मोदींच्या नेतृत्वात विकसित भारताचे स्वप्न साकार होणार ! मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचे गौरवोद्गार

17 Sep 2025 20:57:58

मुंबई, "पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केवळ १४० कोटी भारतीयांची चिंता वाहिली नाही, तर परदेशातील भारतीयांना सुद्धा अभिमान वाटावा असे कार्य ते सातत्याने करत राहिले. विकसित भारताचे स्वप्न हे पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत पूर्ण होईल याची मला खात्री आहे." असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केले. पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दि. १७ सप्टेंबर रोजी, मुंबईच्या किताब खाना येथे " मोदी : द मास्टर प्रॉब्लेम सॉल्वर" या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. युवा लेखक ग्रीनस्टोन लोबो आणि सतीश मोढ या लेखकांनी लिहिलेल्या या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीचा वेगवेगळ्या विद्याशाखातून आढावा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वातील पुढील वाटचालीचा वेध ज्योतिष शास्त्राच्या अनुषंगाने या पुस्तकात घेण्यात आला आहे. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अमित साटम म्हणाले की मोदींच्या कामाचा वेगळ्या प्रकारे आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे. लेखक सतीश मोढ म्हणाले की पंतप्रधान मोदींनी भारताचे भाग्यदोय बदलले. त्यांच्या कारकिर्दीमुळे भारताची समृद्ध वाटचाल आज आपल्याला बघायला मिळते आहे. लेखक ग्रीनस्टन लोबो आपले विचार मांडताना म्हणाले की पंतप्रधानांच्या नेतृत्वात परिवर्तनाची दिशा आपल्याला सापडते. आगामी काळात त्यांच्याच नेतृत्वामध्ये भारताचे सामर्थ्य जगाला कळेल. यावेळी सुप्रसिद्ध निवेदक सलील आचार्य मी या कार्यक्रमाची सूत्र सांभाळली.

Powered By Sangraha 9.0