मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे कव्हरेज थांबवण्यासाठी माँसाहेबांच्या पुतळ्याच्या विटंबनाचे कारस्थान उबाठा गटाने केले का? असा सवाल भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत केला.
नवनाथ बन म्हणाले की, "काल माँसाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची विंटंबना करण्याची घटना घडली असून आम्ही त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. याप्रकरणात पोलिसांनी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाला अटक केली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस होता. यानिमित्ताने महाराष्ट्रासह देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतू, मोदीजींच्या वाढदिवसाचे कव्हरेज जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी कालचा प्रकार केला होता का? त्यांच्या वाढदिवशीच पुतळ्याची विटंबना घडली हे संशयास्पद आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक हे कारस्थान रचले का, अशी शंका आहे. आरोपी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याने या प्रकरणाचा सखोल तपास करून यामागचा बोलविता धनी कोण? याची चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
"संजय राऊतांनी ईव्हीएमवर शंका घेणे म्हणजे जनतेच्या मतदानावर शंका घेणे आहे. मध्यप्रदेशातून मशिन येतात असे म्हणून संशय घेणे हास्यास्पद आहे. मग आता पाकिस्तानातून मतपेट्या आणायच्या का? संजय राऊत यांना पाकिस्तानच्या ईव्हीएमवर विश्वास आहे का?" असा सवालही त्यांनी केला.
राऊतांना जनतेने लटकवले
"देवेंद्रजी हे चिकटवलेले मुख्यमंत्री नाहीत, उलट राऊतांनाच जनतेने लटकवले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत जनतेने तुम्हाला घरी बसवले. देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा नाही तर मजबूत आहे. गेल्या ७० वर्षांत महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रकल्प कुणालाही जमले नाहीत. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, तर राऊत आणि उबाठा गटाचे भविष्य अंधारात आहे.
ते पुढे म्हणाले की, "राष्ट्रभक्त मुस्लिमांसोबत भाजप सदैव खांद्याला खांदा लावून उभी आहे. अब्दुल कलाम राष्ट्रभक्त होते म्हणून त्यांना राष्ट्रपती बनवले. भाजपचा विरोध कोणत्याही मुस्लिमांना नाही, तर अफजल खानाची पिलावळ आणि औरंगजेबाच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांना आहे. खानाचा डीएनए घेऊन राजकारण करणाऱ्या राऊतांना जनता धडा शिकवेल," असा इशारा त्यांनी दिला.
मनसेने भीतीचे राजकारण करू नये
संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यावर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, "मुंबईत महापौर मराठीच होणार असून तो भाजप-महायुतीचा असेल. मराठी माणसाला भीती दाखवण्याची नाही तर साथ देण्याची गरज आहे आणि ती साथ मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस आणि भाजप सातत्याने देत आहेत. मनसेने भीतीचे राजकारण करू नये. देशपांडे यांनी भोंग्याविरोधी आंदोलनावेळी खानाबद्दल वेगळी भूमिका घेतली होती, पण आज भाजप अफजल खानाच्या पिलावळीला विरोध करतोय तर त्यांना मिरच्या लागतात," अशी टीकाही त्यांनी केली.