मायेचं मंदिर

17 Sep 2025 22:24:07

विशेष मुलांना शालेय शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अद्वितीय काम करणाऱ्या स्वाती महेंद्र मोहिते यांच्याविषयी...


समाजात आजही असे काही पालक आहेत, ज्यांना स्वतःचीच दिव्यांग मुले एकप्रकारचे ओझे वाटतात. परंतु, अशी मुले पेणच्या स्वाती महेंद्र मोहिते यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनली आहेत. गेली अनेक वर्षे त्या या मुलांवर आई सारखी माया करत त्यांची सेवासुश्रुषा करत आहेत. स्वाती यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक मुलांना शिक्षण, आधार आणि आत्मविश्वासही मिळाला आहे. मूळत: कोल्हापूरच्या असलेल्या स्वाती, सध्या पेण येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे संपूर्ण बालपण कोल्हापूर येथेच गेले. नूतन मराठी हायस्कूल येथे त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर शहाजी महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. बारावीनंतर लगेचच त्यांचे लग्न होऊन त्या पेणला आल्या. माहेरच्या मंडळींप्रमाणेच सासरची मंडळीही, कायमच स्वाती यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी आहेत.

लग्नाच्या साधारण वर्षभरानंतर उभयतांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली, तिचे नाव चैताली. चैतालीमुळे घरातले वातावरण कायमच उत्साही असे. चैताली जेव्हा तीन महिन्यांची झाली, तेव्हा मात्र त्यांना तिची थोडी चिंता वाटू लागली. कारण, तीन महिन्यांची होऊनही तिला कुशी वळता येत नव्हते. ती जेव्हा पाच महिन्यांची झाली, तेव्हा चैतालीमध्ये काहीतरी वेगळेपण असल्याचे जाणवले. यावर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, मात्र तिथेही ठोस निदान झाले नाही. चैतालीला खेडला लग्नासाठी नेले असता तिला प्रचंड सर्दी झाली. तिथल्या एका डॉटरांना दाखवले, तेव्हा त्यांना चैतालीमधले वेगळेपण जाणवले. डॉक्टरांनी ‘तिच्या डोयाचा घेर कमी वाटतोय, ही अॅबनॉर्मल आहे,’ असे म्हटले. तेव्हा स्वाती आणि त्यांच्या यजमानांच्या पायाखालची जमीनच सरकली. महत्त्वाचे म्हणजे, यानंतर स्वाती यांनी चैतालीला कधीच आपल्या आयुष्याचे ओझे मानले नाही. मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयामध्ये चैतालीवरच्या उपचारास सुरुवात झाली. डॉटरांनी वेळोवेळी समुपदेशनही केले. मुंबईत फिजिओथेरपी सुरू झाली. वर्षभरानंतर स्पिच थेरपीला सुरुवात झाली. स्वाती यांचे पती रिलायन्स कंपनी नागोठणे येथे सिविल इंजिनिअर असल्यामुळे, चैतालीसाठी खर्च करणे शय होते, पाच वर्षांची झाल्यानंतर डॉटरांनी तिला विशेष मुलांच्या शाळेत घालण्याबाबत सांगितले. पण पेणमध्ये अशा शाळेची सुविधा नव्हती. मुंबईच्या शाळांनीदेखील चैतालीला प्रवेश नाकारला. त्यामुळे स्वाती तिला पेणच्या सर्वसामान्य मुलांच्या ‘सुबोध’ शाळेतच घेऊन जाऊ लागल्या. याच शाळेत स्वाती यांनी शिक्षिकेचे काम केले. त्याचदरम्यान बेलापूरच्या ‘राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य आणि तंत्रिका विज्ञान संस्थान’ (एनआईएमएच) येथे, स्वाती यांनी ‘स्पेशल डीएड’ व ‘स्पेशल बीएड’चे शिक्षण घेतले आणि स्वतःच्या घरात एक खोली रिकामी करून, तिथे चैतालीसारख्या विशेष मुलांना विशेष शिक्षण देण्यास सुरुवात केली.

जसजसे इतरांना याविषयी कळत गेले, तसतसे एक-एक करत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. एका महिलेला धुणी-भांडी करायला जावे लागे, त्यामुळे तिने आपल्या मुलीला स्वाती यांच्याकडे सांभाळण्यासाठी पाठवले. त्यानंतर ‘सुबोध’ शाळेत अशी दिव्यांग मुले आली, तर तीदेखील स्वाती यांच्या छत्रछायेखालीच पाठवली जायची. सुरुवातीला चार विद्यार्थी होते, ज्यांना त्या विनामूल्य शिकवायच्या. त्यांची मैत्रीण प्रेमलता पाटील, या सुद्धा चांगल्या पगाराची नोकरी सोडून, पनवेलहून पेणला या दिव्यांग मुलांकरिता येऊ लागल्या. त्यावेळी एकूण १५ विद्यार्थी स्वाती यांच्याकडे शिकत होते. त्यानंतर तीन शिक्षक आणि एक केअर टेकर असा त्यांचा प्रवास सुरू झाला. मधल्या काळात जित्याच्या मुलांशी संपर्क आला, त्यामध्ये १८ वर्षांपुढील मुले होती. मात्र, त्यांना आणण्याची आणि परत सोडण्याची व्यवस्था होत नव्हती. अशावेळी त्यांचा भाऊ म्हणजे सचिनच्या दुकानातील दोन मेकॅनिक ड्रायव्हर त्यांच्या मदतीला धावून आले. त्यापैकी एकजण सकाळी मुलांना जीपने घेऊन यायचा आणि दुसरा संध्याकाळी जित्याला सोडायला जाई. मुलांच्या वाढत्या संख्येमुळे स्वाती यांनी सात जागा बदलल्या. सातवी जागा जी लोकमान्य सोसायटीत होती, ती त्यांना गोरेगावच्या वामन मिरवणकर यांनी विनामूल्य दिली.

सध्या अॅड. सविता फडके आणि उषा फडके यांनी दिलेल्या पाच गुंठ जमिनीवर,,‘आई डे केअर’ संस्था संचालित मतिमंद (दिव्यांग) मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण केंद्र, रामवाडी पेण येथे आज तीन मजली इमारत उभी आहे. ४० विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था इथे असून, सध्या १६ विद्यार्थी इथे राहतात. या संस्थेची स्थापना २०१० साली झाली. वयवर्ष तीन ते ५७ पर्यंतचे एकूण ६९ विद्यार्थी या संस्थेत शिकत आहेत. समाजातील विशेष मुलांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण देऊन, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम या संस्थेद्वारे केले जात आहे. संस्थेमध्ये विशिष्ट वर्गरचना करण्यात आली असून, त्यानुसार शैक्षणिक गोष्टींचे शिक्षणही दिले जाते. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात, तसेच व्यावसायिक गोष्टीही शिकवल्या जातात. व्यावसायिक कौशल्याप्रमाणे विविध आकारांची व रंगांची फुले- बुके तयार करणे, दीपावलीकरिता मातीच्या पणत्या रंगविणे, विविध प्रकारच्या राख्या बनविणे, पेपर बॅग बनविणे, शाडू मातीपासून उंदीर, हरतालिका, लहान गणपती बनविणे असे नाना प्रकारचे उपक्रम संस्थेअंतर्गत सुरू असतात. या कार्यासाठी ४१ विविध प्रकारचे पुरस्कार स्वाती यांना मिळाले आहेत. स्वाती मोहिते यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा!

अधिक माहितीसाठी - ९७६६६२८५९३
Powered By Sangraha 9.0