राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार करण्याची राज्य शासनाची भूमिका

15 Sep 2025 18:59:59

मुंबई : राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार करून उद्योगांना सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात अधिकाधिक गुंतवणुक करत रोजगार निर्मितीमध्ये वाढ करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १५ सप्टेंबर रोजी केले.

वर्षा निवासस्थानी ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, कंपनीचे कार्यकारी संचालक जिओन्जीक ली, उपाध्यक्ष (वित्त) सारावनन टी, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव असून कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुणे येथील प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणुक करीत रोजगार निर्मितीमध्ये वाढ करावी. कंपनी राज्यात सामाजिक उत्तरदायित्वाअंतर्गत विविध कामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी देत आहे. ही बाब स्तुत्य असून या निधीतून राज्यात सुरू असलेली कामे पथदर्शी ठरतील. या निधीतून कंपनीने पर्यावरण संवर्धनासाठी काम करत रस्ता सुरक्षा, चालक प्रशिक्षण आदींमध्ये काम करावे. राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार करून उद्योगांना सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे," असेही त्यांनी सांगितले. यावेळी कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील वृक्षारोपण मोहीम, रस्ता सुरक्षा उपक्रम आदींचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.


Powered By Sangraha 9.0