भारतीय संस्कृती ऋषींच्या अधिक सखोल चिंतनातून साकार झाल्याने, ती मानवी जीवनाला उत्तम करण्याचे राजमार्ग दाखवणारी ठरते. मात्र, गेल्या दशकभरामध्ये भारतीयांना याची प्रकर्षाने पुन्हा जाणीव झाली आहे. याचे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होय! त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सद्गुरुंनी शब्दबद्ध केलेल्या या भावना...
गेल्या काही शतकांमध्ये मानवतेने निवडलेल्या पर्यायांमुळे, आपण एका उतारावर पोहोचलो आहोत. आपण आपल्या अर्थव्यवस्था, आपले पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र, आपले शिक्षण आणि सामाजिक व्यवस्था, आपल्या तरुणांचे आणि पुढच्या पिढीचे संगोपन ज्यापद्धतीने केले आहे; त्यामुळे या सर्व गोष्टींनी आपल्याला या अनिश्चिततेच्या स्थितीत आणले आणि जगाला कड्याच्या टोकावर उभे केले आहे. युद्धाचे असंख्य रंगमंच, अस्थिर आर्थिक संरचना, वेगाने क्षीण होत जाणारे पर्यावरणशास्त्र आणि नैसर्गिक आपत्तींमधील वाढ, मानसिक आरोग्याची महामारी आणि अनेक समाजांमधील मादक पदार्थांवरील अवलंबित्व संकट हे सर्व याचे पुरावे आहेत.
हे विनाश आणि निराशेचे चित्र रंगविण्यासाठी नाही. अनिश्चिततेची ही स्थिती हीच संभाव्यतेची स्थिती आहे. आज आपण जे निर्णय घेतो, त्यात प्रचंड परिवर्तनाची किंवा क्षय होण्याची क्षमता असते. ८.५ अब्ज लोकसंख्येसह आपण एका अनाकलनीय शर्यतीत धावत आहोत. अद्यापही आपण अशा जाणीवेच्या पातळीवर नाही की, जी आपल्याला सामूहिक, एकत्रित निर्णय घेण्यास मुभा देईल.
संपूर्ण कारभार चालविण्यासाठी आपण सरकार, कायदे आणि नेतृत्वावर अवलंबून असतो. अशावेळी आपण स्वतःसाठी कोणत्या प्रकारच्या नेतृत्वाची व्यवस्था करतो, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आपल्याला या ग्रहासाठी शाश्वत आणि सुंदर भविष्य हवे असेल, तर आपल्याला ‘वसुधैव कुटुम्बकम्’च्या आदर्शाची योग्यता पाहावी लागेल. सर्वसमावेशकतेच्या या वृत्तीला नेहमीच मूर्त स्वरूप देणार्या भारताने, स्वतःसाठी नरेंद्र मोदी यांच्या रूपात एक नेता निवडला आहे, जे तशीच समान मूल्ये मूलभूतपणे बाळगतात. भारताला असा नेता लाभला आहे, जो राष्ट्राच्या मूळ नीतिमत्तेशी, त्याच्या जन्मजात संस्कारांशी अनेक प्रकारे मिळताजुळता आहे. समावेशन हा ‘नीतिमान मार्ग’ असल्याचे दिसून येते म्हणून नाही, तर त्यापुढे जाऊन समावेशन हा एकमेव मार्ग आहे म्हणूनच हे खूप महत्त्वाचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने, जागतिक व्यासपीठावर अधिक समावेशक आणि सहकार्यात्मक मानवतेच्या पथदर्थकाचे वारंवार प्रदर्शन केले आहे. ‘जी २०’ मध्ये आफ्रिकन युनियनचे स्वागत करण्यातील भारताची भूमिका, ‘ग्लोबल साऊथ’मधील आपले नेतृत्व, अक्षय ऊर्जा प्रणालींना एकमेकांशी मोठ्या प्रमाणात जोडण्यासाठी भारताने प्रस्तावित केलेला ‘एक जग, एक सूर्य, एक ग्रिड उपक्रम’, ‘आपले शेजारी प्रथम धोरण’ किंवा ‘संकटाच्या वेळी प्रथम प्रतिसाद देणारे राष्ट्र’ म्हणून होणारी आपली प्रशंसा, साथीच्या काळात ९६ देशांना आपली मानवतावादी मदत या सर्वांमध्ये भारताने निर्विवादपणे सिद्ध केले आहे की, कृतींमधून प्रभावीपणे बोलता येते. तसेच, आपण अल्पदृष्टी असलेल्या वैयक्तिक फायद्यांपेक्षा, मानवतेला अधिक महत्त्व देतो.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वशैलीतही समावेशकतेचा हा गुण दिसून येतो. ‘मन की बात’ हा उपक्रम प्रशासनाच्या प्रचंड यंत्रणेतील एक छोटासा तपशील वाटू शकतो परंतु, तो एक सखोल कथनाचा तपशील आहे. सामान्य नागरिकांशी थेट संबंध निर्माण करून, ते त्यांच्याशी संवाद साधू शकतात. त्यांच्या कथा, संघर्ष आणि योगदान साजरे करू शकतात. यामुळेच ते आपल्या लोकांच्या रांगड्या स्थितीशी जोडलेले राहतात आणि त्यांचे प्रशासन त्याला प्रतिसाद देते, याची खात्रीही करतात.
योगावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाश टाकण्यात त्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा करून त्यांनी, योगाबद्दलची आवड अभूतपूर्व रीतीने वाढवण्यास आणि त्यामुळे होणारे कल्याण अधोरेखित करण्यास हातभार लावला आहे. आजच्या काळात हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, योगाचे तंत्रज्ञान हाच आज मानवासमोरील मानसिक आरोग्य आणि शारीरिक आव्हानांवरील उपाय आहे. जर जगाच्या विकासासाठी एक स्थिर अंतर्गत व्यासपीठ तयार करायचे असेल, तर त्यात योगाभ्यासाची किंवा ध्यानाची किमान काही मिनिटे समाविष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारताचे हे सभ्यता-साम्राज्य आपल्या खर्या क्षमतेची जाणीव करून देण्याच्या आणि एका गौरवशाली भविष्याकडे लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने, एका वळणाच्या टप्प्यावर उभे आहे. आतापर्यंत आपण आपल्या आर्थिक मार्गात अभूतपूर्व काम आणि प्रगती पाहिली. पायाभूत सुविधा, अवकाश, संरक्षण, शेती आणि तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांत वाढलेला जोमही पाहिला. स्वावलंबन, भूराजकीय लवचिकता आणि सामर्थ्य या दिशेने आपल्या धोरणांचे कुशल नेतृत्वदेखील आपण पाहिले आहे. तथापि, एक राष्ट्र म्हणून आपल्याला अजूनही खूप पुढे जायचे आहे. भावी पिढीचे संगोपन हे आपल्या उत्क्रांतीसाठी महत्त्वाचे आहे. भारताने आपल्या वाढत्या तरुण लोकसंख्येसह संधीचा हा सुपीक काळ गमावू नये, असे आम्हाला वाटते.
गेल्या दशकापासून सुरू असलेल्या अर्धवट राहिलेल्या आदर्शांच्या शेवटच्या बेड्या फेकून देण्याची, आणि भारतातील नागरिकांना भविष्याचे अभियंते बनण्यासाठी आमंत्रित करण्याची वेळ आली आहे. पायाभूत सुविधांपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत, व्यापारापासून संरक्षणापर्यंत, शिक्षणापासून उद्योगापर्यंत, आपल्याला ते सुपरसॉनिक वेगाने पुढे नेण्याचे काम जनतेवर सोपवण्याची गरज आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सध्याच्या प्रशासनात हा विश्वास खरोखरच दिसून येतो परंतु, खरी परीक्षा ही आहे की, लोक हा विश्वास आव्हान म्हणून स्वीकारतात आणि आपली क्षमता सिद्ध करतात.
भारताकडे केवळ खर्या वैभवाच्या युगात प्रवेश करण्याचीच नव्हे, तर मानवतेला त्यात घेऊन जाण्याची क्षमता आहे. आपल्याकडे एक सक्षम, धाडसी आणि निस्वार्थी माणूस आहे. परंतु, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, राष्ट्र म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, तर ते नागरिकांनी आकारले आहे. आपल्याला हवे असलेले सुवर्ण भविष्य घडविण्यासाठी, सुशासन आणि संधीच्या व्यासपीठाचा वापर करणे हे भारतातील नागरिकांवर अवलंबून आहे.
चला तसे घडवूया!
- सद्गुरु