भारताचा भाग्यविधाता!

    17-Sep-2025
Total Views |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीचा केंद्रबिंदू हा तळागाळातील गरीबवर्ग राहिला आहे. भारताला असा नेता लाभल्याबद्दल प्रत्येक भारतीयाला गर्व वाटला पाहिजे. भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचे आपले स्वप्न आहे, असे मोदी कायमच बोलतात. हे स्वप्नही ते त्यांच्याच जीवनकाळात पूर्ण करतील, असा विश्वास वाटतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. सामान्य माणूस या वयात निवृत्तीचे निवांत जीवन जगत असतो पण, मोदी यांच्या आयुष्यात निवांतपणा लिहिलेलाच नसावा. मोदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यास, या नेत्याच्या रूपात लाभलेल्या या भाग्याबद्दल अन्य देशांना भारताची असूया वाटण्याची शयता आहे. उलट भारतीयांना आपल्या देशाला असा नेता लाभल्याबद्दल गर्व वाटला पाहिजे. जवळपास सर्वच सामान्य भारतीयांची मोदी यांच्याबद्दल अशीच भावना आहे मात्र, त्याला अपवाद देशातील मोदी यांचे राजकीय विरोधक आहेत. हा त्यांच्या करंट्या नशिबाचा भागच म्हणावा लागेल. हेच त्यांच्या आजच्या दयनीय स्थितीचे कारण आहे.

मोदी गेली सलग २४ वर्षे सत्तास्थानावर आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १२ वर्षे आणि पंतप्रधान या नात्याने गेली ११ वर्षे, अशी सुमारे २४ वर्षे ते सत्तास्थानावर आहेत. त्याचा अर्थ ते सुखाने सत्तेचे लाभ उपभोगत आहेत असे नव्हे. उलट इतया वर्षांत एक दिवसही सुटी न घेता, ते देशाच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम करताना दिसतात. त्यांच्या राजकीय निर्णयांचे विश्लेषण आजवर अनेकदा झाले आहे आणि यापुढेही होत राहील. पण, मोदी यांनी स्वतःच्या कामाला दिलेले प्राधान्य आणि त्यांच्या कामाचा रोख पाहिल्यास, त्यांना सामाजिक बदल घडवून भारताला विश्वगुरू बनवायचे आहे, हे स्पष्ट होते. त्यांच्या सरकारने राबविलेल्या बहुतेक योजनांनी, समाजात चिरस्थायी आणि प्रगतिशील बदल घडवून आणला आहे.

मोदी यांच्याकडे केवळ राजकीय नेता म्हणून पाहिल्यास त्यांनी भारताला इतया अल्पावधीत जागतिक स्तरावरील एक महाशक्ती कसे बनविले, असा प्रश्न पडू शकतो. पण, मोदी यांच्या कारकिर्दीकडे पाहण्याचा तो अगदीच संकुचित दृष्टिकोन म्हणावा लागेल. गेले पाव शतक कायम राहिलेली आणि बहुदा वाढत जाणारी मोदी यांची लोकप्रियता, ही त्यांच्या सामाजिक निर्णयांचे फळ आहे. मोदी यांनी भारतात घडविलेले सामाजिक बदल हेच त्यांच्या यशाचे आणि भारताच्या आजच्या जागतिक स्तरावरील नेतृत्वाचे गमक आहे, असे म्हणावे लागते. भारत विश्वगुरू कसा बनू शकतो याचा सारा आराखडा मोदी यांच्या मनात कधीच तयार होता, हे त्यांनी घेतलेल्या अनेक सामाजिक सुधारणा निर्णयांनी दिसून येते.

मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच, सर्वप्रथम गरीब वर्गाला बँकेत जनधन खाती उघडण्यास भाग पाडले. त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केवळ पाच महिन्यांतच देशात, तब्बल १२ कोटी, ५० लाखांवर बँक खाती उघडली. आजघडीला देशातील ५६ कोटी जनधन खात्यांमध्ये २.६ लाख कोटी रुपये आहेत. या खात्यांमुळे दैनंदिन मोलमजुरी करणारा आणि घरकाम करणार्या महिलांसारखा अगदी तळागाळातील वर्ग, बँकिंग व्यवस्थेशी जोडला गेला. मोदी यांनी सर्व सरकारी योजनांचे लाभ थेट बँक खात्यातच पोहोचविण्याचा निर्णय घेतला आणि मध्यस्थांकडून होणार्या लुटीचा मार्गच कायमचा बुजवून टाकला. त्याच्या जोडीला त्यांनी ‘युपीआय’ या पद्धतीद्वारे सर्व व्यवहार करण्यावर भर दिला आणि बाजारातील रोख रकमेचे वितरण लक्षणीयरित्या कमी केले. लवकरच मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घोषित करून काळ्या पैशावरच नव्हे, तर रोख रकमेतील व्यवहारांवरही प्रहार केला. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला निर्णायक वळण लागले.

