
काठमांडू : नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी सुशिला कार्की यांची निवड करण्यात आली होती. सत्तेत आल्यानंतर लगेचच कार्की यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार तीन नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यापासून सुरू केला आहे.
भारताच्या शेजारी राष्ट्रात म्हणजेच नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या जनरेशन झेड'च्या विद्रोही आंदोलनादरम्यान संसदेत घुसून आंदोलन केल्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा देण्याचे ठरवले, राजीनामा दिल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेपाळला अंतरिम पंतप्रधान निवडण्याची गरज होती. १२ सप्टेंबर रोजी सुशिला कार्की यांची अंतरिम पंतप्रधान पदी निवड करण्यात आली.
आपल्या पहिल्या भाषणात, कार्की म्हणाल्या की, त्यांचे प्रशासन "सत्तेची चव चाखण्यासाठी" नाही तर सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी आणि सहा महिन्यांत निवडणुकांची तयारी करण्यासाठी आहे. "तुमच्या पाठिंब्याशिवाय आम्ही यशस्वी होणार नाही," असे कार्की यांनी सिंह दरबार येथे पत्रकारांना सांगितले.
तीन नवीन मंत्र्यांची पद काय? नेपाळ विद्युत प्राधिकरणाचे माजी प्रमुख कुलमान घिसिंग हे ऊर्जा, शहरी विकास आणि भौतिक पायाभूत सुविधा मंत्रालयाचे प्रमुख असतील, ज्येष्ठ वकील ओम प्रकाश अर्याल हे कायदा आणि गृह मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारतील आणि माजी वित्त सचिव रामेश्वर खनाल हे अर्थ मंत्रालयाचे नेतृत्व करतील. असे नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सूत्रांना माहिती दिली.

सुशिला कार्की यांचे मंत्रिमंडळ १५ सदस्यांपर्यंत ठेवण्याची योजना आहे आणि पुढील नियुक्त्यांवर चर्चा सुरू आहे. जनतेमध्ये आणि व्यावसायिक समुदायामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी अर्थ आणि गृह मंत्रालये लवकर भरण्यासाठी दबाव वाढला होता त्या कारणामुळे या तीन नवीन मंत्र्यांची निवड करण्यात आली आहे.