राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये 'नमो उद्यान' विकसित करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

17 Sep 2025 15:40:13

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये वैशिष्टयपूर्ण तसेच नवीन नगरपंचायत, नगरपालिका योजने अंतर्गत ‘नमो उद्यान’ विकसित करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, १७ सप्टेंबर रोजी केली.

यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार असून या निर्णयामुळे राज्यातील एकूण ३९४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये वर्षभरात नमो उद्यान विकसित करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राने दिलेली ही भेट आहे, असे त्यांनी सांगितले.

नमो उद्यानांच्या स्पर्धेत कोट्यवधींची बक्षिसे

नव्याने विकसित झालेल्या या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून प्रत्येक विभागातून ३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींना बक्षिसे देण्यात येणार आहेत. नमो उद्यानांच्या या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना जाहीर करण्यात येतील. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी, द्वितीय तीन तर तृतीय क्रमांकासाठी एक कोटी रुपये अशी बक्षिसाची रक्कम अतिरिक्त विकास निधी म्हणून विजेत्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना देण्यात येणार आहे.


Powered By Sangraha 9.0