छत्रपती संभाजीनगर : आज छत्रपती संभाजीनगर हे सर्व गुंतवणूकदारांचे फेवरेट स्थान झाले असून गेल्या काही वर्षांत झालेली गुंतवणूक बघितली तर हे शहर इलेक्ट्रिक व्हेईकलची देशाची राजधानी बनते आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बुधवार, १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांना 'गार्ड ऑफ ऑनर' प्रदान करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह इतर आमदार, खासदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मराठवाड्याला मुक्ती मिळवून देण्याच्या या स्वातंत्र्य लढ्यात अनेक नावे घेता येतील. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास १३ महिने हा रणसंग्राम चालला आणि त्यातून मराठवाड्याला मुक्ती मिळाली. त्यामुळेच हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नसून एकसंघ भारत निर्मितीचा दिवस म्हणूनही आपण याकडे पाहू शकतो. या सर्व लोकांचा आदर ठेवणे हे आपले परम कर्तव्य आहे. मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहोत. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दगावलेल्या लोकांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येईल. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि गावकऱ्यांच्या पाठीशी सरकार निश्चितपणे उभे राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ करणार
“दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघितला आहे. परंतू, मराठवाड्याचा दुष्काळ आता भुतकाळ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आपण कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यापर्यंत आणले. आता दुसऱ्या टप्प्यात सांगली आणि कोल्हापूरचे पुराचे पाणी उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आणणार आहोत. त्यासोबतच उल्हास खोऱ्याचे ५४ टीएमसी पाणीसुद्धा मराठवाड्यात आणणार आहोत. मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यातील तूट दूर करून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम सरकारमार्फत केले जाईल. हे काम केवळ कागदावर राहिले नसून सगळ्या मान्यता घेऊन डिसेंबरपर्यंत त्याचा आराखडा तयार होईल. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्याची निविदा काढून पुढच्या सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम सुरु केले आहे,” असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रिक व्हेईकलची राजधानी
“छत्रपती संभाजीनगर शहराच्या पिण्याच्या पाण्याकरिता २७०० कोटी रुपयांची योजना सरकारने मंजूर केली. महाराष्ट्राच्या औद्योगीकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढचे मॅगनेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना होणार असल्याचे मी सांगितले होते. आज ते आपल्याला सत्य होताना दिसत आहे. आज छत्रपती संभाजीनगर हे सर्व गुंतवणूकदारांचे फेवरेट स्थान झाले आहे. गेल्या काही वर्षांत झालेली गुंतवणूक बघितली तर छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेईकलची देशाची राजधानी बनते आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणून रोजगारनिर्मिती करतो आहोत. अहिल्यानगरपासून तर बीडपर्यंत रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायूतीचे सरकार मराठवाड्याच्या हिताकसाठी आणि प्रगतीकरिता काम करत राहील. यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि सूचना आमच्याकरिता मोलाच्या ठरतील,” अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
हा स्वातंत्र्यसंग्राम सेनानींचा अपमान
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना काही लोकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम साजरा करत असताना काही लोकांनी येऊन नारेबाजी करणे यापेक्षा मोठा स्वातंत्र्यसंग्राम सेनानींचा अपमान असूच शकत नाही. पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल. चारच माणसे येतात आणि अशाप्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. मी यासंदर्भात काहीच बोलणार नाही.”