खंबीरपणाचे तत्त्वज्ञान आणि ताणमुक्तीची भूमिका

16 Sep 2025 13:01:36

आयुष्यात एखाद्या दु:खद प्रसंगानंतर किंवा कोणत्याही कारणास्तव मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या खचल्यानंतर ‘मन घट्ट करा. खंबीर व्हा’ असा सल्ला आप्टेष्ट, मित्र, गुरुवर्यांकडून बरेचदा दिला जातो. पण, ‘खंबीर व्हा’, ‘स्वत:ला सावरा’ म्हणजे नेमके काय करायचे, याविषयी कुणी खोलात जाऊन भाष्य करीत नाही. तसेच खंबीरपणा हा फक्त संकटसमयीच उपयुक्त ठरतो, असेही नाही, तर दैनंदिन आयुष्यातही हाच खंबीरपणा अनेकविध आव्हानांना तोंड देण्यासाठी मनाला आणि मनगटालाही बळकटी देतो. तेव्हा, अशा या खंबीरपणाचे तत्त्वज्ञान आणि ताणमुक्तीविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...

ताण हा आजच्या काळातील माणसाचा सर्वांत मोठा शत्रू मानला जातो. कामाचा दबाव, नातेसंबंधातील गुंतागुंत, सामाजिक अपेक्षा आणि व्यक्तिमत्त्वावर असलेली जबाबदारी यामुळे अनेकदा मन अस्वस्थ होते. अशा परिस्थितीत आपला मानसिक समतोल राखण्यासाठी खंबीरपणा (रीीशीींर्ळींशपशीी) हा एक महत्त्वाचा मंत्र ठरतो. खंबीरपणा म्हणजे भांडण नव्हे, तर स्वतःच्या मनातील शांततेला धैर्याने व्यक्त करण्याची कला आहे. खंबीर असणे म्हणजे आक्रमक होणे नाही; उलट, खंबीर व्यक्ती इतरांचा सन्मान राखत स्वतःचे मत मांडते.

खंबीरपणाचे तत्त्वज्ञान आपल्या जीवनात संवादाच्या प्रत्येक पैलूवर प्रभाव टाकते. आपण सतत संवाद साधत असतो-कुटुंबात, कार्यक्षेत्रात, समाजात. परंतु, संवादाला खरी दिशा देणारे एक मूलभूत कौशल्य म्हणजे खंबीरपणा. खंबीर असणे म्हणजे स्वतःचे विचार, भावना आणि गरजा स्पष्ट, संतुलित आणि आदरपूर्वक व्यक्त करणे. हा दृष्टिकोन केवळ वैयक्तिक नातेसंबंध घडवत नाही, तर तणाव कमी करून मानसिक आरोग्य अधिक बळकट करतो.

खूपदा आपण इतरांना खूश करण्यासाठी, वाद टाळण्यासाठी किंवा गैरसमज टाळण्यासाठी आपले विचार मनातच दडपून टाकतो. ही भूमिका बाहेरून शांत वाटली, तरी आतून ती अस्वस्थता, राग, असाहाय्यता आणि ताण निर्माण करते. दुसरीकडे, आपण खूप आक्रमक बनलो, तर आपले शब्द आणि कृती इतरांच्या अधिकारांना धक्का पोहोचवतात. यामुळे अविश्वास, मतभेद आणि तणाव वाढतो. या दोन्ही टोकांपासून दूर मध्यातली सोनेरी वाट म्हणजे खंबीर संवाद, ज्या मार्गावर नातेसंबंध संतुलित राहतात आणि व्यक्तीची आत्मविश्वासाची मुळे खोलवर रुजतात.

खंबीरपणा आपल्याला हो आणि नाही म्हणण्याची कला शिकवतो. नाही म्हणणे म्हणजे उद्धटपणा नव्हे, तर आत्मसन्मानाचे प्रकटीकरण आहे. स्वतःच्या मर्यादा ठरविणे आणि त्या स्पष्टपणे व्यक्त करणे म्हणजे दीर्घकालीन ताणमुक्त जीवनात गुंतवणूक करणे. संशोधनातून असे दिसून आले आहे की जे लोक असतात, त्यांच्यात ताण, चिंता आणि नैराश्य लक्षणीयरित्या कमी होते, आत्मसन्मान वाढतो, निर्णयक्षमता सुधारते आणि नात्यांमध्ये प्रामाणिकपणा व विश्वास अधिक दृढ होतो.

खंबीर संवादाचे सौंदर्य आदराच्या पायांवर उभे राहते. स्वतःच्या अधिकारांची जाणीव असणारा इतरांच्या अधिकारांचा सन्मान राखतो. असे मला वाटते, मला हे मान्य नाही, मी तुला मदत करू शकतो, पण आता नाही, अशा साध्या, पण स्पष्ट वायांमुळे संवाद सुसंस्कृत, संतुलित आणि परिणामकारक होतो. अशा संवादातून केवळ गैरसमज टाळले जात नाहीत, तर सहकार्याचे आणि समजुतीचे वातावरणही निर्माण होते.