यानंतर आलेल्या ‘कोविड’च्या साथीने मोबाईलद्वारे व्यवहार करण्यास चालना दिली पण, या साथीतही मोदी यांनी भारतातील लसनिर्मिती आणि पीपीटी किट यांसारख्या संसाधनांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करून, भारताला स्वयंपूर्ण बनविले. याबरोबरच मोदी यांनी ‘उज्ज्वला’, ‘आयुष्मान भारत’, ‘पीएम आवास’, ‘पीएम सूर्यघर’, ‘अन्नसुरक्षा’, ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘स्वच्छ भारत’ यांसारख्या अनेक योजना सुरू केल्या होत्या. या योजनांमुळे ग्रामीणच नव्हे, तर शहरी भागातील तळागाळातील वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला. देशभरात महामार्ग आणि विमानतळांचे जाळे विणणे, नवी बंदरे उभारणे, आजवर न पोहोचलेल्या प्रदेशात रेल्वेसेवा उपलब्ध करून देणे, पर्वतीय प्रदेशात टनेलमार्ग बांधून हिवाळ्याच्या मोसमातही वाहतूक निर्वेध ठेवणे, यांसारख्या असंख्य पायाभूत सुविधा उभारण्यावर सरकारने व्यापक खर्च केल्याने, अर्थव्यवस्थेला विलक्षण गती मिळाली. येथे मोदी यांनी घेतलेल्या ‘जीएसटी’सारख्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करणे विस्तारभयास्तव टाळले आहे.

मोदी यांनी घेतलेले हे सर्व निर्णय, यापूर्वीच्या पंतप्रधानांनाही घेता आले असते. पण, त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती, गरीब जनतेबाबतची तळमळ आणि देशाला जागतिक स्तरावर महाशक्ती बनविण्याचे ध्येय यांपैकी कोणत्याच पंतप्रधानांकडे नव्हते. खरे तर मोदी यांनी सामान्य जनतेला दिलेल्या सुविधा या खासगी क्षेत्राद्वारे न देता, सरकारी योजनांद्वारे दिल्या असून, हे काम अन्य राजवटींनाही करणे शय होते. मोदी हे पंतप्रधानपदावर असतानाही स्वतःला एक संघ कार्यकर्ताच मानतात. आपल्या मायभूमीची म्हणजेच, देशातील अगदी गरीब माणसाची मदत करून देशाला जागतिक उच्चासनावर बसविणे, हेच प्रत्येक संघ कार्यकर्त्याचे ध्येय असते. मोदी यांनी आपल्या हाती असलेल्या देशाच्या सत्तेचा विनियोग देशातील गरीबवर्गाला आर्थिकदृष्ट्या उन्नत करण्यासाठी केला आणि अन्य पंतप्रधानांनी तो आपल्या वैयक्तिक किंवा पक्षाच्या विकासासाठी केला, हाच मोदी आणि अन्य नेत्यांमधील खरा फरक. मोदी यांच्या कार्याचा केंद्रबिंदू हा समाजातील सर्वांत तळाच्या वर्गाचे उन्नयन हाच राहिला आहे. म्हणूनच मोदी यांच्याकडे सदैव राजकीय नेत्याच्या दृष्टिकोनातून पाहणार्या विरोधकांना नैराश्याने घेरले आहे. मोदी यांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या सामाजिक कार्यात आहे. त्यांनी राज्यघटनेचे सर्रास उल्लंघन करणार्या आणि कायदा-सुव्यवस्था न राखणार्या राज्य सरकारांनाही बरखास्त केले नाही कारण, राजकारण हा त्यांच्या कार्याचा दुय्यम भाग आहे. अशी दृष्टी बाळगणारा नेता हाच खर्या अर्थाने भारताचा भाग्यविधाता होऊ शकतो, हे काय वेगळे सांगायला पाहिजे?

राहुल बोरगांवकर