"आत्मबोधातून भारतबोध एक वैचारिक क्रांती" : प्रविण देशमुख

16 Sep 2025 18:52:26

कल्याण :
"आपण कोण? आपला मूळ स्वभाव काय? नियतीने आपल्यासमोर कोणते ध्येय ठेवले आहे? याची उत्तरे शोधणे म्हणजे आत्मबोध होय. 'आत्मबोधातून भारतबोध' हे पुस्तक आपल्याला एका वैचारिक क्रांतीकडे घेऊन जाते व विश्वकल्याण करण्याच्या आपल्या राष्ट्रीय ध्येयात आपणही काही हातभार लावू शकतो का असा प्रश्न करते? " असे प्रतिपादन साहित्य भारती, कोकण प्रांतचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी कल्याण येथे केले.

डॉ चंद्रशेखर भारती लिखित 'आत्मबोधातून भारतबोध' या ग्रंथाच्या प्रकाशना प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष संजय द्विवेदी साहित्य भारतीचे महामंत्री डॉ. श्यामसुंदर पांडेय, साहित्य भारतीचे कोषाध्यक्ष प्रा सुनील म्हसकर ,अ.भा. साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा प्राजक्ता कुलकर्णी, डॉ. चंद्रशेखर भारती, सुमेधसिंह भारती, जाई कुलकर्णी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, "आमच्या महापुरुषांच्या शिकवणुकीमुळे त्यांच्या आदर्श जीवन जगण्यामुळे भारतातील प्रत्येक जण हा दया,करुणा,क्षमा या गुणांनी ओतप्रोत भरलेला, चैतन्यशील आत्मा आहे .हे आपल्याला जाणवते व आपल्याला भारतबोध होतो."

संजय द्विवेदी म्हणाले, "तुम्हाला आत्मबोध आहे आणि शत्रुबोध नाही तर, तुमचा विजय हा पराजयासमान आहे. नागरिक म्हणजे नगराचा रहिवाशी. म्हणजेच शहरवासी. मग ग्रामीणचे काय? नागरिक हा शब्द सिटीझन शब्दाचा अर्थ आहे. सिटीझन हा मूळ फ्रेंच शब्द आहे. हे इथे लक्षात घेतले पाहिजे. मूळचा भारत हा गावागावात वसलेला आहे. याचा आपण विचार करत नाही.

डॉ श्यामसुंदर पांडे म्हणाले, नॅरेटिव्ह कसे सेट केले जाते बघा? सलीम-जावेद हिंदी चित्रपटात एक अनाथ मुलगा दाखवतात. त्याचा सांभाळ फादर करतो. म्हणजे ख्रिश्चन धर्मीय. मोठा झाल्यावर दंडावर 786 चा बिल्ला वापरतो, म्हणजे मुस्लिम धर्मीय. मात्र तो येशू किंवा अल्लाहला प्रश्न विचारत नाही तर, शंकराला प्रश्न विचारतो? बर हे नॅरेटिव्ह इथेच संपत नाही. 'जो जीता वही सिकंदर' मुळात सिकंदर माघारी परतला तो भारतीय राजामुळेच.तो भारत जिंकू शकला नाही. म्हणजे तो अजिंक्य राहिलेला नाही. तरी काय सेट केलं जातं? जो जीता वही सिकंदर."

प्रा. सुनील म्हसकर म्हणाले, "आत्मबोध ही आपल्यात असलेली शक्ती आहे. ही शक्ती ही क्षमता सिंधुराज दाहीर, राजा पृथु, राणी अबक्का , छ. शिवाजी महाराज, राजा सोहेलदेव, राणी वेलू नच्चियार यांनी ओळखली. आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व टिकवण्यासाठी ते मुस्लिम आणि फिरंगी आक्रमकांना भिडले व त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आपला देश, आपला स्वाभिमान, आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांना धक्का लागणार नाही याची काळजी घेत त्यांनी परकीय शत्रूला झुंज दिली; हाच तर आत्मबोध आहे.

प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, "भारत हा भरपूर सर्व राष्ट्रीयतेचा समुच्चय आहे. अनेक जाती, भाषा यांचा समुच्चय आहे. भारत हे प्राचीन राष्ट्र आहे. जे की विश्वकल्याणासाठी झटत आहे वसुधैव कुटुंबकमसाठी झटत आहे. आत्मबोधातून निर्माण झालेला हाच तर भारत बोध आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाई कुलकर्णी यांनी तर प्रास्ताविक सुमेधसिंह भारती यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ चंद्रशेखर भारती यांनी केले.



Powered By Sangraha 9.0