मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे, हवामान खात्याचा 'रेड अलर्ट' जारी!

15 Sep 2025 10:44:50

मुंबई : (Mumbai Heavy Rain) मुंबईसह राज्यातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास अखेर सुरु झाल्याचे भारतीय हवामान विभागाकडून रविवारी जाहीर करण्यात आले. यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.





हवामान विभागाकडून मुंबई महानगर प्रदेशात पुढील ३ तासांसाठी पावसाचा 'रेड अलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याठिकाणी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.




Powered By Sangraha 9.0