पनवेल : आर.डी.एस.एस. योजनेअंतर्गत मंजूर आजीवली–भातान २२ केव्ही वीज वाहिनी विलगीकरणाचे काम मंगळवार,दि.१६ सप्टेंबर रोजी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यामुळे आजीवली–भातान परिसरातील ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित होणार आहे.
याकामाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे महामार्ग पनवेलजवळ दुपारी २ ते ३ या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. प्रत्यक्ष कामासाठी तीन ते चार तास लागण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तथापि, काटेकोर नियोजन व संबंधित कर्मचारी वर्गाने घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे हे काम अवघ्या ३५ मिनिटांत पूर्ण करण्यात आले व परिणामी महामार्गावरील वाहतूक तत्काळ सुरळीत करण्यात आली.
या प्रसंगी उपकार्यकारी अभियंता एम. बी. राख, सहाय्यक अभियंता विनय महाडिक, रहमान अत्तार तसेच पनवेल शाखेचे सर्व कर्मचारी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित होते. या कामाच्या यशस्वी अंमलबजावणीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शेंडगे तसेच पोलीस निरीक्षक रोंगे व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. सदर काम गोपाला इंटरप्रायझेस या अजेन्सीच्या मदतीने पूर्ण करण्यात आले.