नवी दिल्ली : (Rahul Gandhi alleges Chief Election Commissioner Dnyanesh Kumar) काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (दि. १८ सप्टेंबर) नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतदान प्रक्रियेतील घोटाळ्यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी थेट देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
कर्नाटकमधील आलंद विधानसभा मतदारसंघात कुणीतरी ६ हजार १८ मतदारांची नावं यादीतून वगळण्याचा प्रयत्न केला. २०२३ मध्ये तिथे किती मतं रद्द करण्यात आली? हे आपल्याला माहिती नाही. ही मतं वगळताना कुणीतरी रंगेहाथ सापडलं. एका मतदान केंद्रामधल्या अधिकाऱ्याला लक्षात आलं की त्याच्या काकाचं नाव वगळलं गेलंय. त्याने तपास केला असता शेजाऱ्यानं ते मत वगळल्याचं लक्षात आलं, पण शेजारी मात्र म्हणाला की मी असं काहीही केलेले नाही. मला याबद्दल माहिती नाही सांगितलं. ज्याचं नाव वगळलं त्यालाही याची माहीत नव्हती आणि ज्यानं वगळलं त्यालाही हे माहीत नव्हतं. कारण एका वेगळ्याच शक्तीनं ही प्रक्रिया हायजॅक करण्यात आली आणि प्रक्रियेतून मतदाराचं नाव वगळण्यात आलं होतं", असा दावा राहुल गांधींनी केला.
"आलंदमध्ये मतदारांची नावं वगळण्यासाठी ६०१८ अर्ज त्यांच्याच नावाने भरण्यात आले. ज्या लोकांच्या नावांनी हे अर्ज आले, त्यांनी ते कधी केलेच नव्हते. मतदारयादीतील नावं वगळण्यासाठी हे अर्ज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑटोमॅटिक भरण्यात आले. त्यासाठीचे मोबाईल क्रमांक कर्नाटकबाहेर वेगवेगळ्या राज्यांमधले होते. आलंदमधील नावं वगळण्यासाठी हे क्रमांक वापरण्यात आले. काँग्रेसची मतं कमी करण्यासाठी हे करण्यात आलं. जिथे काँग्रेस पक्ष जिंकत होते, अशा मतदान केंद्रांवर हे करण्यात आलं", असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला
सॉफ्टवेअरनं बुथ मतदारयादीतील पहिल्या मतदाराच्या नावानं अर्ज करत इतर मतदारांची नावं यादीतून वगळली. हे कार्यकर्त्यांच्या स्तरावर झालेलं काम नाही, हे कॉल सेंटर स्तरावर झालं आहे.
"मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार या 'वोटचोरांचं' रक्षण करत आहेत. मी हा थेट आरोप करत आहे कारण, कर्नाटकमध्ये या प्रकरणाची चौकशी चालू आहे. कर्नाटकच्या सीआयडीनं १८ महिन्यांत निवडणूक आयोगाला १८ पत्रं लिहिली आहे आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे खूप सोपी माहिती मागितली आहे. हे अर्ज जिथून भरले गेले, तिथला आयपी अॅड्रेस, जिथून अर्ज भरले गेले ती ठिकाणं आणि अर्ज भरल्यानंतर आलेले ओटीपी नेमके कुठे गेले याची माहिती मागवली गेली. पण निवडणूक आयोग ही माहिती देत नाहीये. कारण या माहितीच्या आधारे हे सगळं कुठून केलं जात आहे याची माहिती उघड होईल", असं राहुल गांधी म्हणाले.
"
"फेब्रुवारी २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला. मार्च २०२३ मध्ये कर्नाटक सीआयडीनं निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातली माहिती मागितली. ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगानं उत्तर दिलं, पण त्यात माहिती दिलेली नव्हती. जानेवारी २०२४ मध्ये सीआयडीनं पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र लिहून पूर्ण माहितीची मागणी केली. पण त्यावर उत्तर आलं नाही. सप्टेंबर २०२५ मध्ये सीआयडीनं निवडणूक आयोगाला शेवटचं प्रत्र लिहिलं हे सगळं होत असताना कर्नाटक निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि या माहितीची मागणी केली. अनेकदा ही मागणी केली गेली. पण त्यावर काहीही उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे हा स्पष्ट पुरावा आहे की जे लोक हे करत आहेत, त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वाचवत आहेत, हे सिद्ध होत आहे", असा थेट आरोप राहुल गांधींनी केला.