भारत : नव्या जागतिक समीकरणांचा केंद्रबिंदु

    16-Sep-2025
Total Views |

रशिया-युक्रेन युद्धाच्या छायेत अडकलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत, अमेरिकेने युरोपवर दबाव टाकत भूमिकेत बदल केला, तर रशियाने भारताच्या स्वायत्त भूमिकेला उघड पाठबळ दिले. या घडामोडींनी भारताचे आंतरराष्ट्रीय वजन अभूतपूर्वरित्या वाढले आहे आणि नवी भूराजकीय समीकरणे आकार घेत आहेत.

जागतिक राजकारणातील समीकरणे इतया वेगाने बदलत आहेत की, कालपर्यंत भारतविरोधी वक्तव्ये करणारी अमेरिका, ती आज सामोपचाराची भाषा वापरत आहे. तर रशियाने उघडपणे भारताच्या भूमिकेचे समर्थन करत, भारताला पूर्ण पाठिंबा दिला आहे. गेल्या काही महिन्यांत भारताची कूटनीती एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली असल्याचे दिसून येते. भारत आता जागतिक शक्ती संतुलनाचा निर्णायक ध्रुव म्हणून प्रस्थापित झाला आहे, याचेच हे द्योतक. अमेरिकेने नुकताच आपला सूर बदलत युरोपीय महासंघाने रशियन तेल आयातीवर कठोर कारवाई करावी, असे सूचवले, तर दुसरीकडे रशियाने भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ही भारताच्या वाढत्या सामर्थ्याची ठोस साक्ष आहेे. अमेरिकेच्या भूमिकेतील झालेला बदल हेच दर्शवतो की, भारताला वगळून कोणतेही जागतिक समीकरण प्रत्यक्षात येणार नाही. व्यापार, ऊर्जा, भूराजकीय स्थैर्य या सर्व क्षेत्रांत भारत हा अपरिहार्य झाला आहे. शीतयुद्धकाळातील रशियाबरोबरची पारंपरिक मैत्री आता रणनीतिक भागीदारीमध्ये रूपांतरित झाली असून, पाश्चात्यांचा दबाव कायम असतानाही रशिया भारताला जागतिक स्थैर्याचा केंद्रबिंदू मानतो. रशियाने दिलेली ही मान्यता, भारताच्या मुत्सद्दी संतुलन क्षमतेचे प्रतीक ठरते.

भारताने रशियाबरोबरचे व्यापारी संबंध संपुष्टात आणावेत, यासाठी अमेरिकेने सर्व ते प्रयत्न केले. तथापि, भारताने अमेरिकेच्या दबावाला भीक घातली नाहीच, उलटपक्षी चीनबरोबरचे संबंध वृद्धिंगत होण्यासाठी नव्याने मोहीम हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचा दौरा करत संपूर्ण जगाला चकित केले. चीनला रोखण्याचे काम केवळ भारतच करू शकतो याची पूर्ण जाणीव असलेल्या अमेरिकेच्या भूमिकेत, त्यानंतर बदल दिसून आला. भारताला काहीही करून आपण थांबवू या भ्रमात असलेली अमेरिका, आता सारवासारव करत भारताबरोबर व्यापारी करार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकेच्या भूमिकेत मवाळपणा आला असून, अमेरिकन धोरणकर्ते भारताच्या रशियाबरोबरील व्यापारामुळे ऊर्जेचे दर स्थिर राहिल्याचे कौतुक करत आहेत. भारत-अमेरिका व्यापारसंबंध आता ‘पुरवठा साखळी मित्र’ या संकल्पनेखाली पुन्हा दृढ केले जात असून, अमेरिका स्पष्टपणे म्हणते आहे की चीनवरील अवलंबन कमी करण्यासाठी भारत हा त्यांचा नैसर्गिक भागीदार आहे. विकसनशील जगाचा प्रतिनिधी म्हणून भारताचे संबोधन करणारी अमेरिका, आता भारताला समान दर्जाचा धोरणात्मक भागीदार मानत आहे. अमेरिकेच्या भूमिकेतला बदल ही अमेरिकेची गरज आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीपासून वाचवण्यासाठी भारताविना पर्याय नाही, ही वस्तुस्थिती अमेरिकेने स्वीकारलेली दिसते.

