अखंड सावध असावे!

17 Sep 2025 12:12:54

नेंपाळमधील ‘जेन-झी’च्या आंदोलनानंतर आता तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. आगीमध्ये सरकारीसह खासगी वास्तूही भस्मसात करणारे तेथील तरुणांचे हातच आता देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात व्यस्त दिसतात. पण, एकीकडे नेपाळची गाडी हळूहळू रुळावर येत असताना, भारतात मात्र तशीच परिस्थिती कशी उद्भवेल, यासाठी राष्ट्रद्वेष्ट्या शक्ती एकाएकी सक्रिय झालेल्या दिसतात. नेपाळमध्ये ज्याप्रमाणे समाजमाध्यमांचा वापर करून सरकारविरोधी वातावरणनिर्मिती करण्यात आली, त्याच रणनीतीचा अवलंब करून, भारतातही अराजक माजवण्याच्या हालचालींना अलीकडे वेग आलेला दिसतो.

मग भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या मुलामुलींचा एक व्हिडिओ मुद्दाम तयार करून, त्यात त्यांचे शिक्षण कसे परदेशात झाले आहे, या पक्षात कशी घराणेशाही नांदते, असा संदेश समाजमाध्यमांवरून पसरविण्यात आला. एवढेच नाही, तर भारत-पाक खेळवल्या गेलेल्या सामन्यावरूनही अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह आणि ‘बीसीसीआय’ला पद्धतशीरपणे लक्ष्य करण्यात आले. हे कमी की काय म्हणून ‘फेक न्यूज’चे अक्षरशः पेवच समाजमाध्यमांवर सध्या फुटलेले दिसते. तसेच, नेपाळच्या आंदोलनानंतर काँग्रेससकट ‘इंडी’ आघाडीतील पक्षांनी चार टाळकी गोळा करून, सरकारविरोधात आंदोलनाची ठिणगी वगैरे पेटवण्याचाही अगदी बालिश प्रयत्न करून बघितला. पण, सगळे व्यर्थच!

या सगळ्यांतून मोदींच्या कारकिर्दीत काहीच कसे आलबेल नाही, हे विशेषत्वाने येथील ‘जेन-झी’च्या गळी उतरविण्यासाठी देशविदेशातून टूलकीट सक्रिय झाली आहे. नेपाळप्रमाणे भारतीय तरुणांचीही माथी भडकवायची, त्यांना रस्त्यावर उतरायला भाग पाडायचे, जाळपोळ करायची, आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये त्याची पद्धतशीर चर्चा घडवून आणून सरकारवर दबाव वाढवायचा, असे हे सगळे षड्यंत्र. पण, भारत हा नेपाळ नव्हता, नाही आणि कधीही होऊ शकत नाही. नेपाळच काय तर श्रीलंका, बांगलादेशसारखी परिस्थितीही भारतात उद्भवणे अशक्यच! परंतु, केवळ राजकीय पोळ्या भाजण्यासाठी विरोधकांकडून मोदीविरोधाचा अजेंडा असा जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. म्हणूनच तरुणांसह देशवासीयांनीही प्रत्यक्षात आणि समाजमाध्यमांवरही अखंड सावध असावे!

पाकींचे राहुलप्रेम...

जोना आवडे भारताला, तोचि आवडे पाकला’ अशी काहीशी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गत. म्हणूनच तर पाकिस्तानमधून वेळोवेळी राहुल गांधींवर स्तुतिसुमनांचा अक्षरशः वर्षाव होतो. आता या कौतुकवर्षावाची जणू राहुल गांधींनाही सवय झाली असावी. देशातून तर कुणी चार शब्द आपल्याविषयी फारचे प्रेमाचे बोलत नसेल, तर किमान पाकिस्तानमधून का होईना, आपल्या कामाची कुणी तरी दखल घेते आहे, तर अत्यानंद होणे साहजिकच नाही का... असो. कालही असेच काहीसे घडले आणि पुनश्च राहुल गांधींचा पाकिस्तानी फॅनक्लबचे भारतालाही अनायसे दर्शन घडले.

रविवारी भारत-पाकदरम्यानच्या क्रिकेट सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकी संघाची धुळधाण उडवली. मग काय, पराजयाचे हे उट्टे काढण्यासाठी पाकिस्तानचे आजी-माजी क्रिकेटपटू भारतावरही अक्षरशः तुटून पडले. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने तर भारताची तुलना चक्क इस्रायल आणि गाझा संघर्षाशी केली. एवढेच नाही, तर भारताची सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते नकारात्मक विचारसरणीचे लोक असल्याची मुक्ताफळेही आफ्रिदीने उधळली. भारताला, भारताच्या सरकारला एवढी दूषणे देऊनही एका भारतीयाचे मात्र आफ्रिदीने कौतुकागान गायले आणि तो भारतीय (शरीराने असला तरी मनाने?) म्हणजे राहुल गांधी. आफ्रिदी म्हणाला की, "भारतात सर्व वाईट आहेत, असे नाही. काही चांगले लोकही आहेत. राहुल गांधी सकारात्मक विचारांचे असून, ते जगाशी संवादाच्या माध्यमातून जगाबरोबर एकत्र येऊ इच्छितात. पण, यांच्या लोकांनी सुधरायला हवे.” आता ज्या लोकांना राहुल गांधी सकारात्मक वाटत असतील, त्यांच्या बुद्धिमत्तेची खरं तर कीव करावी तितकी कमीच. पण, राहुलप्रेमात आकंठ बुडालेला आफ्रिदी एकटा पाकी नव्हे. यापूर्वी इमरान खानच्या मंत्रिमंडळातील मंत्री फवाद चौधरीनेही राहुल गांधींचा एक व्हिडिओ ट्विट करीत ‘राहुल ऑन फायर’ अशी टिप्पणी केली होती. त्यावर राहुल गांधींनाही भाजप नेत्यांनी लक्ष्य केले होते आणि आज पुन्हा आफ्रिदीनेही राहुलप्रशंसेचे पूल बांधले आहेत. म्हणजेच काय तर, राहुल गांधी यांच्या भूमिका या पाकलाही तंतोतंत पटणार्‍या. म्हणूनच पाकींच्या या राहुलप्रेमावर ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ असा प्रश्न विचारले, तर त्यात गैर ते काय?
Powered By Sangraha 9.0