नवी दिल्ली : (PM Modi Speaks with Nepal PM Sushila Karki) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. तसेच नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शोकही व्यक्त केला. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली.
पंतप्रधान मोदी आणि सुशीला कार्की यांच्यात काय संवाद झाला?
नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या हंगामी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे त्यात सुशीला कार्की यांच्याशी झालेल्या संभाषणाविषयी माहिती देण्यात आली आहे. "नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी फोनवर उत्तम संवाद झाला. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांचे झालेले मृत्यू वेदनादायी असून त्याबद्दल मी कार्की यांच्याकडे सहवेदना व्यक्त केलया. शिवाय, नेपाळमध्ये पुन्हा एकदा शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारत ठामपणे नेपाळच्या पाठिशी असल्याबाबतही त्यांना आश्वस्त केले. याशिवाय नेपाळचे नागरिक आणि त्यांच्या पंतप्रधान कार्की यांना उद्याच्या नेपाळच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा"; असं मोदींनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.