एक कोटींचे बक्षिस असलेल्या नक्षलवादी सहदेवचा खात्मा

15 Sep 2025 17:41:26

नवी दिल्ली : झारखंडमधील हजारीबागमध्ये झालेल्या एका चकमकीत सुरक्षा दलांनी नक्षलवादी सहदेव सोरेनला ठार मारले आहे. सहदेववर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते.

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. हजारीबाग जिल्ह्यातील गोरहोर पोलीस ठाणे परिसरातील पानतित्री जंगलात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला सहदेव सोरेन मारला गेला. याशिवाय दोन वरिष्ठ नक्षलवादी मारले गेले असून त्यात २५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला रघुनाथ हेम्ब्रेम आणि १० लाख रुपयांचे बक्षीस असलेला बिरसेन गंजू याचा समावेश आहे.

सहदेव सोरेन हा एक मोठा गुन्हा करण्याचा कट रचत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, कोब्रा बटालियन, गिरिडीह आणि हजारीबाग पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान, त्यांची माओवाद्यांच्या पथकाशी चकमक झाली. या कारवाईदरम्यान, सैनिकांनी एकूण ३ माओवाद्यांना ठार मारले आणि त्यांच्याकडून एकूण ३ एके-४७ रायफल जप्त केल्या आहेत. हजारीबाग आणि आसपासच्या भागात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. पोलिस आणि सुरक्षा दल इतर कोणत्याही नक्षलवाद्यास पळून जाण्याची संधी मिळू नये, यासाठी सुरक्षादले सज्ज आहेत.

नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोहिमेत झारखंड पोलिसांचे हे दोन दिवसांत मिळालेले दुसरे मोठे यश आहे. रविवारी, पलामूच्या मानातू जंगलात सुरक्षा दल आणि बंदी घातलेली संघटना टीएसपीसी (थर्ड कॉन्फरन्स प्रेझेंटेशन कमिटी) यांच्यात झालेल्या चकमकीत ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी मुखदेव यादव ठार झाला होता.


Powered By Sangraha 9.0