पाटणा : (Patna High Court on PM Modi's Mother Al video by Bihar Congress)पाटणा उच्च न्यायालयाने बिहार काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केलेला पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईंचा एआयद्वारे (आर्टीफिशियल इंटेजिन्स) तयार केलेला व्हिडीओ हटवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात न्यायालयाने राहुल गांधी, भारतीय निवडणूक आयोग, मेटा, गुगल, एक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.
याप्रकरणी काँग्रेसविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर पाटणा उच्च न्यायालयात बुधवारी १७ सप्टेंबरला सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांकडून उपस्थित असलेले सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील संतोष कुमार, संजय अग्रवाल आणि प्रवीण कुमार यांनी न्यायालयाला विनंती केली की त्यांनी संबंधित एजन्सींना सर्व पोर्टलवरुन अशा कंटेंटचा प्रसार तत्काळ थांबवण्याचे आणि ती काढून टाकण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत.
यावर गंभीर दखल घेत न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. बिहार काँग्रेसला पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईंचा एआयद्वारे बनवलेला व्हिडिओ समाजमाध्यमांवरून हटवण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर बिहार काँग्रेसने हा व्हिडिओ एक्सवरुन काढून टाकला आहे.