खंबीर असणे हे परिस्थितीवर अवलंबून असणे. याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक प्रसंगात तुम्ही तितकेच ठाम राहाल. कोणत्या प्रसंगी, कसे आणि कितपत खंबीर राहायचे, हे ठरवण्यासाठी प्रत्येक परिस्थितीची बारकाईने तपासणी आणि मूल्यांकन आवश्यक असते. वैयक्तिक दृढनिश्चय साधण्यासाठी परिस्थितीतील घटक, जोखीम, फायदे आणि त्याचे परिणाम सतत मोजणे महत्त्वाचे असते. प्रत्येकासाठी एकच मार्ग नाही. संपूर्ण संतुलन साधण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे असते. स्वतःचा आत्मसन्मान शाबूत ठेवणे आवश्यक असते उदाहरणार्थ, समजा जरी तुम्ही आधीच व्यस्त असाल आणि तुमच्या एखाद्या सहकार्‍याने तुम्हाला प्रकल्प सांभाळण्यास विचारले. तुम्ही सहज होकार दिल्यामुळे तुम्हाला जास्त वेळ काम करावे लागेल आणि तुमच्या मुलीच्या शाळेतील समारंभाला उपस्थित राहता येणार नाही. तुमचा उद्देश शांतता राखणे असू शकतो, परंतु सतत होकार देणे तुमच्या नात्यांमध्ये नकारात्मक परिणाम निर्माण करू शकते. यापेक्षा वाईट म्हणजे, तुमच्या मनातील अंतर्गत संघर्षाला कारणीभूत ठरू शकते. कारण, तुमच्या गरजा आणि कुटुंबाच्या गरजा तुम्ही सतत दुसर्‍या क्रमांकावर ठेवत असता. यामुळे, खंबीर संवाद म्हणजे इतरांचा सन्मान राखून स्वतःची भूमिका ठरवण्याची कला, जी अंतर्गत शांतता, आत्मविश्वास आणि नात्यांच्या सामंजस्याचे रक्षण करते.

आजच्या वेगवान जीवनात खंबीरपणा ही गरज बनली आहे. कामाचा ताण, जबाबदार्‍या, नात्यांतील गुंतागुंत या सर्वांना संतुलित ठेवण्यासाठी खंबीर वृत्ती हेच खरे सुरक्षाकवच आहे. ते आपल्याला संतुलनाचा मंत्र शिकवते. खूप निष्क्रिय न राहता आणि खूप आक्रमक न होता, योग्य तोडगा काढणे, हेच तणावमुक्त

आयुष्याचे रहस्य आहे.खंबीरपणा शिकण्यासाठी काही सोपे उपाय

१. स्वतःच्या संवादशैलीचे प्रामाणिक मूल्यमापन करा.

२. मी’ने सुरू होणारी वाये वापरा, मला वाटते, मला गरज आहे.

३. ‘नाही’ म्हणायचा सराव करा.

४. देहबोली आत्मविश्वासपूर्ण ठेवा. डोळ्यांना डोळे भिडवा, चेहर्‍यावर संतुलित भाव ठेवा.

५. भावनांवर नियंत्रण ठेवा, पण त्यांना नाकारू नका.

६. छोट्या प्रसंगांपासून सराव सुरू करा आणि हळूहळू अवघड परिस्थितींना सामोरे जा.

जेव्हा आपण स्वतःची सीमा स्पष्टपणे आखतो, तेव्हाच आपण इतरांना खर्‍या अर्थाने समजून घेऊ शकतो. खंबीरपणा म्हणजे इतरांना नाकारण्याचा प्रयत्न नसून, स्वतःला हरवू न देता, योग्य संवाद साधण्याची वृत्ती आहे. खंबीरपणा म्हणजे वाहत्या नदीसारखा आपला मार्ग ठाम ठेवतो, पण दगडांना आदळूनही त्यांना न दुखावता पुढे सरकतो. खंबीरपणाचे हे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात अंगीकारल्यास, अनावश्यक ताण हळूहळू वितळू लागतो. अशा वेळी मन हलके होते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवन अधिक निरोगी, संतुलित व आनंदी वाटते.

खंबीरपणा म्हणजे फक्त संवादाचे कौशल्य नाही, तर एक जीवनतत्त्व आहे. तो आत्मसन्मान वाढवतो, तणाव कमी करतो आणि नात्यांना प्रामाणिक आधार देतो. अशा संतुलित दृष्टिकोनातूनच खरी माणुसकी आणि समाधानाचा मार्ग सापडतो.

- डॉ. शुभांगी पारकर

Powered By Sangraha 9.0