नवी दिल्ली, जातीव्यवस्था नष्ट होण्यासाठी संघाने नेहमीच भूमिका घेतली आहे. सामाजिक समतेचा विषय संघाने अतिशय प्रखरतेने वेळोवेळी मांडला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा. स्व. संघ) शताब्दीनिमित्त मासिक हिंदी विवेकतर्फे निर्मित 'दीपस्तंभ' या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
दीपस्तंभ हा समुद्रात किती महत्वाचा असतो हे आपण जाणतो. राष्ट्रजीवनातही संघाच्या दीपस्तंभापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न हिंदी विवेकने या ग्रंथातर्फे केला आहे. संघाच्या शताब्दी वर्षात हा ग्रंथ प्रकाशित होणे विशेष आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवक आणि संस्था यांचे कार्य याद्वारे समाजापुढे येईल. व्यक्तीनिर्माण हे संघाचे प्रमुख कार्य. व्यक्तीचा स्वभाव आणि कार्यशैली, चरित्र यात संघात काम करताना आमूलाग्र बदल होतो. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना करताना विशिष्ट विचार केला होता. भारत हा प्राचीन काळापासून शक्तिशाली होता, मात्र व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी येथे राज्य केले. याचे प्रमुख कारण म्हणजे संघटित नसणे. याचे मुख्य कारण म्हणजे व्यक्तीच्या मनात एकतेची भावना नसणे. त्यामुळेच समाजात एकतेची भावना निर्माण करण्यासाठी संघाची स्थापना झाली. यासाठी अनेक पिढ्यांनी कार्य केले असून आताही अनेक पिढ्या कार्यरत आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
जातीव्यवस्था नष्ट होण्यासाठी संघाने नेहमीच भूमिका घेतली आहे. सामाजिक समतेचा विषय संघाने अतिशय प्रखरतेने वेळोवेळी मांडला आहे. देशाच्या विकासासाठी जातीव्यवस्था नष्ट करून हिंदू म्हणून काम करणे आवश्यक आहे. मात्र संघास जाणीवपूर्वक जातीयवादी ठरविण्याचे प्रयत्न करण्यात आले. समाजाला जात,भाषा या आधारावर तोडण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समाजाने घेण्याची आहे. आदर्श पिता, पुत्र, राजा कसा असावा, हे त्यांच्या कार्यातून कळते. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापून हिंदूंपुढे आदर्श निर्माण केला. त्यामुळेच आज जरी काही लोकांची पूजापद्धती बदलली असली तरीदेखील तेदेखील आपलेच असल्याचे विसरता कामा नये, असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नमूद केले.
संघाच्या अखिल भारतीय प्रचारटोळीचे सदस्य मुकुल कानिटकर म्हणाले, संघाच्या यात्रेस १०० वर्षे पूर्ण झाले आहेत. वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार यांनी रोवलेल्या बीजाचा आता वटवृक्ष झाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी संघाचा व्याप भविष्यात कसा वाढेल, याचा विचार त्यांनी तेव्हाच केला होता. प्रसिद्धी कार्य असो अथवा विविध आयाम असो, याचा विचार डॉक्टर हेडगेवार यांनी केला होता. संघाच्या स्थापनेचा काळ हा अत्यंत धामधुमीचा होता, देशाचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आले होते. त्यावेळीच काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या हेडगेवार यांनी स्वातंत्र्यानंतर भारताने जगास दिशा द्यावी, असा ठराव मांडला होता. राष्ट्रनिर्माण आणि व्यक्तीनिर्माण यासाठी संघाची स्थापना करण्यात आली होती आणि त्यानुसार संघाची वाटचाल आज समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये सुरू आहे.
हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत रमेश पतंगे म्हणाले, यंदाचे वर्ष हे संघाचे शताब्दी वर्ष आहे. १०० संघाविषयी विचार करताना अनेक प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरे शोधावी लागतात. ज्याप्रमाणे धर्म हा भारताचा आत्मा आहे, असे आपण म्हणतो; त्याप्रमाणे काळानुरूप धर्मजागरण करणे हा संघकार्याचा आत्मा आहे. धर्माच्या रक्षणासाठी समाजात जागृती करण्याचे काम संघ गेल्या १०० वर्षांपासून करत आहे. हिंदू समाजाचे सुप्त सामर्थ्य जागृत करण्यासाठी हे कार्य आहे. धर्माचे रक्षण आणि राष्ट्राचे रक्षण या परस्परांशी संबंधित बाबी आहेत आणि संघ त्यासाठी सतत कार्यरत आहे.
हिंदी विवेकचे सीईओ अमोल पेडणेकर म्हणाले, रा. स्व. संघास १०० वर्षे पूर्ण होणे हे समाजासाठी गौरवास्पद आहे. त्यामुळे संघाचा विविधांगी असलेला प्रवास या ग्रंथाद्वारे मांडण्यात आला आहे.