
नवी दिल्ली : भारतात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी कार्यरत कार्टेल्सवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी तरुण पिढीला त्यापासून वाचवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्स (एएनटीएफ) प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेस संबोधित करताना ते बोलत होते.
देशात तीन प्रकारचे कार्टेल्स आहेत – एक म्हणजे देशाच्या सर्व प्रवेशद्वारांवर कार्यरत कार्टेल, दुसरे म्हणजे प्रवेशद्वारापासून राज्यांपर्यंत वितरण करणारे कार्टेल, आणि तिसरे म्हणजे राज्यांमध्ये कार्यरत कार्टेल, जे पानशॉप किंवा गल्लीबोळांमध्ये अंमली पदार्थ विकतात. आता या तीन प्रकारच्या कार्टेल्सवर कठोर हल्ला करण्याची वेळ आली आहे. २०४७ पर्यंत पूर्णपणे विकसित भारत तयार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टिकोनासाठी तरुण पिढीचे त्यापासून संरक्षण करणे आवश्यक असल्याचे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.
शाह यांनी परदेशातून अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे प्रत्यर्पण सुलभ करण्यासाठी सीबीआयसोबत सहयोगाचे आवाहन केले आणि व्यावहारिक डेपोरेशन प्रणालीची गरज अधोरेखित केली. त्यांनी लवकरच गृह मंत्रालयाकडून प्रत्यर्पण प्रक्रियेसाठी एक एसओपी जाहीर होणार असल्याचे सांगितले.