“गाजलेल्या लव्हस्टोरीजमध्ये कुणाचंच लग्न झालेलं नाही…” लीना भागवत म्हणाल्या...

    18-Sep-2025
Total Views |

मुंबई : मराठी रंगभूमीवर सध्या ‘आमने-सामने’ हे नाटक चांगलच गाजताना दिसत आहे. तब्बल ३५० पेक्षा अधिक प्रयोग या नाटकाने पूर्ण केले आहेत. तर हाऊसफूलचे बोर्ड अनेक ठिकाणी लागलेले पाहायला मिळतात. याच निमित्ताने नाटकाच्या कलाकारांनी मुंबई तरुण भारतला विशेष मुलाखत दिली. अभिनेत्री लीना भागवत, रोहन गुजर आणि केतकी विलास यावेळी उपस्थित होते. त्यांनी नाटकाचे अनेक किस्से आणि आठवणी सांगितल्या.

नाटकाचा विषय हा लिव्हइन रिलेशनशिप आणि लग्न असा आहे. यावरही त्यांनी सविस्तर चर्चा केली. लिव्हइनचा मुद्दा आपल्या देशात नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. तर नाटक यातून काय सांगतं आणि वैयक्तीकरित्या कलाकार याविषयाकडे कसं पाहतात...

याविषयी बोलताना अभिनेता रोहन गुजर म्हणाला, “आमच्या नाटकाच्या शेवटी एक वाक्य आहे, तुम्ही लग्न करुन एकत्र राहा किंवा न करता एकत्र राहा. तुमच्यात भांडणं होणार, वाद होणार, रुसवे-फुगवे होणार पण ते सगळं झाल्यानंतर त्या व्यक्ती एकमेकांसमोर कशा राहतात इथेच कळतं की त्यांचा संसार कसा होणार.”

याविषयी बोलताना अभिनेत्री लीना भागवत म्हणाल्या, “ज्या काही गाजलेल्या लव्हस्टोरी आहेत त्यापैकी कुणाचंच लग्न झालेलं नाही. मग ते सलीम अनारकली असो किंवा लैला मजनू. त्यामुळे आपल्याला वाटतं की लिव्हइनचा मुद्दा आता आला आहे. पण दोन नितांत प्रेम करणारी एकत्र आलेली माणसं, मग त्याला टॅग कोणताही असो, लिव्हइनचा किंवा लग्नाचा.”

तर पुढे त्यांनी एक उदाहरण देत सांगितलं की, “एकदा आमचा प्रयोग संपल्यानंतर ७०-७५ वर्षांच्या दोन आजी आम्हाला भेटायला आल्या होत्या. तेव्हा त्या आपापसांत बोलत होत्या, छान आहे ना हे लिव्हइन वैगरे आपल्यावेळी नव्हतं असं काही. फक्त त्यांनी असा सुंदर प्रश्न उपस्थित केला की, पण हे लिव्हइनमध्ये मुलंबाळं झाली की त्याला आडनाव कोणाचं द्यायचं? आणि यावर सगळेच हसू लागले.”




दरम्यान या नाटकात अभिनेत्री लीना भागवत यांच्यासह त्यांचे पती अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश कदम देखील आहे. तर मंगेश कदम यांनीच नाटकाचं लेखन केलेलं आहे. चारच पात्र असणारं हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. लवकरच नाटकाचे ४०० भागसुद्धा पूर्ण होणार आहेत.

नाटकाच्या इतरही गमती-जमती तसेच प्रेक्षकांनी दिलेली पोचपावती यावेळी त्यांनी सांगितली. रोहन म्हणाला, “आमच्या पुण्याच्या प्रयोगाला एक जोडपं आलं होतं. नाटक संपल्यावर ते आम्हाला भेटायला आले. तेव्हा त्यांनी सांगितलं की, आमची आता घटस्फोटाची प्रक्रीया सुरु आहे. आम्ही आता घटस्फोट घेत आहोत. पण डॉ मोहन आगाशे यांनी आम्हाला तुमचं नाटक एक थेरपीचा भाग म्हणून पाहायला सांगितलं आहे. तेव्हा आम्हाला जाणवलं की, किती जबाबदारीचं काम आम्ही करत आहोत.”