मुंबई : राज्यभरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे या शहरांसोबतच राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. काही कालावधीतच पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले असून याचा वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या काही तासांमध्ये मुंबईतील पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.
मुठा नदीला पूर येण्याची शक्यता...
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील खडकवासला धरणासह पानशेत आणि वरसगाव धरणातून विसर्गाला सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी खडकवासला धरणांमधून मुठा नदी पात्रात १४ हजार ५४७ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. शिवाय पानशेत धरणातून २ हजार २४० क्युसेक तर वरसगाव धरणातून २ हजार ९७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडुन आव्हान करण्यात आले आहे की, नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीमधील शेत पंप, नदीकाठची शेता अवजारे आणि जनावरे तत्काल हलवण्यात यावे.

पनवेलमधील कुंभारवाडा, कच्छी मोहल्यात पावसाचे पाणी; परिसरातील रहिवाशांची गैरसोय...
रविवारी रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे पनवेल शहरातील कुंभारवाडा, कच्छी मोहल्ला, कापड गल्ली, मीरची गल्ली या सखल भागात पावसाचे पाणी साचले असून तेथील रहिवाशांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पनवेल महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तुंबलेले पाणी काढण्यासाठी आणि घरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले.
पनवेल शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात सुरू असणाऱ्या बांधकामामुळे झालेल्या भरावामुळे सोबतच दोन दिवस माथेरान डोंगरांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे म्हतले जात आहे.
थेऊर येथील पूरस्थितीत 'पीएमआरडीए'चे मोठे बचावकार्य; १०० हुन अधिक लोकांचा जीव वाचवण्यात यश
सोमवारी दि.१५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता हवेली तालुक्यातील थेऊर गावातील रूपे वस्ती परिसरात ओढ्याला आलेल्या पुरामुळे जवळपास १५० लोकांच्या वस्तीत पाणी भरले आणि अंदाजे १०० लोक अडकले होते. याची माहिती मिळताच 'पीएमआरडीए'च्या वाघोली अग्निशमन केंद्रातील जवान आणि 'पीडीआरफ' पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने समन्वित कारवाई करत घरांमध्ये अडकलेल्या ७० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.
यावेळी म्हशी, शेळ्या, कोंबड्या आदी पाळीव प्राणी काही प्रमाणात वाचवण्यात आले, तर काही प्राणी वाहून गेले आणि काहींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, मानवी जीवितहानी झालेली नाही. एमआरडीए व पीडीआरएफ बचाव पथकाच्या तत्पर मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.
खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकावर दीड फूट पाणी...
हार्बर मार्गावरील खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकाच्या तळमजल्यावर दीड फूट पाणी साचले असून प्रवाशांना स्थानकावर पोहचण्यासाठी या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. येथे सिडको आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाच्या पाण्याचा वेळीच निचरा होण्यासाठी मोटारपंप बसवले आहेत मात्र त्याचा वापर होत नसल्याने, ते फक्त दिखाव्यासाठी बसवले आहेत का? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.