चौकट राजा, तात्या विंचू ते दशावतार, प्रभावळकरांची ८१व्या वर्षीही कमालच!

    18-Sep-2025
Total Views |

मुंबई : सध्या 'दशावतार' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. आणि त्याचबरोबर त्यातल्या बाबुली मेस्त्रीचीसुद्धा. सिनेमाचा ट्रेलर आल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. त्यामुळे सिनेमा रिलीज झाल्यापासून सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. एकीकडे मराठी सिनेमे चालत नाही अशी चर्चा सुरु असताना दशावतार कमाल करताना दिसत आहे. सिनेमात किती उणिवा आहेत. किंवा सिनेमा खरंच साऊथ सिनेमाला टक्कर देतो का? यापेक्षा ८१ वर्षीय हिरोने केलेली कमाल प्रेक्षकांना जास्त भावली आहे. आणि हा ८१ वर्षीय हिरो म्हणजेच अभिनेते दिलीप प्रभावळकर. 'दशावतार'चा बाबुली मेस्त्री असो किंवा 'चौकट राजा'चा नंदू अशा अनेक भूमिका दिलीप प्रभावळकरांनी अगदी प्रेक्षकांच्या मनात उतरवल्या.

वयाच्या ८० नंतरतही अशा आव्हानात्मक भूमिका करणं खरंतर कठीण आहे. पण प्रभावळकरांनी ते करुन दाखवलं. मुळ सायन्सचे विद्यार्थी असलेले प्रभावळकर बीएआरसीत नोकरी करता करता नाटक मालिका करायचे. पण फक्त अभिनयच नाही तर दिग्दर्शन, लेखनही त्यांनी केलं आहे. दशावतारचा बाबुली मेस्त्री तर प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. पण यापूर्वीही प्रभावळकरांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वर्षानुवर्षे राज्य केलं आहे.

'चिमणराव गुंड्याभाऊ'
चिमणराव गुंड्याभाऊ ही त्यांची पहिलीच दुरदर्शनवरील मालिका होती. १९७७ साली आलेली ही मालिका आणि यातले चिमणराव आजही प्रेक्षकांना आठवतात. दिलीप प्रभावळकर यांच्यासह बाळ कर्वे यांनी गुंड्याभाऊ ही भूमिका साकारली होती.

यानंतर 'एक डाव भूताचा' हा पहिला सिनेमा त्यांनी केला.हा सिनेमा देखील हीट ठरला होता.

'चौकट राजा'
संजय सुरकर यांचा 'चौकट राजा' हा कौटुंबिक चित्रपट सुपरहिट झाला होता. १९९१ साली आलेल्या या सिनेमात सुलभा देशपांडे, दिलीप कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ आणि स्मिता तळवलकर यांनी भूमिका केल्या होत्या. मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या नंदूची भूमिका प्रभावळकरांनी यात साकारली होती. दिलीप प्रभावळकर यांनी ही भूमिका इतकी बारकाईने साकारली आहे की तुम्ही त्या भूमिकेच्या प्रेमात पडता. प्रभावळकरांच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये चौकटराजाचं नाव नक्कीच येतं.

'श्रीयुत गंगाधर टिपरे'
एकेकाळी छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली ही मालिका आजही प्रेक्षकांच्या तितकीच लक्षात आहे.
मालिकेतलं एक एक पात्र आजही प्रेक्षकांना नक्कीच पाठ असेल. २००१ साली आलेली ही मालिका दिलीप यांनी स्वतःच लिहिली होती. त्यातील आबा टिपरे हे प्रचंड गाजले होते. आजही या मालिकेचे चाहते पाहायला मिळतात.

'लगे रहो मुन्ना भाई'
'लगे रहो मुन्ना भाई' या हिंदी सिनेमात त्यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती. आजवर अनेकांनी गांधी साकारले आहेत. पण प्रभावळकरांनी साकारलेले गांधी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

'पछाडलेला'
महेश कोठारे यांच्या 'पछाडलेला' चित्रपटातील इनामदार प्रचंड हीट ठरले होते. भरत जाधव, श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर असे बरेच कलाकार होते. हा हॉरर चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या हॉरर कॉमेडी चित्रपटातील सर्व पात्रांनी अक्षरशः धूमाकूळ घातला होता. तर दिलीप प्रभावळकरांनी यातले इनामदार साकारले होते.

याशिवाय देऊळ, नारबाची वाडी, वळू, एक होता विदूषक, बोक्या सातबंडे असे अनेक सुपरहीट चित्रपट आणि भूमिका प्रभावळकरांनी साकारल्या. आणि यातच आता भर पडली आहे ती दशावतारची. आजवर त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांपेक्षा वेगळी आणि तितकीच ताकदीची भूमिका पुन्हा एकदा ते प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षीही अभिनयासाठी असलेला त्यांचा हा उत्साह नक्कीच तरुणांनाही लाजवणारा आहे.