रशियाने तर आता उघडपणे भारताची बाजू घेत, अमेरिकेला पुन्हा खडे बोल सुनावले आहेत. अमेरिकी नेते भारतावर रशियन तेल खरेदी थांबवण्याचा दबाव टाकत असताना, रशियन अधिकार्‍यांचे एकच उत्तर असते आणि ते म्हणजे भारताचे निर्णय भारत घेईल; आम्ही त्याचे स्वागत करतो. भारताची सार्वभौम निर्णयक्षमता रशियाने मान्य केल्याचेच, यातून दिसते. संरक्षण, अवकाश, ऊर्जा अशा कळीच्या क्षेत्रांत रशियाने भारतावर विश्वास ठ, दीर्घकालीन करार केले आहेत. जागतिक तणावाच्या काळातही हे करार रद्द झालेले नाहीत, हे विशेष. रशियाच्या विश्वासार्हतेचे हे सार्थ उदाहरण ठरावे. पाश्चात्य माध्यमांत भारताच्या रशियासंबंधी भूमिकेवर टीका झाल्यावर, रशियाने खुल्या व्यासपीठावर भारताच्या बाजूने ठोस भूमिका मांडली. या दोन्ही महासत्तांच्या भूमिकेतील बदल बारकाईने पाहिला असता भारत आता विकसित देशांचा प्रतिनिधी राहिला नसून, जागतिक संतुलनाचे नवे केंद्र म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवल्याचे स्पष्ट संकेतही मिळतात. ही मान्यता मिळण्यामागे काही कारणेही आहेत.

भारताने रशियासोबतही ऊर्जा व्यवहार कायम ठेवले आणि अमेरिकेसोबत संरक्षण व तंत्रज्ञान सहकार्यही वाढवले. एकाच वेळी रशिया आणि अमेरिका या दोन्ही परस्परविरोधी राष्ट्रांबरोबर संबंध राखणे, ही अत्यंत अवघड पण कमालीची यशस्वी ठरलेली कूटनीती होती. ‘कोविड’ पश्चात जगात उत्पादन केंद्रांचे विकेंद्रीकरण सुरू झाले आणि चीनवरील अवलंबन कमी करण्यासाठी, भारत हा सर्वोच्च पर्याय बनला. भारताच्या औद्योगिक क्षमतेचे ते द्योतक आहे. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील विकसनशील देश, भारताकडे आमच्यातलाच एक या नात्याने पाहतात आणि अमेरिका-युरोप भारताला भागीदार समजतात. अमेरिका भारतावर अधिकाधिक आयातकर लादण्याच्या धमया देत असताना, भारताने युरोपीय महासंघाबरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी वेगाने पावले उचलली. आज अमेरिका युरोपीय महासंघावर, रशियाकडून तेल खरेदी करणार्‍या देशांवर उपाययोजना करण्याची मागणी करत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडून ज्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्याचबरोबर भारतावरील जबाबदारीही वाढली आहे. जागतिक तेल दरांतील अस्थिरता आणि व्यापारयुद्धांच्या शयता, या दोन्ही गोष्टी भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका देऊ शकतात. त्यामुळे ऊर्जा विविधीकरण आणि स्थानिक उत्पादनावर भारताला भर द्यावा लागेल. महत्त्वाचे म्हणजे, भारताने स्थैर्य प्रदान करणारा देश म्हणून काम करणे गरजेचे आहे. संपूर्ण जग आज अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे; अशावेळी भारताने स्थिरता राखण्यासाठी ठोस उपाय राबवले तर तो संपूर्ण जगाचा विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयास येईल. येणार्‍या काळात, अमेरिका, युरोप, रशिया आणि चीन या सर्वांनाच, त्यांच्या समीकरणांत भारताला केंद्रस्थानी ठेवावे लागेल.

भारताशी वैर हे आता केवळ एका देशाशी नव्हे, तर संपूर्ण नव्या जागतिक व्यवस्थेशी वैर ठरणार आहे. हीच खरी भारताच्या नव्या आंतरराष्ट्रीय भूमिकेची ताकद आहे. हाच बदल आज अमेरिका आणि रशिया या दोघांनी मान्य केला आहे. अमेरिकेची बदललेली भूमिका आणि रशियाचे ठाम समर्थन हे दोन्ही घटक, भारत आता जागतिक राजकारणात एक महत्त्चाची शक्ती झाल्याचा संकेत देत आहेत. ही उंची भारताने सर्व अशांततेतही न डगमगता, आपली स्वतंत्र भूमिका राखत गाठलेली आहे. जगाला आज स्थैर्याची गरज आहे आणि भारत त्या स्थैर्याचा ध्रुव म्हणून समोर येतो आहे. हे केवळ भारताचे यश नाही, तर नव्या जागतिक व्यवस्थेचे बीज यात रोवलेले आहे.

- संजीव ओक