेपाळसारखे अराजक पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघात भाजपने केला आहे. त्याचवेळी राहुल गांधी यांचा मतचोरीचा नवा आरोपही नेहमीप्रमाणेच निराधार असल्याचा पलटवार केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे करण्यात आला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपांना भारतीय निवडणूक आयोगाने खोटे आणि निराधार असल्याचे सांगून स्पष्टपणे फेटाळून लावले आहे आणि जनतेकडून कोणतेही मत ऑनलाइन वगळता येणार नाही यावर भर दिला आहे. तथापि, कर्नाटकातील आलंद विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले असल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले आहे आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतः एफआयआर दाखल केला आहे.

आयोगाने एक्सवर म्हटले की, लोकसभेचे नेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. कोणाचेही नाव ऑनलाइन वगळता येत नाही. प्रभावित व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणताही बदल केला जात नाही.२०२३ मध्ये आलंद विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतः निवडणूक आयोगाने एफआयआर दाखल केला होता. नोंदींनुसार, आलंद विधानसभा मतदारसंघात २०१८ मध्ये सुभाष गुट्टेदार (भाजप) आणि २०२३ मध्ये बीआर पाटील (काँग्रेस) यांना विजय मिळाला होता.

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी पत्रकारपरिषदेत राहुल गांधी यांच्यावर घणाघात केला. ते म्हणाले, राहुल गांधी भारतात बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करू इच्छितात. केंद्रीय निवडणूक आयोग कोणताही पक्षपात न करता काम करत आहे. राहुल गांधी लोकशाही कमकुवत करण्याचा, नागरिकांची दिशाभूल करण्याचा आणि बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. घुसखोरीचे राजकारण हा राहुल गांधींचा एकमेव अजेंडा आहे. जर बेकायदेशीर मतदारांना संरक्षण देण्याचा काँग्रेसचा अजेंडा पुढे चालू राहिला तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या हिताचे सर्वाधिक नुकसान होईल, असे ते म्हणाले.

हे आहेत राहुल गांधीचे आरोप

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, कर्नाटकमधील आलंद या विधानसभा मतदारसंघात ६०१८ मतदारांची नावे हटविण्याचा प्रयत्न झाला. आमच्या माहितीनुसार केवळ १४ मिनिटांत तब्बल १२ मतदारांची नावे डिलीट करण्यात आली. प्रत्यक्षात किती नावे हटवली गेली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही संख्या ६०१८ पेक्षा खूप जास्त असण्याची शक्यता आहे. नाव हटविणारा आणि ज्याचे नाव हटले तो – दोघांनाही या प्रक्रियेची कल्पना नव्हती. कोणत्यातरी वेगळ्याच शक्तीने ही यंत्रणा हायजॅक करून मतदारांची नावे गायब केली. हा प्रकार कुणी व्यक्तिशः केला नव्हता, तर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केंद्रीकृत पद्धतीने मतदारांची नावे हटवली गेली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.


Powered By Sangraha 9.0