देहरादून : उत्तराखंडमधील देहरादून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरड कोसळली आहे. माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, नद्यांना पूर आल्यामुळे तापकेश्वर, डीआयटी कॉलेज परिसर, राजपूर शिखर धबधबा आणि भगतसिंग कॉलनी या भागांमध्ये अडकलेले पाच नागरिक वाहून गेल्याची नोंद करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी दि. १६ सप्टेंबर रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी चर्चा करत परिस्थितीबद्दल माहिती घेतली, असे उत्तराखंड राज्य सरकारने म्हटले आहे. "त्यांनी राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय केंद्र सरकार या आपत्तीकाळात खंबीरपणे उत्तराखंडच्या पाठीशी उभे आहे", असे सरकारी पत्रकात म्हटले आहे.
शहरातील विविध भागात १०० हून अधिक लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे. रायपूरच्या पंचकुलीमध्ये किमान ३० लोक अडकले आहेत आणि प्रेमनगरमधील श्री देवभूमी संस्थेतील ५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या आपत्तीच्या काळात देहरादून शहरातील शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आली असून, आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांच्या पथकांकडून शहरातील अनेक भागांमध्ये बचाव कार्य सुरू आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार सतत सुरू असलेल्या पावसाचा अंदाज घेऊन, आपत्तीजनक परिसरात राहत असलेल्या अनेक रहिवाशांना रात्रीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तरी देखील काही भागांमध्ये लोक अडकल्याची माहिती मिळाली असून त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु आहे.
मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास भारतीय हवामान विभागाने देहरादून शहराला रेड अलर्ट जारी केला होता. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी येण्याचा अंदाज वर्तवला होता. शिवाय राज्य शासनाकडून देखील माहिती देण्यात आली होती की, जिल्ह्यातील सध्याच्या हवामानामुळे संवेदनशील भागात भूस्खलन आणि अचानक पूर येण्याची शक्यता वाढली आहे, ज्यामुळे अनुचित घटना घडू शकतात.