नवी दिल्ली : पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात झालेल्या रणनीतिक संरक्षण करारावर भारताची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की या कराराविषयी त्यांना आधीपासूनच माहिती होती आणि सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या सर्व पैलूंवर कटिबद्ध आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी माध्यमांना सांगितले की, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील संरक्षण कराराविषयी सरकारला सुरुवातीपासूनच माहिती होती. या कराराचा भारताच्या सुरक्षेवर तसेच प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आम्ही अभ्यास करत आहोत. भारत सरकार आपल्या राष्ट्रीय हितांचे सर्व क्षेत्रांत संरक्षण करण्यास वचनबद्ध आहे.
हा करार सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील यमामा पॅलेसमध्ये झाला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर देखील उपस्थित होते.
या करारानुसार, एका देशावर झालेला हल्ला दुसऱ्या देशावर झालेला हल्ला मानला जाईल. त्यामुळे या कराराची तुलना नाटो कराराशी केली जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अण्वस्त्रांच्या वापराचाही तरतूद करण्यात आली आहे. अलीकडेच कतारमध्ये झालेल्या मुस्लिम देशांच्या बैठकीत पाकिस्तानने नाटोसारख्या संघटनेची कल्पना मांडली होती. त्यानंतर अल्पावधीतच सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा संरक्षण करार पार पडला.